कर्ज काढून कारखाना चालु म्हणणार्या वैभव पिचड यांनी साधा उतारा कधी दिला नाही.! केवळ सत्तेसाठी खोटं बोलु नका, असलं वागणं बरं नव्हं.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या विस वर्षापासून मी गुलाबराव शेवाळे अगस्ति सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करतो आहे. परंतु, मोठ्या खेदाने सांगावे वाटते. की, सन 2016 चा काळ सोडला. तर, मधुकर पिचड साहेब आणि वैभव पिचड यांनी कारखाना कितीही अडचणीत आला तरी स्वत:च्या नावे कधी कर्ज काढले नाही. आमच्यासारख्या सामान्य शेतकर्यांनी मॉरगेज कमी असताना देखील कर्ज काढून कारखाना चालु ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जेव्हा वैभव पिचड यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला तेव्हा भाषण केले. की, वेळप्रसंगी स्वत:च्या नावे कर्ज काढू.! पण, कारखाना बंद पडू देणार नाही. त्यामुळे, माझ्यासारखा जुना जाणता शेतकरी आज कारखान्याच्या निवडणुकीत उभा नसताना देखील जे सत्य आहे, जे आम्ही अनुभविले आहे. ते जनतेपुढे गेले पाहिजे. हे सार्वभौम मांडू शकते म्हणून मी मुलाखत देत आहे. कारण, 2016 साली कर्जाची गरज असताना स्वत: पिचड साहेब सुद्धा वैयक्तीक कर्ज काढायला तयार नव्हते. मात्र, तुम्ही कर्ज काढले तर आम्ही कर्ज काढू अशी भुमिका आम्ही सर्वांनी घेतली म्हणून त्यांनी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा कर्ज काढले. गायकर साहेबांसह आम्ही जनलक्ष्मी आणि आगस्ति पतसंस्थेतून कर्ज घेतले. ते कमी पडत होते तरी देखील वैभव पिचड हे सहा वर्षे संचालक असताना त्यांनी कर्जासाठी स्वत:चा उतारा दिला नाही. म्हणजे, आज भाषणे ठोकून लोकांची दिशाभूल केली जात आहे. परंतु जेव्हा गरज होती. तेव्हा यांनी का स्वत:च्या नावे कर्ज काढले नाही? मला आता कारखाना लढवायचा नाही. परंतु, खोटंनाटं सांगून लोकांची मते मागतील आणि कारखान्यासाठी कर्जाची वेळ येईल तेव्हा कारखाना बंद पडेल. त्यामुळे हे अनुभवाचे बोल मतदारांनी समजून घ्यावे. हीच विनंती..!
खरंतर, कारखाना उभा राहिला तेव्हापासून आपल्याला काही नात्यांनी बाय प्रोडक्ट येथील काढू दिले नाही. त्यामुळे, जे काही सुरू आहे ते केवळ साखर उत्पादनावर. आता काही प्रकल्प सुरू झाले आहेत. मात्र, पुर्वी परिस्थिती वेगळी होती, त्यातच कारखान्याचा खर्च निघायचा. त्यामुळे, हळुहळु कर्ज वाढत गेले. खरंतर, 2002 साली जेव्हा कारखाना बंद पडला होता. तेव्हा राज्यबँकेने केवळ 2 कोटी 51 लाख रुपये दिले होते. त्यावर मशिनरी दुरूस्ती करून कारखाना चालु झाला. पण, उसतोड कामगारांना देण्यासाठी आणखी पैशाची गरज होती. पिचड साहेब तर तेव्हा मंत्री होते. त्यांची राज्यात चलती होती यापलिकडे ते अगस्ति कारखान्याचे चेअरमन देखील होते. मात्र, त्यांनी अधिकचे कर्ज मिळविले नाही. ना त्यांनी स्वत:च्या नावे पैसे काढण्याची संमती दर्शविली. त्यावेळी संचालक मंडळ एकत्र आले आणि त्यांनी 1 कोटी बडोदा बँक, 50 लाख सिताराम पाटील गायकर यांच्या पतसंस्थेतून, 2 लाख दुधगंगा पतसंस्थेतून, 10 लाख जनलक्ष्मी पतसंस्थेतून आणि लक्ष्मी बँकेतून लाखो अशा पद्धतीने वैयक्तीक नावे कर्ज काढले आणि पुढे कारखाना चालु ठेवला.
खरंतर, बँका त्यांच्या आवाक्यात बसेल इतकेच कर्ज देतात. मात्र, जेव्हापासून गायकर साहेब जिल्हा बँकेत बसले तेव्हापासून अगस्तिच काय.! जिल्ह्यातील 11 कारखान्यांना त्यांनी कर्ज कमी पडू दिले नाही. कारण, कारखाने उभे राहिले, टिकले तर ते शेतकरी जगेल, म्हणून ही उठाठेव होती. मात्र, तरी देखील 2005 नंतर जेव्हा-जेव्हा कारखान्याला कर्जाची गरज पडेल तेव्हा-तेव्हा बर्याच संचालकांनी स्वत:च्या नावे लाखो रुपये काढून कारखाना टिकविण्याचे काम केले आहे. मात्र, 2005 नंतर अनेकदा कारखान्यावर आर्थिक संकट ओढविले होते. कामगारांना दिवाळी बोनस, मजुरांना पैसे, कर्मचार्यांचे पगार जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा बँका तातडीने कर्ज देत नाही. त्या-त्या वेळी पिचड साहेब वगळता येथील संचालकांनी त्यांच्या जमिनी गहाण ठेऊन कारखान्यासाठी कर्ज काढले आहे. यात एक गोष्टी आणखी महत्वाची अशी. की, ज्यांच्याकडे जास्त जमिनी आहेत, ज्यांचे जास्त ऊस जातात त्यांनाच कारखान्यावर संचालक म्हणून घेण्याचे काम केले आहे. याचे कारण म्हणजे केवळ आडीनडीला त्यांच्या जमिनींचा उतारा कर्जासाठी घेता येऊ शकतो. मात्र, आजकाल संचालक म्हणजे केवळ प्रतिष्ठा आणि मोठेपणा असेच काहीसे वाटू लागले आहे.
वास्तवत: कारखाना अडचणीत आल्यानंतर पिचड साहेबांनी कधी विचारणा केली नाही. पण, गायकर साहेबांनी नको ते प्रयत्न करून कारखाना बंद पडू दिला नाही. आज विशेष वाटले की, वैभव पिचड म्हणाले. मी, स्वत: कर्ज काढून कारखाना चालवेल. तेव्हा मला बोलावे लागतेय. की, 2016 ते 2022 या सहा वर्षात आम्ही स्वत:च्या नावे तीन-चार वेळा कर्ज काढून हातभार लावला आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये जेव्हा पैशाची गरज पडली तेव्हा कोण-कोण कर्जासाठी उतारा देणार? असा विषय निघाला. तेव्हा गायकर साहेबांच्या सोबत आम्ही तयार झालो. पण, पिचड साहेब तयार नव्हते. त्यावेळी आम्ही सगळे म्हणालो. की, तुम्ही कर्ज काढत असतील तर आम्ही कर्ज काढू. तेव्हा मधुकर पिचड साहेबांनी उतारा दिला. त्यानंतर प्रत्येकाच्या नावे प्रत्येकी 50 लाख रुपये कर्ज काढले, आजही आम्ही निवडणुकीत नसताना देखील आमची जमीन तारण आहे. यावेळी, वैभव पिचड देखील सहा महिने संचालक होते. तेव्हा त्यांनी स्वत:चा उतारा दिला नाही. घरात दोन उमेदवार चालतात तर कर्ज काढण्यासाठी एकच कसा चालतो? हे खरोखर नैतीकतेला धरून आहे का? म्हणजे, वास्तवात गरज असताना तोंडातून ब्र शब्द काढला नाही. अन निवडणुकीच्या आखाड्यात अश्वासने द्यायची. हे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे, प्रत्यक्षात या पिता-पुत्रांना कधी काम केले नाही. हे असेच चालु राहिले तर उद्या कारखाना बंद पडेल आणि उभ्या हयातीत पुन्हा तालुक्यात कारखाना होणार नाही. हे सत्य नाकारुन चालणार नाही.