पिंपळगावचं पाणी विझलं.! देशमुख-पिचडांवर आमदारांची टोलेबाजी.! लोकांची माथी भडकवू नका.! योजना तर मी करणारच पण..!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातील पाणी उचलायचे की नाही, हा प्रश्न कधीच मार्गी लागला आहे. मात्र, ज्यांना कारखान्यात जाण्याचे स्वप्न पडू लागले आहेत ते आणि पिचड साहेबांचे बगलबच्चे हेच फक्त राजकीय स्टण्ट करत आहे. केवळ निवडणुका तोंडावर आल्या म्हणून लोकांची माथी भडकवायची आणि संधिसाधुपणा करायचा असा ठेका काही व्यक्ती करत आहे. त्यामुळे, काही झाले तरी जोवर पिंपळगाव खांड धरणात हवे तितक्या अतिरिक्त पाण्याची आवक होत नाही. किंवा खाली पर्यायी व्यवस्था निर्माण होत नाही. तोवर जनतेच्या विरोधात एकही योजना मुळा खोर्यात होणार नाही. भलेही त्या योजनेची वर्क ऑर्डर निघाली तरी असे काम होऊ देणार नाही. फक्त जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. मात्र, काही झाले तरी मी पठार भागाला देखील पाणी देणार आहे. फक्त योग्यतो पर्याय काढूनच योजना राबविली जाईल. त्यामुळे, विरोधकांनी लोकांची माथी भडकवू नये, कर्तुत्वाचे राजकारण करावे असे मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
अकोले विधानसभा मतदार संघातील पठार भागावर असणार्या 10 गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी जल जिवण मिशन योजनेतून 65 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. आता आमदारांची भावना प्रांजळ होती. कारण, हा प्रश्न व्यवसायिक किंवा राजकीय मुळीच नव्हता. तो पिण्याच्या पाण्याचा होता, मात्र झालं काय? समोर कारखान्याच्या निवडणुका पाहिल्या आणि चारदोन डोके पेटून उठले. त्यांनी बोलबोल करता लोकांची माथी भडकविली, आमदार आणि गायकर यांना टिकेचे धनी केले. अर्थात प्रश्न शेतकर्यांच्या दृष्टीने हिताचा होता, मात्र बाऊ उभा करून आमदार हे मुळा विभागासाठी जणुकाय भोकाडीच आहे की काय? असा टेंभा मिरविण्यात काहींनी धन्यता मांडली. म्हणजे, कालवर आमदारांच्या मांडीला मांडी लावून बसणे गोड वाटत होते. मात्र, जसे गायकर आणि आमदार एकत्र आले. तेव्हापासून काही मुळा खोर्यातील नव्याने राजकारणात येऊ पाहणार्यांची स्वप्नच उध्वस्त झाले. त्यामुळे, गायकर साहेब पिंपळगाव खांड धरण उभारणीसाठी जसे खंबिरपणे उभे होते. तसे मुळा खोर्यासाठी ते तितकेच खंबिर उभे राहिले. मात्र, झालं काय? यांना आमदारांच्या तोंडून ही योजना खोडून काढायची होती. म्हणून वारांवर आमदारांच्या नावे बोटं मोडली गेली. मात्र, जेव्हा आमदारांनी पुढे येऊन स्पष्ट सांगितले. की, मुळा खोर्यातील जनतेला तथा शेतकर्यांना बाधक होईल अशी योजना मी करणार नाही. इतके स्पष्ट सांगून देखील यांच्या राजकारणाचा जाळ शांत झाला नाही. अगदी आजही संथ का होईना धुर निघतोच आहे. त्यामुळे आमदारांना पुन्हा आज माध्यमांच्या समोर यावे लागले.
आता, मुळा खोर्यातील शेतकर्यांनी देखील थोडं लक्षात घेतलं पाहिजे. की, अजित दादा यांनी आपल्याला पिंपळगाव खांड धरणाच्या माध्यमातून नवसंजिवणी दिली आहे. त्या दादांसोबत आमदार साहेब, गायकर साहेब आणि अन्य नेत्यांनी चर्चा केली आहे. यात महत्वाचे म्हणजे, खुद्द आमदार म्हणतात की, जनतेच्या विरोधात जाऊन मी कोणतीही योजना करणार नाही. मग सुज्ञ शेतकरी राजाने देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. उगच सामाजिक सलोखा बिघडवून राजकीय पोळ्या भाजू पाहणार्यांच्या तथा माथी भडकवून कारखान्यात स्थिरता मिळवू पाहणार्यांच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे? हा विषय चार-दोन सुज्ञ लोक बसली असती आणि आमदारांना सांगून प्रश्न मांडला असता तर तो सहज सुटण्यासारखा होता. मात्र, पिंपळगावचे पाणी पेटवून कारखान्याच्या बॉयलरवर काहींनी डोळा ठेवला आणि पाण्याला नको तशी दिशा मिळाली. या असल्या प्रकारामुळे तालुक्याचे राजकारण तर गलिच्छ झालेच आहे. मात्र, सामाजिक वातावरण दुषित होण्यात देखील मदत होते. मात्र, काही लोकांना तेच हवे आहे. नकळत माजी लोकप्रतिनिधींची चापलुसी करण्यात काही लोक पटाईत झाले आहेत.
आमदार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पठार भागावर मी पाणी देतो आहे. आजवर त्यांच्या मुलभूत गरजा देखील पुर्ण होऊ शकल्या नाही. मी पाणी देतोय हे देखील माजी लोकप्रतिनिधींना देखवत नाही. ते कोणाच्या डोळ्यावर येत नाही. मात्र, त्यांनी जी काही पिलावळ सोडली आहे. ते त्यांचेच प्रतिनिधीत्व करीत आहे. ते स्वत: पुढे आले तर पठार भागावरील जनता त्यांच्यावर नाराज होऊन आमदारकीच्या वेळेस दणका दाखवून देईल. त्यामुळे, त्यांनी लोकाच्या झेंड्यावर पंढरपुर करायच काम सुरू केले आहे. मात्र, मी नैतिकता ठेवली म्हणून आमदार झालो. पुढेही प्रांजळ व निष्फळ भावनेतून काम करेल. त्याचे फळ जनता देईल. मात्र, माझ्या विरोधात मुळा खोर्यातील जनतेला भडकविण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी काही खास लोक देखील निवडून त्यांना सुपार्या दिल्यासारखे काम सुरू आहे. मात्र, कर नाही त्याला डर कशाला? मी पिंपळगाव खांड धरणातून पाणी काढणार नाही. जोवर पर्यायी व्यवस्था निर्माण होत नाही. तोवर योजना होऊ देणार नाही. मी मतांची गोळाबेरीज करत नाही. तर जनतेच्या भावनांचा आदर करतो, त्यांच्या भविष्याचा विचार करतो. त्यामुळे, मुळा खोर्याने देखील मला 2019 मध्ये प्रचंड मतांनी विजयी केले आहे. त्यांचे ऋण मी अशा पद्धतीने फेडणार नाही. फक्त कोणी त्यांची माथी भडकवू नये हीच माझी विनंती आहे.
खरंतर ही योजना करण्यासाठी आम्ही पर्यायी मार्ग शोधला आहे. त्याचे प्राथमीक सर्वेक्षण देखील झाले आहे. ती अशी जागा आहे जिच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, कोणाची जमीन पाण्याखाली जाणार नाही, कोणाचा विरोध होणार नाही, फॉरेस्टला देखील हात लागणार नाही. आम्ही योग्य प्लॅनिंग केले आहे. परंतु, काही लोकांना आरोप करण्याची, अफवा पसरविण्याची, लोकांची माथी भडकविण्याची इतकी सवय झाली आहे. की, त्यांना खोटंनाट बोलुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन दिल्याशिवाय करमतच नाही. त्याचे उत्तम उदा. म्हणजे शिंद्यात बंधारा होणार नाही हे मी पुर्वीच सांगितले होते. कारण, तेथील शेतकरी आले होते, त्यांनी सांगितले की, तेथे बंधारा झाल्यास जमिनी पाण्याखाली जातात. तेव्हाच तो पर्याय मी वगळून टाकला होता. त्यानंतर साधा विचार देखील माझ्या मनात नव्हता. मात्र, काही संधीसाधू त्याच त्याच गोष्टी लोकांना सांगून खोटी माहिती देत आहेत. त्यांच्यात संभ्रम निर्माण करून देत आहेत. उलट पिंपरी येथील लोकांनी स्वत:हून पुढे येत बंधार्याची मागणी केली आहे. अर्थात लोकभावनेच्या विरोधात जाऊन काम करण्यासाठी मी आमदार झालो नाही. मी लोकशाहीला माणनारा व्यक्ती आहे. त्यामुळे, जनमत घेऊनच मी जनहितार्थ कामे करणार आहे, कोणी लोकांची दिशाभूल करु नये, खोट्या माहित्या देऊ नये, लोकांची माथी भडकवू नये असे मत डॉ. लहामटे यांनी व्यक्त करीत नाव न घेता निवृत्त अधिकार्यांची कानऊघडणी केली.
12 तारखेला आंदोलन करणार..!
पिंपळगाव खांड धरणावरुन जी काही पिण्याच्या पाण्याची योजने नेण्याचा घाट घातला आहे. तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत साध्य होऊ देणार नाही. त्यासाठी पर्यायी स्टोअर टँक तयार करा, नव्याने या योजनेसाठी सर्वे करा, त्यासाठी आम्ही मदत करु, आमदार साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे. त्यांनी देखील पर्यायी पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली असून स्वत: सर्वेक्षण देखील सुरु केले आहे. आज या प्रश्नावर आम्ही नाशिक येथील जल जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंते भुजबळ साहेब यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या योजनेचा फेरविचार करावा अशी विनंती केली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना देखील त्यांच्यापुढे मांडल्या आहेत. त्यामुळे, त्यावर सकारात्मक विचार होणार आहे. तरी देखील आपण गाफील न राहता येत्या १२ तारखेला पिंपळगाव खांड येथे आंदोलन सुरु करणार आहे. वेळ पडली तर वाट्टेल ती भुमिका घेऊ, मात्र, धरणातून पाणी खाली जाऊ देणार नाही.
- सिताराम पा.गायकर