अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरिर सुखाची मागणी, भ्रष्टाचारी उपसरपंचाची ग्रामसेवकावर तावतुगारी.! बोगस कामे रेकॉर्डवर घेण्याहून राडा.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर तालुक्यात पठार भागावरील सरोळेपठार येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व उपसरपंच यांच्यामध्ये धुमचक्री झाल्याचे पहायला मिळाले. आरोपी उपसरपंचाच्या काळातील बोगस काम रेकॉर्डला घेण्यासाठी ग्रामसेवकावर दबाव टाकुन आरोपी उपसरपंचाने ग्रामसेवकाच्या हातातील पाणी टँकरचे प्रस्तावाचे कागदपत्रे ओढुन फाडुन फेकले व धक्काबुक्की करून गच्ची धरून हात पिरगळला. ही घटना गुरुवार दि. 30 जुन 2022 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी ग्रामस्थ असल्याने ह्या वादावर पडदा टाकण्याचे काम केले. परंतु, ग्रामसेवक यांनी थेट पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलिस ठाण्यात कथन केली. ग्रामसेवक अजित घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे (रा. सारोळे पठार, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. सातपुते करत आहे. या उपसरपंचावर यापूर्वी देखील घारगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. तरी घटना घडून 24 तास उलटुन देखील अद्याप आरोपी उपसरपंच फरार आहे. त्यामुळे, या उपसरपंच आरोपीला पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा पठाराभागावरील सुज्ञ लोक करत आहे. 

              याबाबत सविस्तर माहिती अशी की, सारोळे पठार येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक पदाचा चार्ज अजित घुले यांनी 24 जानेवारी 2022 रोजी घेतला होता. तेव्हापासुन ते गावातील ग्रामपंचायतमधील कामकाज अगदी बारकाईने पाहतात.  परंतु, गुरुवार दि. 30 जुन रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यलयात मिटींग होती. त्यामुळे, फिर्यादी ग्रामसेवक हे 10:30 वाजता ग्रामपंचायत कार्यलयामध्ये हजर होते. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत शिपाई देखील हजर होते. यावेळी आरोपी उपसरपंच प्रशांत फटांगरे हे ग्रामपंचायतमध्ये आले व त्यांनी फिर्यादी ग्रामसेवक यांना उदघाटन संदर्भात व टॅब खरेदी करणे इतर कामाबाबत विचारले. यावेळी फिर्यादी ग्रामसेवक यांनी आरोपी उपसरपंचाला व्यवस्थित माहिती दिली आणि बाकीची माहिती व चर्चा मिटींगमध्ये करू असे सांगितले. त्यावेळी, आरोपी उपसरपंच प्रशांत फटांगरे यांनी सरपंच यांना अपशब्द वापरले. 

              दरम्यान, आरोपी उपसरपंच यांना अपशब्द वापरू नका असे ग्रामसेवक बोलताच आरोपी उपसरपंच प्रशांत फटांगरे यांनी ग्रामसेवकाशी बाचाबाची करून मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू केले. हा वाद मिटत असताच ग्रामसेवकाच्या हातातील टँकरच्या प्रस्तावाचे कागदपत्रे ओढुन ते फाडले व हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला असता. ग्रामसेवकास उपसरपंचाने धक्काबुक्की केली. तर हात पिरगळुन गच्ची धरली. फिर्यादी ग्रामसेवकास वारंवार त्रास देऊन आरोपी उपसरपंच त्यांच्या काळात अपहार झालेल्या कामांची नोंद रेकॉर्डवर घ्यायला लावतात. त्यामुळे, ग्रामसेवकाने थेट पोलीस ठाणे गाठत उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे याच्या विरुध्द घारगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

दरम्यान, आरोपी उपसरपंच प्रशांत फटांगरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतमध्ये अपहार केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ते सरपंच असताना ग्रामसेवकाच्या संगनमताने विविध योजनांमध्ये गैरव्यवहार करून ग्रामपंचायतीचा निधी स्वतःच्या खात्यावर चेक ने वर्ग करून 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा निधी स्वतःच्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. तेव्हा आरोपी प्रशांत फटांगरे यास 11 जुलै रोजी घारगाव पोलिसांनी अटक केली होती. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली होती. सन 2014-15 ते 2017-18 या कालावधी मध्ये गावात येणाऱ्या वेगवेगळ्या कामांमध्ये रग्गड पैसा कसा कमवता येईल या उद्देशाने मिळेल त्या कामात पैसे कमविण्याची संधी यांनी सोडली नाही, असे त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.

            दरम्यान, सारोळे पठार येथील एका महिलीचे घरकुल मंजुर झालेले होते. घरकुलाचे काम लवकर करण्यासाठी ग्रामसेवक याने पिडीत महिलेकडून 15 हजार रुपये घेऊन देखील पिडीत महिलेचे घरकुलाचे काम केले नाही. म्हणुन पीडित महिला ग्रामसेवकाकडे विचारण्यासाठी आली आस्था ग्रामसेवकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक घटना 30 जुन 2022 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ग्रामसेवक अजित वसंत घुले (रा. वरुडी, ता. संगमनेर) यावर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु, ग्रामसेवकाने उपसरपंचाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला म्हणुन हा गुन्हा दाखल झाल्याची चर्चापठार भागातील नागरिक करत आहे. असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकारणातुन होत असतील तर शासकीय कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे असा प्रश्न प्रशासनापुढे उपस्थित होत आहे. पिडीत महिला ही आरोपी उपसरपंच प्रशांत फटांगरे यांच्या परिचयाची असल्याने ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.