आरे देवा.! मा.मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरात 30 लाखांची फसवणुक.! तिघांवर गुन्हा दाखल.!

   


सार्वभौम (संगमनेर) :-

           मा.समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या मित्रानेच पत्नी करुणा मुंडे यांची 30 लाख रुपयांची फसवणुक केल्याची धक्कादायक घडना चक्क संगमनेरातून समोर आली आहे. नवा पक्ष काढण्यास आर्थिक मदत करतो, आमच्या कंपनीत गुंतवणुक करा महिन्याला चांगला नफा देतो, कंपनीत डायरेक्टर करतो असे अनेक अमिष दाखवून चक्क 30 लाख रुपयांना चुना लावला. ही घटना दि. 7 जानेवारी 2022 रोजी संगमनेर येथे घडली आहे. जेव्हा आपला विश्वासघात होतो आहे हे लक्षात आले. तेव्हा मुंडे यांनी पैशाची मागणी केली असता आरोपींकडून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे, हे प्रकरण अधिक वाढण्यापेक्षा मुंडे यांनी थेट संगमनेर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी भारत संभाजी भोसले (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष आभंग व प्रथमेश संतोष आभंग (दोघे रा.घुलेवाडी, ता. संगमनेर) अशा तिघांवर कलम 420 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, इतक्या बड्या हास्ती संगमनेरात अशा पद्धतीने गुंतवणुक करतात आणि येथील लोकांचे हात कुठवर पोहचलेले आहे याची चर्चा संगमनेरात जोरदार सुरू होती. तर, हाफप्रोफाईल पद्धतीने येथे कशा पद्धतीने फसवणुक होतात याची देखील प्रचिती आली आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी भारत भोसले हा संगमनेर येथील असून तो कामानिमित्त धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार येत होता. त्यावेळी, त्याचा परिचय करुणाताई मुंडे यांच्याशी झाला होता. त्यावेळी म्हणजे जानेवारी 2022 मध्ये आरोपी भारत याने आरोपी विद्या आभंग व प्रथमेश आभंग यांना मुंबईला मुंडे यांच्या घरी नेवून त्यांची ओळख करुन दिली होती. त्यावेळी आरोपी भारत भोसले हो मुंडेताई यांना म्हणाला. की, तुम्ही नविन पक्ष काढत आहात. त्यामुळे, मला देखील तुमच्या पक्षात घ्या. मला त्यात स्वरस्य असून मी स्वयंप्रेरणेने नविन पक्षात सामिल होण्यास तयार असून त्याचा जो काही खर्च होईल. त्यातील निम्मा खर्च मी करु शकतो. तेव्हा त्यांच्या शब्दांना प्रेरित होऊन करुणाताई यांनी त्यांच्याशी पक्ष स्थापना आणि बांधणी याबाबत चर्चा सुरू केली. त्यानंतर यांनी पक्ष स्थापन करण्याची बोलणी होऊन यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा देखील केली. त्यानंतर हे एकमेकांच्या संपर्कत होते. यांच्यात वैचारिक चर्चा होत होत्या. 

दरम्यान, आरोपी यांनी ताईंचा विश्वास संपादन केल्यानंतर खर्‍या अर्थाने लुट करण्याच्या द़ृष्टीने पाऊले टाकली. त्यानंतर भारत भोसले, विद्या आभंग व प्रथमेश आभंग हे ताईंच्या घरी मुंबईला गेले. तेथे जाऊन गोडगोड गप्पा मारल्या आणि हळुच म्हणाले. की, आपली लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनी आहे. त्यात जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला फार फायदा होईल. जर तुम्ही आम्हाला 30 लाख रुपये दिले तर तुम्हाला आम्ही महिन्याभरात 45 ते 70 हजार रुपये देऊ.!! कदाचित यापेक्षाही जास्त नफा आम्हाला झाला तर त्यातील काही पैसा तुम्हाला या कंपनीकडून मिळू शकेल. त्यामुळे, विचार करु नका. फायदा होऊन जाईल गुंतवणुक करा. आता हे बहाद्दर पुर्वीचेच ओळखीचे. त्यात धनंजय मुंडे यांच्या ओळखीचे, त्यात पक्ष काढण्यासाठी मदत करताय. त्यामुळे, कोणीही सहज डोळे झाकुण विश्वास ठेवील.!! आणि झाले देखील तसेच....!

  होय.! मी गुंतवणुक करायला तयार आहे. असे उत्तर येताच यांनी घाई केली. दि. 7 जानेवारी 2022 रोजी संगमनेर येथे विद्या आभंग यांचे सोबत उसणवार पावती म्हणून 20 लाख रुपये दिले. त्याची कायदेशीर पावती देखील करुन घेतली. तर, 9 लाख 50 हजार रुपये हे साठेखत करुन दिले. हे पैसे देताना नाही कॅश तर काही चेक द्वारे दिले आहेत. पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीमध्ये डायरेक्टर करु असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्याक्षात साधा एक रुपयांचा देखील व्यावहार आणि माहिती आरोपी यांनी मुंडेताई यांना दिली नाही. तर, कामकाज कोठे, कसे, नफा, कामे कोण पाहते याची जरा देखील कल्पना दिली नाही. परंतु, गोडबोलुन विश्वास संपादन करुन पैसे काढून घेतले. तर फक्त फेब्रुवारी महिन्यात 45 हजार रुपये त्यांनी दिले होते. का? तर केवळ विश्वास कायम राहण्याच्या हेतुने...!!!

दरम्यान, 45 हजारांच्या व्यतिरिक्त आरोपी भारत भोसले याच्यासह अन्य आरोपींनी ताईंना कोणत्याही प्रॉफिटचे पैसे दिले नाहीत. इतकी मोठी रक्कम गुंतल्यानंतर ताईंनी आरोपींना फोन केला. मात्र, त्यांच्याकडे निव्वळ उडवाउडविची उत्तरे मिळाली. तर, कधी फोन बंद, फोन कट, कधी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. यात केवळ उडानटप्पूपणा सुरू होता. जेव्हा मुंडे यांनी पैशाची मागणी केली. तेव्हा आरोपी म्हणाले की, जर पैसा मागितला. तर, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून आत टाकू. आमच्याकडे पैसे मागायचे नाही, अन्यथा तुम्हाला समाजात बदनाम करुन टाकेल. आता यात आरोप केलेल्या घटनेतील सर्व पुरावे मुंडे यांच्याकडे असून त्यांनी ते प्रशासन दरबारी जमा केले आहेत. तर, तारण म्हणून आरोपी यांच्याकडील काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे करुणा मुंडे यांच्याकडे असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले असून त्यांनी भारत भोसले, विद्या आभंग व प्रथमेश आभंग (दोघे रा.घुलेवाडी, ता. संगमनेर) अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहे. तर, संगमनेर पोलीस ठाण्यात सक्षम अधिकारी नसल्याने काही गोष्टींना तोंड देण्याची वेळ आली. त्यामुळे, संगमनेर शहरसारख्या ठिकाणी पीआय दर्जाचा अधिकारी देण्यासाठी तारीख पे तारीख मिळाली नाही म्हणजे बरे..!!