बाबो.! काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यावर 40 लाखांचा हनिट्रॅप.! बंद खोलीत अश्लिल व्हिडिओ, महिलेसह दोघांना अटक.!

सार्वभौम (संगमनेर) :-

           प्राथमिक आरोग्य केंद्रात ओळख झाल्यानंतर त्यांचे मैत्रीत रुपांतर झाले आणि हा प्रकार थेट एका बंद खोलीतील अनैतिक संबंधाच्या व्हिडिओ क्लिपपर्यंत गेला. पैसे देतो का, की करु क्लिप व्हायरल? असे म्हणता-म्हणता संगमनेर तालुक्यातील एका काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याने तब्बल 40 लाख रुपये संबंधित महिलेच्या घशात घातले. पैसे देऊन कंटाळलेल्या या हनिट्रॅपला आता बेड्या ठोकल्या पाहिजे अशी धारणा होताच मेंबरने घडला प्रकार पोलिसांना सांगितला आणि 4 लाख 50 हजार घेताना बाई बाबासह दोघांना पोलिसांनी अटक केली. हा प्रकार जानेवारी 2018 ते 4 जुन 2022 या दरम्यान संगमनेर, लोणी, शिर्डी अशा वेगवेगळ्या ठिकाणी घडली. यात एक महिला आणि राजेंद्र गिरी या दोघांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, काँग्रेसचे पीडित पंचायत समिती सदस्य हे एक सामाजिक कार्यकर्ते असून एका प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची गोसावी महिला हिच्याशी ओळख झाली होती. हिला बकरा हवाच होता त्यामुळे हिने बळजबरी ओळख वाढविली आणि यांच्यात मैत्री झाली. हिने लगेच आर्थिक आडचण सांगून मेंबरकडून 2 लाख उसने घेतले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी 15 दिवसात हा पैसा तिने परत देखील केला. त्यामुळे, मेंबरला देखील वाटले असेल की, अशी विश्वासू महिला सगळ्या जगात नाही. काही दिवस जातात कोठे नाहीतर तिने पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा मेंबरने घुलेवाडी येथील एका बँकेतून तिला पाच लाख आरटीजीएस केले. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, तिने मेंबरला सांगितले की, माझी नेवासा येथे जमीन आहे. तिचे रेकॉर्ड बनविण्यासाठी 15 लाख रूपयांची गरज आहे. माझा व्यावहार झाला की, सर्व पैसे परत करते. तेव्हा एक हमी म्हणून तीने सह्या केलेले दोन चेक आणि 2 लाख रुपयांचा एक चेक हे सर्व मेंबरच्या ताब्यात दिले. असे आजवर 20 लाख रुपये उकळले होते. मात्र, फोन करून, विनंती करून देखील हा पैसा निघत नव्हता.

दरम्यान, 7 मार्च 2022 रोजी दुपारच्या वेळी मेंबरला बाईचा फोन आला. त्या म्हणाल्या की, उद्या मला तुमचे सर्व पैसे द्यायचे आहेत, तुम्ही बाभळेश्वर येथे या. तेव्हा दि. 8 मार्च रोजी हे ठरल्या प्रमाणे तेथे गेले. तेव्हा महिलेने तिच्या हातात असलेली एक बॅग त्यांना दाखविली, त्यात पैशांचे बंडल होते. त्यावेळी ती म्हणाली की, पैसा असा रस्त्यावर मोजता येणार नाही. मी हॉटेलमध्ये रूम घेतली आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे हे महाशय त्यांच्या अमिषाला बळी पडले आणि थेट रुमवर गेले. दोघे आत गेल्यानंतर काय झाले हे नव्याने सांगायची गरज नाही. मात्र, तोच एक व्यक्तीने बाहेरून कडी वाजविली आणि तेव्हा खर्‍या अर्थाने हनिट्रॅपचा फास परफेक्ट आवळला गेला. त्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण सुरू केले. तेव्हा संबंधित महिलेने त्यास सपोर्ट करीत नको ते चाळे सुरू केले आणि मेंबरला दमदाटी सुरू केली. हा सर्व प्रकार केवळ पैसे उकळण्यासाठी आणि घेतलेले पैसे बुडविण्यासाठी सुरू होता. मेंबर हात जोडून विनंती करीत होता. मात्र, आता प्रश्न हाताबाहेर गेल्याने ते जे सांगतील या पलिकडे पर्याय देखील नव्हता.

दरम्यान, आहे त्या परिस्थितीत आरोपी यांनी मेंबरकडून वदवून घेतले की, आमच्यात शरिर संबंध झाले आहे, आम्ही नेहमी भेटतो अशा प्रकारचे अनेक पुरावे तयार करून घेतले आणि धमकी दिली की, घडला प्रकार जर कोणाला सांगशिल तर तुला जिवंत सोडणार नाही. तेव्हा महिलेले त्या व्यक्तीचे नाव राजेंद्र गिरी असल्याचे सांगितले. त्या पहिल्याच दिवशी या गिरीने मेंबरकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. परंतु लगेच एक रकमी इतकी रक्कम नाही मात्र, संगमनेर येथे गेल्यानंतर 4 लाख 50 हजार रुपये देतो आणि हा सर्व प्रकार येथेच रफादफा करा अशी विनंती मेंबरने केली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास गिरी हा एक ब्रेझा गाडी घेऊन संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे येऊन काही पैसे घेऊन माघारी गेला. तेव्हा आरोपी म्हणाला की मला उद्या 4 लाख 50 हजार रुपये हवे आहेत. नाहीतर तुझी अश्लिल क्लिप मी व्हायरल करेल. त्यानंतर ठरल्या प्रमाणे मेंबरने आपल्या इबरतीला घाबरुन 4 लाख 50 हजार गिरी यास दिले. आता तरी हा प्रश्न मिटेल असे मेंबरला वाटत होते. मात्र, खेळ त्यांनी सुरू केला होता. तो संपविण्यासाठी नियतिच्या मनात वेगळेच काही होते. त्यामुळे हा प्रश्न पुढे अधिक वाढत गेला.

आता आरोपी गिरीला तगडी रक्कम मिळाली होती. त्यामुळे, संबंधित महिलेला पैशाची हाव लागली आणि तिने देखील मेंबरच्या मागे ब्लॅकमेलिंगचा भुंगा लावला. दि. 17 मार्च 2022 रोजी अकोले नाका येथे दोन वेळा 15 लाख रुपये घेतले. तर गिरी याने पुन्हा चार लाखांची मागणी केली तेव्हा त्यास संगमनेर शासकिय विश्राम गृहावर 4 लाख दिले. कारण, आपण एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहोत. जर अशा प्रकारची काही क्लिप मार्केटला आली तर आपले मार्केट डाऊन व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे, इज्जतीला घाबरुन हे वारंवार पैसे देत राहिले, आरोपींनी यांच्या गरिब स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना इतके लुटले की, अक्षरश: कंगाल करु सोडले. तरी देखील गिरी याने त्यांच्याकडे एकदा चार लाखांची मागणी केली. आता मात्र मेंबर वैतागले होते. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली. पोलिसांनी मात्र सावध भुमिका घेऊन पैशांचा एक बंडल तयार केला. ज्या पद्धतीने यांनी 2018 ते 2022 या चार वर्षात मेंबरला जेरीस आणले होते. त्याच प्रमाणे एकाच सापळ्यात पोलिसांनी यांचा बुरखा फाडला. या दरम्यान 40 लाख 50 हजार रुपये आरोपींनी मेंबरकडून उकळले. म्हणजे, एखाद्याला लुटण्याच्या देखील काही सिमा असतात याची जरा देखील किव यांना आली नाही. त्यामुळे, अति तेथे माती होते असे म्हणतात ते काही खोटे नाही.

दरम्यान, नगर जिल्हा आणि त्यात संगमनेर तालुका हा पहिला गुन्हेगारांचा हॉटस्पॉट होता. त्यानंतर तो वाळु तस्करांचा झाला. हे सत्र सुरू असताना कोरोना हॉटस्पॉट आपण अनुभविला आणि नंतर गोमांस. या सगळ्यात अनैतिक बाबीत हनिट्रॅपसाठी देखील आता संगमनेर हॉट्स्पॉट झाले आहे. त्यामुळे, नगर शहर आणि संगमनेर येथे अशा प्रकारचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. सलोख्याने शरिर संबंध ठेवायचे आणि पैशाची मागणी करायची. ती पुर्ण नाही झाली की बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची. किंवा प्रेमाचे नाटक करून एखाद्या खोलीत नेवून संमतीने कृत्य करायचे आणि अश्लिल व्हिडिओ काढून लाखो रुपयांना ब्लॅकमेल करायचे. त्यामुळे, आता तरी प्रतिष्ठीत व्यक्तींना यातून धडा घेतला पाहिजे. या घटनांमधून कोणी गुन्हेगारीकडे वळले तरी कोणी आत्महत्या केल्या. कायदा पुुरुषांच्या बाजुने फार बोलत नाही. त्यामुळे, पुुरुषांनी सावध जगले आणि वागले पाहिजे. जर असा प्रकार अन्य कोणाबाबत झाला असेल तर त्यांनी पैसे देण्याच्या भानगडीत पडू नये. थेट पोलीस ठाणे गाठून या घटनांना वाचा फोडली पाहिजे. कारण, कंगाल होऊन बदनाम होण्यापेक्षा तत्काल समोर येऊन सामंजस झालेले कधीही बरे. त्यामुळे हनिट्रॅप पीडितांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.