अगस्ति कारखान्यात दुरंगी लढत, 49 अर्ज, परिवतर्र्न मंडळ भुईसपाट, शिवसेनेत नाराजी, कोणाचा पॅनल जड.! कोण कोठून उमेदवार.!


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

            अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला आता नवे वळण लागले आहे. कारण, ज्या बी.जे.देशमुख यांनी परिवर्तन म्हणून जे मंडळ काढले होते. त्यातील देशमुख आणि दशरथ सावंत साहेब यांच्यासह सर्वांनी माघार घेतली आहे. म्हणजे, काही दिवसांपुर्वी वाटत होते. की, एकतर तिरंगी निवडणुका होतील, त्यानंतर कालपर्यंत वाटत होते की, परिवर्तन पॅनल पिचड साहेबांनी जाऊन मिळेल. परंतु, त्यांनी मंडळच बरखास्त केल्याने अंतीम टप्प्यात पिचड आणि गायकर अशा पद्धतीचे चित्र दिसून आले. त्यामुळे, दुरंगी लढत होणार असून एकूण 49 अर्ज असून त्यात 7 अपक्ष अर्ज राहिले आहे. आता हि निवडणुक पिचड-पितापुत्रांसाठी अस्थित्वाची लढाई झाली असून गायकर-भांगरे-आमदार यांच्यासाठी अस्मितेची ठरणार आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे, सिताराम पा. गायकर हे जवळ-जवळ शंभर टक्के निवडून आल्यासारखे असून त्यात राजू डावरे यांचा राजकीय बळी दिल्याची चर्चा जोरदार रंगली होती. तर, मधुकर पिचड साहेब आणि अशोकराव भांगरे साहेब यांच्यात पारंपारीक लढत होणार असून यात नेमकी कोणाचा विजय होतो. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यात इंदोरी उत्पादक गटातून मा.आ. वैभव पिचड यांची उमेदवारी असून त्यांनी जिल्हा बँकेला  माघार घेतली होती. आता 2019 च्या पराभवानंतर त्यांची पहिल्यांदाच निवडणुक असून मतदार त्यांच्या पदरी काय टाकतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खरंतर गेल्या कित्तेक दिवसांपासून अगस्ति कारखान्याची निवडणुक हा तालुक्यात फार चर्चेचा विषय रंगला होता. गेल्या सहा महिन्यांपासून तयारीला लागलेले परीवर्तन मंडळ गावोगावी चर्चा करुन जागृती करण्याचा प्रयत्न करीत होते. अर्थात बी.जे.देशमुख यांची भूमिका बर्‍यापैकी कारखान्याच्या वास्तवाशी निगडीत होती. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांच्या व्यासपिठाहून तालुक्यातील अनेक नेत्यांच्या व्यक्तीगत आयुष्यावर टिका टिपण्णी झाली. त्यामुळे, बी.जे देशमुख हे खरे सांगत असले तरी त्यांच्या व्यासपिठाहून अगदी खालच्या पातळीवर जाऊन काही गोष्टी मांडण्याची पद्धत जनतेला खटकली. अन्यथा आज देखील देशमुख उभे राहिले असते तरी त्यांना लोकांनी निवडून दिले असते. कारण, निवडणुक लागण्यापुर्वीच त्यांनी निवडणुकीचे वातावरण केले आणि पिचड व गायकर या दोघांना अपात्र करता-करता तेच अपात्र होऊन बसले. मात्र, त्यांच्या हुशारीचा आणि अनुभवाचा फायदा कारखान्याला व्हावा. याबाबत तालुक्यातील सुज्ञ लोक सहमती व्यक्त करीत होते. राहिला प्रश्न सावंत साहेबांचा. तर, त्यांची राजकीय कार्यकीर्द मांडली तर त्यांचा राजकारणात जीव रमला नाही. परंतु सामाजिक, शेतकरी आणि पाटपाणी या प्रश्नावर त्यांनी देवापेक्षा जास्त काम केले आहे. मात्र, या दोघांच्या आरोप प्रत्यारोपाने लोक देखील संभ्रमात पडले. परंतु, कोठेतरी लवचिक भुमिका घ्याव्या लागतात, कोठेतरी एक पाऊल मागे यावे लागते, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. कारण, सगळ्याच गोेष्टी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. कारखानदारी अकोल्यातच भसभोंगळ चालते आणि अन्य तालुक्यांमध्ये धुतल्या तांदळासारखी स्वच्छ चालते असे काहीच नाही. त्यामुळे, यांनी वेळीच लवचिकता दर्शविली असती. तर, आज कारखाना बिनविरोध झाला असता. हे तितकेच सत्य आहे. तर, बी.जे. देशमुख साहेबांनी सावंत साहेबांचा सामाजिक आणि चळवळीचा वारसा शंभर टक्के घेतला पाहिजे. परंतु, राजकीय वारसा घेतला तर त्यांना जे परिवर्तन घडवायचे आहे. ते येणार्‍या अनेक पिढ्या जातील. तरी ते शक्य होणार नाही. हेच कटू सत्य आहे असे सुज्ञ जनतेचे मत आहे.

खरंतर, परिवर्तन मंडळाचा अखेर पर्यंत ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे, पिचड साहेब आणि समृद्धी मंडळाला बिनविरोधचा ठराव पुढे आणता आला नाही. त्यात आमदार डॉ. किरण लहामटे व भांगरे साहेबांची भूमिका ठाम होती. पिचड साहेब कोणत्याही परिस्थितीत चेअरमन होता कामा नाही. कारण, आता तरी हा कारखाना आम्हला बहुजनांच्या ताब्यात द्यायचा आहे. त्यामुळे, एक प्रश्न मिटला तरी दुसरा प्रश्न उभा ठाकलाच असता. त्यामुळे, आता घोडा आणि मैदान सोबत आणण्याचे काम परिवतर्र्न मंडळाने केले आहे. यात एक महत्वाची बाब म्हणजे, जुने नको नवे द्या या अजेंडाखाली पिचड साहेबांनी अनेक नव्या चेहर्‍यांना सांधी दिली. ती एक जमेची बाजु असली. तरी देखील पिता-पुत्रांनी मात्र संधी अजिबात सोडली नाही. तर, यावेळी आमदारांकडून नगरपंचायतीत जो भोंगळा कारभार झाला. तो कारखान्यात पहायला मिळाला नाही. अशोकराव भांगरे, मधुभाऊ नवले आणि सिताराम पाटील गायकर यांनी एकत्र बसून शेतकरी समृद्धी मंडळाची धुरा संभाळली. अगदी काही उमेदवार सोडले. तर, बर्‍यापैकी दोन्ही मंडळे ही तुल्यबळ झाल्याचे दिसते आहे. यात काही उमेदवार अगदी आजही निवडून आल्याचे स्पष्ट चित्र आहे. मात्र, तरी देखील दोन्ही मंडळांच्या उमेदवारांमुळे, क्रॉस मतदान होण्याची चिन्हे आहेत. तर, 3 हजार 500 मतदार नवे असून त्यांच्याकडून अनेक मते बाद देखील होण्याची शक्यता आहे. याचा तोटा कोण्या एकालाच नव्हे.! तर दोन्ही मंडळांना होणार आहे.

शिवसेनेत गदारोळ

दरम्यान, शिवसेनेत तिकीटाहून प्रचंड गदारोळ पहायला मिळाला. महेश नवले आणि मच्छिंद्र धुमाळ यांच्यात हमरी-तुमरी झाली. शिवसेनेला दोन जागा दिल्या होत्या. त्या कोणाला द्यायच्या हे तालुकाध्यक्षांनी ठरवायचे होते. मात्र, तालुकाध्यक्ष रेसमध्ये उतरल्याने मोठा घोळ झाला. म्हणून जिल्हाध्यक्ष खेवरे नाना यांनी हस्तक्षेप केला. परंतु, त्याचाही फार काही फरक पडला नाही. अखेर दोन जागांसाठी स्वत: मच्छिंद्र धुमाळ यांनी अकोले गटातून उमेदवारी केली. तर, त्यांचा मावसभाऊ प्रदिप हासे (वैयक्तीक त्यांचे काम चांगले विकासात्मक आहे)  यांनी इंदोरी गटातून आपला अर्ज दाखल केला. यात शहरप्रमुख नितीन नाईकवाडी यांनी देखील आईच्या अर्जासह दोन अर्ज भरले होते. मात्र, त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत ताठर भूमिका घेऊन नंतर अर्ज मागे घेतला. या सगळ्या प्रक्रियेत समृद्धी मंडळाने शिवसेनेला दोन जागा दिल्या, त्या त्यांनी कोणाला द्यायच्या यात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे, महेश नवले यांची प्रचंड गोची निर्माण झाली. मच्छिंद्र धुमाळ हे अगस्ति एज्युकेशनवर आहेत, पुर्वी ते कारखान्यावर संचालक होते, एक तिकीट नात्यातील हासे यांना दिले आहे. पुढे जिल्हा परिषद होती. त्यात अनिता मोरे यांना संधी मिळून शकते. त्या धुमाळ यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे, तालुकाध्यक्षांनी थांबून घेतले पाहिजे. असे अनेकांचे मत होते. मात्र, नवले यांनी प्रचंड प्रयत्न करून देखील धुमाळ यांनी त्यांचा पत्ता कट केला. त्यामुळे, पक्षात नाराजीचा सुर पुढे आला होता. आता, याचा किती फायदा आणि तोटा समृद्धी मंडळाला होतो. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नाराजी नाट्य..! 

खरंतर, अकोल गट वगळला तर बर्‍यापैकी समतुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहे. आता उमेदवार हे एकास एक नसल्याने कोण विजयी होईल हे लगेच लक्षात येत नाही. तरी देखील काही चेहरे पाहता नात्यागोत्यांचे राजकारण, मित्रपरिवार, पॅनलची साथ आणि अर्थपुर्ण बळ हेच उमेदवारांना विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. तर, यात काही व्यक्तींची वारीत पंढरी होणार आहे. आज माघारीचा दिवस होता. त्यामुळे, अनेकांची मने दुखावली आहेत. त्यांच्या भुमिका काय असतील हे महत्वाचे आहे. दोन तीन दिवसानंतर राग क्षमला तरी ठिक अन्यथा विरोधकांच्या गोटात जाऊन सामिल झाल्यास नाराज व्यक्तींचा प्रचंड फटका बसणार आहे. तर, काही व्यक्तींना जिरवाजिरवी आणि सुडाच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर या निवडणुकीत दगफटका झाल्यास कोण्या एका व्यक्तीला त्याचा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे, क्रॉस मतदान हे दोन्ही मंडळासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. आजची निवडणुक ही येणार्‍या काळासाठी फार महत्वाची ठरणार आहे. कारण, उद्याच्या विधानसभा मध्यवधी निवडणुकांचे संकेत, कारखान्यातील सत्ता, दुधसंघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांसाठी ही अत्यंत महत्वाची लढाई असणार आहे. तर, गायकर साहेबांच्या अस्तित्वाची, आमदारांच्या प्रतिष्ठेची आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेची ही निवडणुक ठरणार आहे. 

शेतकरी समृद्ध मंडळ-आमदार गट

अकोले गट :- कैलास वाकचौरे (कळस), विक्रम नवले (अकोले), मच्छिंद्र धुमाळ (धुमाळवाडी), इंदोरी गट- पाटीलबुवा सावंत (रूंभोडी), अशोक देशमुख (उंचखडक बु), प्रदिप हासे (म्हाळदेवी) आगार गट :- पर्बत नाईकवाडी (गर्दणी), विकास शेटे (ढोकरी), अशोक आरोटे (मेहेंदुरी), कोतुळ गट  :- यमाजी लहामटे (लव्हाळी), मनोज देशमुख (कोतुळ), कैलास शेळके (चास), देवठाण :- बादशाह बोंबले (हिवरगाव), रामनाथ बापू वाकचौरे (विरगाव), सुधिर शेळके (देवठाण), आबीसी प्रवगर्र्- मिनानाथ पांडे (कुंभेफळ), अशोकराव भांगरे (अ.जाती-जमाती), महिला - सुलोचना नवले (इंदोरी), शांताबाई वाकचौरे (सुगाव बु), सचिन दराडे (एनटी, समशेरपूर), सोसायटी मतदारसंघ- सिताराम पाटील गायकर (मोग्रस)

शेतकरी विकास मंडळ-पिचड गट

अकोले गट :- माणिकराव देशमुख (सुगाव बु), रामनाथ वाकचौरे (कळस), संदिप शेटे (कारखाना रोड), इंदोरी गट- प्रकाश नवले (इंदोरी), भाऊसाहेब खरात (उंचखडक बु), वैभव पिचड (राजूर), आगार गट :- सुनिल कोटकर (कुंभेफळ), किसन शेटे (ढोकरी), सुधाकर आरोटे (मेहेंदुरी), कोतुळ गट:- राजेंद्र देशमुख (कोतुळ), रावसाहेब शेळके (चास), बाळासाहेब सावंत (पाडाळणे), देवठाण गट :- भाऊसाहेब वाकचौरे (विरगाव), नामदेव उगले (डोंगरगाव), जालिंदर वाकचौरे (पिंपळगाव निपाणी) आबीसी प्रवगर्र्- बाळासाहेब वडजे (अकोले), मधुकराव पिचड (अ.जाती-जमाती), महिला - आरती मालुंजकर (रूंभोळी), रंजना नाईकवाडी (अकोले), सुभाष काकड (एनटी, देवठाण), सोसायटी मतदारसंघ- राजेंद्र डावरे (निंब्रळ)


अपक्ष -: रामनाथ शिंदे (अकोले), प्रकाश हासे (इंदोरी), संपत फोडसे (आगार), सुभाष घुले (कोतुळ), चंद्रभान उगले (देवठाण), गोरक्ष आंबरे (देवठाण), संजय देशमुख (इमाव)