सरकार पडलं, पण त्यांनी मन जिंकलं, महाराष्ट्राला काय धडा मिळाला.! दगडाच्या देशाला पाझर फोडणारा मुख्यमंत्री.!
सार्वभौम (अकोले) :-
मी राजकीय शिवसैनिक मुळीच नाही.! पण एक भारतीय नागरिक आहे. अर्थातच महाराष्ट्रात रहात असल्यामुळे राज्याच्या सत्तानाट्यावर लक्ष आहे. आज ठाकरे सरकार कोसळले. मात्र, "हारी हुई बाजी को बाजीगर कहते हैं"! असे म्हणतात. त्याचा प्रत्यय राज्याचे 'मावळते मुख्यमंत्री' यांच्या शब्दातून प्रतीत झाला. खरंतर महाराष्ट्राला "दगडाच्या देशा, कणखर देशा" असे म्हटले जाते. परंतु, कणखर प्रदेशाचा मुख्यमंत्री दगडाला देखील 'पाझर' फोडताना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. नाही हो जमत काही मानसांना 'गेंड्याच्या कातड्याचे पांघरुन घेऊन आवसाण आणणं', नाही जमत "सोंगाड्या"सारखं जगणं, जे असेल ते सरळ आणि समोर बोला. बस.! याच स्वभावाचे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे. दिसले नाही पण, अनेकांनी त्यांचे आश्रु पाहिले, धुर नाही पण काळीज जळताना पाहिले. शब्द नाही पण व्यक्त होताना पाहिले, कधी नव्हे असे विधानभवन सोडताना मुख्यमंत्री हळव्या मनानं संपुर्ण जगाने पाहिले. का? ते ज्यांच्यापासून भिती होती, त्यांनी साथ दिली आणि ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी घात केला. हे बंड नव्हे, तर ज्यांना शिवसेनेने रिक्षातून उचलुन पक्षात आणले आणि स्वत: पदे भोगली नसेल ती त्यांना दिली. त्यांनीच असे करावे.! म्हणून शब्दांच्या आडून उद्धव ठाकरेंचे आश्रू अनावर झाले होते. विशेष म्हणजे, ज्या राष्ट्रवादी-काँग्रेसकडे दगाबाज नजरेने ठाकरे पहात होते, ते अंतीम क्षणापर्यंत म्हणत होते, साहेब बिनशर्त आमचा पाठिंबा घ्या. पण, तुम्ही मुख्यमंत्री रहा. त्यामुळे, ते राजकीय युद्ध भलेही हरले असेल. मात्र, संंबंध महाराष्ट्रच्या जनतेवर त्यांनी अधिराज्य गाजविले आहे.
सलग 9 दिवस चाललेल्या या नाराजी नाट्यानंतर आज (दि.29 जून 2022) महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या "पाठीत खंजीर" खुपसून 50 आमदार फोडले आणि ठाकरे सरकारला कोंडीत पाडण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय.! ज्यांना शिवसेनेने मोठं केलं त्या शिंदेंनी खुद्द शिवसेना पक्षावरच दावा केला आणि तेव्हाच महाराष्ट्राला पहिला धडा मिळाला. की, कितीही विश्वासातला माणूस असला तरी तो डोक्यावर बसून घाण करेल, इतके मोठे त्याला करायचे नाही. अन्यथा घरात निवारा दिला की लोक घर नावावर करू पाहतात. त्यामुळे, सावधान.! यात सर्वात महत्वाची गोष्ट उध्दव ठाकरे यांनी मांडली. की, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे यांना मोठे केले. त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदाहून खाली खेचण्याचे पुण्य शिंदे यांना लाभले आहे. म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शब्दांना शांत, प्रशांत समुद्रचा किणारा होता. मात्र, त्यामागील भावनांची ताकद खवळलेल्या समुद्रासारख्या उसळणार्या लाटांनइतकी होती. त्यामुळे, ठाकरे जरी कमी बोलले असतील. तरी त्यांच्या वेदना संपुर्ण महाराष्ट्र अनुभवत होता. शब्द भलेही त्यांचे असतील मात्र, वेदना ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक हळव्या मनाला भिडत होत्या. त्याची सहानुती इतकी होती. की, या 40 आमदारांपेक्षा 4 कोटी जनता शिवसेना अध्यक्षांचे सांत्वन करीत होती.
खरंतर, उद्धव ठाकरे यांना कधीच कोणत्याही पदाची अभिलाशा नव्हती. जर, शिंदे गटाने त्यांना येवून सांगितले असते की, मुख्यमंत्रीपद आम्हला हवे आहे. तर, हसत-हसत त्यांनी दिले असते. परंतु, ठाकरे हे सरळ स्वभावाचे असल्यामुळे त्यांना पाठून वार केलेला सहन झाला नाही. म्हणून तर त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. स्वत:च्या सरकारमध्ये स्वत:ची धुसमट झाली. अगदी कोणत्याही क्षणी वाटत होते. की, राष्ट्रवादी भाजपसोबत जाते की काय? काँग्रेस पाठींबा काढून घेते की काय? पण त्यांना अनपेक्षित असे झाले. दिलवाले चित्रपटात म्हटले आहे, "हमे तो अपनोंने लुटा, गैरोमें कहा दम था.! मे थी किस्मत जहाँ डुबी वहा पाणी कम था"!... खरंतर, ठाकरे यांना दुसरे-तिसरे कोणी नव्हे.! त्यांच्याच जवळच्यांनी त्यांना लुटले. म्हणून तर वेदनांचा काहुर माजला आहे. जर, मित्र पक्षाकडून असे झाले असते तर आत्तापर्यंत त्यांनी शिवधनुष्य उचलुन एखाद्याचा "शिरच्छेद" केला असता. पण, आता आपलेच "दात आणि आपलेच ओठ", तोंड दाबुन बुक्क्यांचा मार. मात्र, काही झालं तर, ठाकरे यांचे हाल महाराष्ट्रला पहावले नाही. ज्यांना सत्ता आणि राजकारण करायचे ते दगडाच्या काळजीचे लोक पेढे खातील, कोणी फटाक्यांची आतिषबाजी करेल. मात्र, दुसरीकडे जनतेच्या मनामनात उद्धव ठाकरे यांनी घर केले. हे नाकारुन चालणार नाही.
खरंतर, आम्ही शेवटपर्यंत लढू अशी हाक ठाकरे यांनी दिली होती. मात्र, त्यांची हतबलता इतकी होती. की, त्यांनी अक्षरश: या यंत्रणेला हात जोडले. म्हणजे, भाजपने अपिल केले तर 48 तासात सुनावणी आणि दोन आठवड्यांनी निकाल. अन, शिवसेनेने अपिल केले तर 24 तासात फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागले. त्यामुळे, न्याय-न्याय असतो, त्यांना वंदन करीत आपल्या भावना ठाकरेंनी गिळुन घेतल्या. पण, त्या चारदोन शब्दात ते खूप काही बोलुन गेले जे जनतेने देखील उघड्या कानांना ऐकले. तर, राज्यपालांचा त्यांना सन्मानाने समाचार घेतला. भाजपने पत्र दिल्या-दिल्या 24 तासात फ्लोअर टेस्ट, गुरु खरोखर आपण लोकशाही पालन केले. मात्र, गेल्या दोन वर्षापासून 12 विधानसभा आमदारांच्या नियुक्तीचे पत्र राज्यपालांच्या दरबारी पडून आहे. त्यात देखील तत्परता आणि लोकशाही दाखविली असती तर बरे झाले असते. हे खोचक टोले जरी असले, तरी संबंध महाराष्ट्र पाहतो आहे. संवैधानिक अधिकार जरी असला तरी नैतिकता नावाची गोष्ट असतेच की..! जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्हाला आई म्हणून बसविले असेल तेथे तुम्ही माझा तो बाबू अन त्याचा तो बाब्या असे नाही करायला हवे. तोच दुजाभाव येथे वारंवार पहायला मिळाला. खरोखर असा मुख्यमंत्री ज्याने सरकारची सुरवात "रायगडाला निधी" देऊन केला आणि "औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर" करून सरकारचा ऐन्ड केला. कोरोना, वादळी वारा, पाऊस यांच्यासह महाराष्ट्रावर अनेक संकट आली होती. ती दुर करण्यासाठीच फक्त ठाकरे सरकार ईश्वररुपी आले होते. आज महाराष्ट्र या सगळ्यांमधून सावरुन ते पुन्हा मातोश्री परतले आहे. कदाचित नाही होणार माऊलींची पुजा त्यांच्या हस्ते, पण उभ्या महाराष्ट्राला विठोबा पावलाय....
काही असो, हे सत्तांतर फार काही शिकवून गेले. विचार भलेही वेगळे असुद्यात.! परंतु विपक्ष परिस्थितीत मित्राची साथ सोडायची नाही हे राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी दाखवून दिले. पक्ष आणि तत्व वेगळी असली तरी चालेल. पण, मित्राच्या मुलावर आलेलं संकट धिरोदत्तपणे तारण्याचं सामर्थ्य त्याच्यात निर्माण करून देण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आहे, हे शरद पवार यांनी दाखवून दिले. राज्याचा प्रथम नागरिक बापासारखा कठोर नव्हे तर आईसारखा प्रेमळ आणि हळवा देखील असतो हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेे. नेते, आमदार, खासदार जरी पक्ष सोडून गेले तरी जनता चांगल्या नेतृत्वाच्या मागे खंबिरपणे उभी रहाते हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. सत्तेच्या आणि अनाधिकाराच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो. हे काही पक्षांनी दाखवून दिले. लोकशाहीत न्याय कशा पद्धतीने मिळतो, याचे उत्तम उदा. महाराष्ट्राला परिस्थितीने दाखवून दिले. तर, सगळ्यात महत्वाचे म्हणजे, कोणला किती मोठं करायचं आणि पायातले पायतान किती वर न्यायचे हे देखील बंडखोरांना दाखवून दिले. सत्ता व अर्थपुर्ण सक्षमता यासाठी कोण किती थराला जाऊ शकते, हे देखील काही लोकप्रतिनिधिंनी दाखवून दिले. महाराष्ट्राचा कारभार गोवा, सुरत आणि गुवाहटी मधून देखील चालविला जाऊ शकतो, हे देखील नेत्यांनी दाखवून दिले. ज्या छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती. त्यांच्याच नावे असणार्या पक्षातील लोकांनी महाराष्ट्राची अस्मिता सुरतेत गहाण ठेवल्याचे पहायला मिळाले. शेवटी..., कोणी "करोडोंची सत्ता "जिंकली तर, कोणी जाता - जाता "करोडो हृदय" मग जिंकल कोण ?? आणि हारल कोण ?? सत्तेचे गणित हरूनही "करोडो हृदय जिंकून गेले." साधा, शांत, सोज्वळ, प्रामाणिक, प्रांजळ आणि हो...दिल्या शब्दानुसार जगणारा,आणि सामान्यपणे जागणारा मुख्यमंत्री सत्तेतून पायउतार झाला. आणि करोडोंच्या हृदयात स्थान निर्माण करून गेला हेच खरे..!