कॉलेजमधून पोरगी पळून नेली, सीसीटीव्हीत दिसले, अपहरण करून अत्याचार, एकदा जेलमधून सुटला अन तो पुन्हा तुरूंगात गेला!



सार्वभौम (संगमनेर) :-

            आपण प्रेम करत असलेली मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असताना देखील त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले. वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार जेव्हा उघड झाला तेव्हा त्याच्यावर नगर येथे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक झाली आणि नंतर तो बाहेर देखील आला. मात्र, त्यानंतर तो शांत बसला नाही. त्याने पुन्हा मुलीचा शोध घेतला आणि संगमनेरात एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या वर्गात ती शिकत असताना त्याने तिला पुन्हा पळवून नेले. ताप आला म्हणून वर्गातून बाहेर पडलेली मुलगी गेली कोठे? याचा शोध घेतला असता हा सैराट प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद झालेला दिसला. त्यानंतर पुन्हा त्यांचा शोध घेऊन आरोपीस अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. आज न्यायालयाने संबंधित तरुणास दोषी धरुन 1 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुरज भाऊसाहेब साठे (रा. काटवन खंडोबा, नगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी सुरज साठे याने 2018 मध्ये एका शालेय अल्पवयीन मुलीवर प्रेम केले होते. माझे तुझावर फार प्रेम असून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणत त्याने तिला विश्वास दिला होता. मात्र, मुलीचे वय लग्न वैगरे समजण्याच्या पलिकडे असल्यामुळे ती त्याला सर्व गोष्टींना हो-हो म्हणत गेली. त्यानंतर तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन साठे याने पीडितेवर वारंवार आत्याचार केले. दरम्यान, हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी साठे यास अटक केली होती. त्यानंतर तो बराच काळ पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत होता. नंतर त्यास जामिन मिळाला आणि तो बाहेर आला.

या दरम्यान, आरोपी हा पीडित मुलीला त्रास देऊ शकतो, तिच्यावर दबाव आणू शकतो म्हणून त्याच्या सुरक्षेपासून पीडितेला दि. 2 ऑगस्ट 2018 रोजी संगमनेर येथील एका शासकीय सुरक्षा यंत्रणेत ठेवले होते. मात्र, साठे हा बाहेर असल्यानंतर त्याने पीडितेचा शोध घेतला. ती संगमनेर येथे असल्याचे माहित होताच त्याने 6 नोव्हेंबर 2018 संगमनेर गाठले. तिच्याशी संपर्क करून तिला पुन्हा वेगवेगळे अमिष दाखवून त्याने तिला शासकीय सुरक्षा रखवालीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी पीडित मुलगी ही संगमनेरातील एका कॉलेजला आली होती. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ती वर्गात असताना तिने शिक्षकांना सांगितले की, मला ताप आला आहे. त्यामुळे, मी मेडिकलमधून गोळी घेऊन येते. ती जशी गेली तशी पुन्हा आलीच नाही. त्यामुळे, सगळ्यांची एकच धांदळ उडाली. मुलीचा शोध सुरू झाला, पोलीस यंत्रणा कॉलेजवर दाखल झाली. मात्र, मुलगी कोठे गेली काहीच तपास लागली नाही. त्यावेळी, पीडितेच्या मैत्रीनीने सांगितले की, दुपारी एका मुलाने तिचा हात धरुन गेटकडून बाहेर नेले आहे. तेव्हा, पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले.

दरम्यान, हा तरुण कोण? याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होता. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी नगरपर्यंत धागा नेला आणि हा तोच तरुण आहे. ज्याच्यावर पीडितेच्या जबाबानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर सर्व चित्र क्लेअर झाले. त्यानंतर सुरज साठे याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा कलम 363 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात एकूण आठ साक्षिदार तपासण्यात आले. सबळ पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने सुरज साठे यास एक वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंड, तो न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणे, त्यांच्याकडून चुकीची कामे करुन घेणे अशा घटनांवर पायबंद बसणार आहे.