आढळा धरणाचा जन्म कसा झाला? इतिहास जाणून घ्या, शेतकर्यांच्या तोंडातला घास हिसकावू नका, पिंपळगाव नंतर आढळा पेटलं.!!
- सुशांत आरोटे
सार्वभौम (अकोले) :-
दि. 5 नोव्हेंबर 1963 हा अकोले तालुक्यासाठी एक ऐतिहासिक दिवस उजाडला होता. कारण, याच दिवशी वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी राज्यात असा आदेश काढला होता. की, ज्या भागात पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. त्या भागाचा सर्वे करून वाहून जाणारे पाणी आडवायचे होतेे. याच अनुषंगाने दत्ता देशमुख आणि बी.जे. खताळ यांनी एकत्र येऊन आढळा परिसरात एक मोठे धरण व्हावे अशी मागणी केली. भलेही या नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद होते. मात्र, विकासाच्या बाबत त्यांच्यात एकवाक्यता होती. त्यातुन खर्या अर्थाने आढळा धरणाचा जन्म झाला आहे. नाईक साहेबांच्या काळात राज्याचे पाटबंधारे मंत्री यशवंतराव चव्हाण होते. या दोन्ही नेत्यांनी त्यांच्याकडे जेव्हा केळी-सांगवी येथे 8 ते 10 टिएमसी धरण बांधण्याची मागणी केली. तेव्हा केंद्राकडून सहकार्य लाभले नाही. म्हणून राज्याच्या कोठ्यातून 2 कोटी रूपये खर्च करुन आढळा धरणाचा पाया बांधला गेला. त्यामुळे, आढळा धरणात 1 टीएमसी 15 एमसीएफटी पाण्याचा साठा झाला आणि 3 हजार 913 हेक्टर कोरडवाहू जमीन ही ओलीताखाली आली. त्याचा फायदा अकोल्यातील सहा, संगमनेरचे सहा आणि सिन्नरचे दोन अशा 14 गावांना झाला. आज, उठसुठ अकोल्याचे पाणी संगमनेरला पळवून नेण्याचे काम चालु आहे. पुर्वी भंडारदारा, नंतर निळवंडे, त्या पाठोपाठ पिंपळगाव खांड आणि आता आढळा धरण. त्यामुळे, अकोले तालुक्याच्या शेतकर्यांनी असल्या दादागिरीच्या आणि हुकूमशाहीच्या विरोधात दंड थोपटले असून काही झालं तरी थेंबभर पाणी खाली संगमनेरच्या पाच गावांना जाऊ देणार नाही. अशा प्रकारची ठाम भुमिका घेतली आहे. हा सर्व संघर्षाचा संसार उभा करण्यापुर्वी आढळा धरणाचा इतिहास देखील आपल्याला माहित असावा म्हणून रोखठोक सार्वभौम हा विशेष लेख आपल्यासमोर मांडत आहोत.
सन 1968 साली आढळा धरणाच्या निर्मित्तीच्या संकल्पनेने जन्म घेतला. दत्ता देशमुख हे संगमनेरातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यामुळे, त्यांचे अकोले तालुक्यावर विशेष प्रेम होते. अकोल्यातील केळी-सांगवी या ठिकाणी म्हाळुंगी आणि आढळा या नद्यांचा संगम होतो. त्यामुळे, या भागात किमान 8 ते 10 ते टीएमसी धरण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. ते काँम्रेड असल्यामुळे लाल बावट्याची तेव्हाच्या काँग्रेसला जर अॅलर्जी होती. त्यामुळे, खताळ आणि देशमुख यांचे फारसे पटत नव्हते. मात्र, हे धरण झाले तर अकोले संगमनेर तालुक्यातील 30 ते 40 गावांना कायमचे व हक्काचे पाणी होऊन जाईल. म्हणून हे दोन्ही नेते वसंतराव नाईक यांच्याकडे आणि तत्कालिन पाटबंधारे मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले. तेव्हा चव्हाण यांनी सांगितले. की, केळी-सांगवी येथे धरण करण्याची माझी इच्छा असली. तरी, इतका निधी आपल्याला खर्च करता येत नाही. आपण (राज्यसरकार) फक्त 2 कोटी रुपये खर्च करू शकतो. तर, केंद्र शासन अकोले तालुक्यासाठी खर्च करण्यास फार इच्छुक नव्हते. कारण, का? तर, अकोल्यात चिन आणि रशियन विचार सारणीचे लोक जास्त होते. मोर्चे, आंदोलने, बंड यामुळे, सरकार देखील घाबरत होती.
दरम्यानच्या काळात म्हणजे राज्यात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पुन्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री तर शंकराव चव्हाण हे पाटबंधारे मंत्री झाले. देशमुख आणि खताळ साहेब यांनी त्यांच्या मागण्यांची पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यानंतर सन 1968 साली शंकराव चव्हाण यांनी आढळा धरण बांधण्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर केले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अकोल्यात येवून देवठाण येथे आढळा धरणाची पहिली कुदळी मारली आणि काम युद्धपातळीवर सुरू झाले. त्यावेळी नाईक यांनी आढळा धरणासाठी शासकीय त्रिसमिती गठीत केली. त्यात कॉ. दत्ता देशमुख, चिफ इंजिनिअर देवसकर आणि वि.म.दांडेकर यांचा सामावेश होता. सर्वेक्षण झाले, जमिन देखील ताब्यात घेतल्या. मात्र, त्यावेळी देवठाण येथील समाजवादी पक्षाचे साथी आमृतभाई मेहता आणि सकरु बुधा मेंगाळ यांनी धरणाला कडाडून विरोध केला. अर्थात तो धरणाला नव्हे तर धरणात जमीन जातील त्या शेतकर्यांच्या पुनर्वसनाचा होता. त्यावेळी फार मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र, कालांतराने डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव, विरगाव, गणोरे अशा काही ठिकाणी एक आदर्श पुनर्वसन हे आढळा धरणग्रस्तांचे झाल्याचे डोंगरगाव येथील नागरिकांनी सांगितले. कारण, तेव्हाच्या कोराडवाहू जमिनी आणि आज 12 माहिने पिक घेता येईल अशा जमिनी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.
आता धरणाच्या कामाला प्रारंभ झाला होता. मात्र, हे धरण आठ माहि की 12 माहि करायचे? किती कालवे काढायचे? 2 कोटीत हा प्रकल्प उभा कसा करायचा? असे अनेक प्रश्न होते. यात दत्ता देशमुख हे जवळे कडलग येथील होते. तर, बी.जे.खताळ हे धांदरफळ येथील होते. त्यामुळे, डावा आणि उजवा कालवा यात दोघांचे समाधान होणार होते. यात उजव्या कालव्यात देवठाण धरणापासून 2 ते 3 किमी अंतरावर पाहिली चारी केली होती. त्यामुळे, विरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे, वडगाव लांडगा या गावांना पाणी मिळणार नव्हते. त्यात बदल करावा म्हणून रंगनाथ पाटील वाकचौरे यांनी फार मोलाची भूमिका पार पाडली होती. तेव्हा वाकचौरे यांनी देशमुख यांना विनंती करुन चॅनल नं. 42 ते 44 दरम्यान तो कॅनॉल टर्न करून पश्चिम दिशेला दिड किलोमिटर नेला आणि विरगावच्या बाजुने नेवून पुढे काढला. खताळ साहेबांनी देखील धांदरफळला पाणी मिळावे म्हणून टेकडी फोडून पिंपळगाव निपाणी, गणोरे, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझीरे व धांदरफळ येथे पाणी नेले. तेव्हा 80 फुट खोल चारीतून महिला हातोहाथ मोठमोठी दगडे वर काढत होती. रोजगार हमी केवळ दिड रुपयांवर चालत होती. तर, अनेकदा अन्नधान्य म्हणून लोक कामावर येत होते. इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. तर, याच मार्गावर एक उपचारी व्हावी म्हणून रंगनाथ पाटील वाकचौरे यांनी अग्रह धरला. मात्र, तेव्हा 2 कोटी रुपयात हे काम होणे शक्य नव्हते. म्हणून वाकचौरे यांनी देवठाण ते चिखली हा प्रोजेक्ट रोड रद्द केला आणि त्यासाठी खर्च होणार 18 लाख रूपये विरगाव, पिंपळगाव, गणोरे या चारीसाठी वापरला. म्हणून ह्या चारीवर आज हजारो हेक्टर जमिन ओलिताखाली आली आहे.
सन 1975 पर्यंत नाईक यांचा कार्यकाळ संपला यांच्यानंतर शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी देखील आढळा धरणाच्या कामात आडथळा येऊ दिला नाही. अर्थात त्याच काळात बी.जे.खताळ पाटील हे पाटबंधारे मंत्री झाले. त्यांनी बाकी मोठ्या शिताफीने काम करून घेतले. आठवड्या दोन आठवड्यातून ते आढळा धरणाच्या पहाणीसाठी येत असे. म्हणजे अवघ्या आठ वर्षाच्या काळात आढळा धरणाचे काम पुर्ण झाले आणि सन ऑक्टोबर 1976 मध्ये देवठाण धरणातून पाहिल्यांदा पाणी सोडण्यात आले असे रंगनाथ वाकचौरे सांगतात. तर, आढळा परिसरात राहणारे कॉ. कारभारी उगले म्हणतात की जेव्हा धरण नव्हते तेव्हा फक्त 10 टक्के शेती या परिसरात पिकत होती. दुष्काळ पडायचा पण तो पाण्याचा नव्हे.! तर अन्नधान्याचा असायचा. कारण, शेतात पिक पिकत नव्हते. लोक अन्नासाठी तडफडत असायचे. मात्र, आढळा धारण झाले आणि या परिसरातील शेतीने हिरवा शालु नेसला आहे. पाणी हे कोणाच्या बापाची मालमत्ता मुळीच नाही. ती निसर्गाची आहे. तर, त्याहून महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याला देखील विरोध कोणाचा नाही. परंतु, आधी आढळा धरणात पाण्याचा स्त्रोत निर्माण करावा आणि खुशाल पाणी ज्याला द्यायचे त्याला द्यावे.
- सागर शिंदे
भाग 1, क्रमश: