दुसऱ्या पावसाने संगमनेरात मृत्युतांडव.! मालदाड, आकलापूर, विरगाव येथे मृत्युच्या घटना.! एकाच कुटुंबातील तिघे, तर शेतकरी महिलेचा मृत्यू..!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेर तालुक्यातील पठार भागावरील अकलापुर परिसरात मुंजेवाडी येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे घर कोसळुन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. तसेच मालदाड येथे देखील लिंबाचे झाड पडुन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. असे आज दुसऱ्याच पाऊसाने चार जणांचे बळी घेतले आहे. ही हृदयद्रावक घटना आज गुरुवार दि. 9 जुन रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात साहिल पिनु दुधवडे (वय 10), विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय 75), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय 80) हे मयत झाले तर मालदाड येथे सुरेखा राजु मधे (वय 28) ही महिला मयत झाली आहे. आकलापूर येथील घटनेत वनिता सुभाष दुधवडे व मंदाबाई विठ्ठल दुधवडे हे दोघे जण गंभीर जखमी असुन त्यांना रुग्णवाहिकेच्या साह्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे. तर महसुल विभागाने हा अहवाल वरिष्ठ कार्यलयाला कळवून मयत व्यक्तींच्या वारसांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी कागदांची पूर्तता करण्याचे काम सुरु केले होते. तर या पलिकडे अकोले तालुक्यात देखील देवठाण येथील बन्सी उमाजी मेंगाळ यांच्या विरगाव हाद्दीतील शेतात असणाऱ्या छपरावर विज पडून गायी आणि बैल यांचा मृत्यू झाला असून अरुण शेळके यांनी भेट देऊन शेतकऱ्याचे सांत्वन केले आहे. तर सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करुन पंचनामा करण्यास विनंती केली. दरम्यान, या वादळी वाऱ्यामुळे पिक, रस्ते, शेती, घरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची चौकशी आणि पंचनामे करुन तत्काळ शेतकरी आणि मयत कुटुंबियांना मदत करा अशी मागणी गौरव डोंगरे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवामान खात्याने यावर्षी १० दिवस आधीच मान्सून दाखल होण्याचे संकेत दिले होते. मात्र, २ जून वगळता पावसाने थेट ८ जून रोजी हजेरी लावली. काल अकोल्यात कमी परंतू संगमनेरात सयंकाळी प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे, कोठे विद्युत तारा तुटल्या तर कोठे घरावरची छपरे उडून गेली. पहिल्याच पाऊसाने सर्वांची त्रिधातिरपीट उडाली. शेतकऱ्यांच्या देखील पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. काल संगमनेरात वादळी वाऱ्यासह पाऊसाने जोरदार हजेरी लावली. त्यात काल कोठे जिवित हानी झाली नाही. मात्र, भौतिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. काल सायंकाळी सुरु झालेला हा नैसर्गिक राडा रात्री ११ नंतर देखील सुरुच होता. आज. (दि.९) रोजी मात्र संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली. कारण, संगमनेर तालुक्यावरील अकलापूर येथे वादळी वाऱ्याने चांगलेच तांडव घातल्याचे पहायला मिळाले. यात दुर्दैव असे की, दुधवडे कुटुंबातील तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षात त्यांनी सिमेंट विटांनी आपल्या घराचे स्वप्न पुर्ण केले होते. आजुबाजूला कोणतीही लोकवस्ती नसताना दुधावडे कुटूंब शेती आणि मजुरी करुन आपल्या कुटुंबाची गुजरान करीत होते. अगदी आता कोठे सर्व काही पुर्वपदावर आले होेते. मात्र, अचानक निसर्गाने त्यांच्या कुटुंबावर इतका मोठा घाला घातला. की, अवघ्या १० वर्षाचा साहिल देखील दैवाने हिसकावून नेला. विशेष म्हणजे हे एक घरकूल असून त्याचा इतका निकृष्ठ दर्जा कसा? याची आता चौकशी झाली पाहिजे. या कुटुंबावर फार मोठे संकट असून संपुर्ण संगमनेरवर शोककळा पसरली आहे. सुदैवाने या कुटुंबातील काही लोक हे गावी गेलेले होते. तर, घरात साहिल सोबत त्याची बहिण देखील होती. ती खिडकीच्या जवळ असल्यामुळे तिच्यावर आलेले संकट टळले. म्हणतात ना, काळ आला होता मात्र वेळ नाही. त्यामुळे, मुलीचे नशिब खरोखर बलोत्तर म्हणावे लागेल. हे सर्व चित्र पाहून काल चौथीत शाळेत जाणारा बाळ आता त्याच्या आईला पुन्हा कधीच दिसणार नाही. या आवेशाने त्या माऊलीच्या टाहोने संपुर्ण पठार भाग दु:खांकीत झाला आहे.
ज्या आज घटना घडल्या आहेत, त्यांचे विशेष म्हणजे अकोले आणि संगमनेरच्या घटना ह्या बरोबर चार वाजण्याच्या सुमारास घडल्या आहेत. म्हणजे, त्या चार वाजण्याच्या दरम्यान निसर्गाने किती रैद्ररुप धारण केले होते हे नव्याने सांगायला नको. एकीकडे अकलापूर येथे वेदनांचा महापूर सुरु होता. त्याच वेळी मालदाड येथे एका महिलेचा निसर्ग जीव घेत होता. त्याचे झाले असे की, नळवाडी येथून एक कुटुंब संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे शेती करण्यासाठी आले होते. आज (दि.९) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास प्रचंड वादळी वारा सुरु झाला. तेव्हा शेतातून नुकतीच मका काढली होती. त्याची कनसे या शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाखाली ठेवली होती. अचानक पाऊस आला तर मालाची नुकसान होऊ नये. आपण केलेल्या कष्टावर पाणी फिरु नये, आपला घाम मातीमोल होऊ नये या भावनेतून त्यांनी कनसे झाडाखाली ठेवली होती. मात्र, अचानक निसर्ग कोपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि ढगांचा गडगडाट सुरु झाला. कणसे भिजायला नको म्हणून सुरेखा राजू मधे हिने लिंबाच्या झाडाकडे धाव घेतली. भिती वाटत होती, मात्र, कष्टाने केलेलं मातीत जायला नको म्हणून तिने एक प्लास्टिक कागद घेतला आणि कणसे झाकत असताना अचानक जोराने ढगांचा कडकडाट झाला. वाऱ्याच्या वेगाने लिंबाची फांदी तिच्या अंगावर कोसळली तोच झाडाच्या बुध्यात तिचे मुंडके अडकले. काही क्षणात होत्याचे नव्हते होऊन गेले. बराच वेळ झाला तरी सुरेखा येईना म्हणून चौकशी केली असता ती अनंतात विलीन झालेली होती. एकंदर आज दुसरा पाऊस संगमनेरसाठी पाण्याचा थेंब नव्हे तर आश्रुंच्या धारा घेऊन आला होता की काय? असा प्रश् पडू लागला आहे.
दरम्सान, संगमनेर तालुक्यात काल आणि आज वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांवर मोठं-मोठे झाडे पडले आहे. तर काही ठिकाणी घरांची पत्रे उडाली आहे. त्यामुळे, घरात व घराच्या बाहेर सुरक्षीत ठिकाणी थांबुन आपली काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपला जीव क्षणात गमवावा लागणार नाही. तालुक्यात या दोन दिवसांच्या वादळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काल सादकपुर, औरंगपुर, निमगावजाळी, वडगावपान परिसर तर आज मालदाड, घारगाव,अकलापूर, खंदरमाळ, संगमनेर खुर्द या भागांमध्ये शेतीसह घरांचे, काही व्यवसयीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने सतर्कता बाळगुन आपली काळजी घ्यावी असे अहवान संगमनेर प्रशासनाने केले आहे. तर, अकोले तालुक्यात देखील काहीशी हिच परिस्थिती दिसून आली. आजच्या पावसाने बन्सी उमाजी मेंगाळ यांच्या शेतातील छपरावर वीज पडली. त्यात एक गायी आणि बैल मयत झाले आहेत. तर, शेजारीच अन्य जनावरे होती. त्यांचा जीव मात्र वाचला आहे.