कॉंग्रेसच्या फरार नगरसेवकाला अटक, न्यायालय म्हणाले याला पहिले ताब्यात घ्या.! पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह.! मंत्र्याच्या स्टेजवर दोन तास महाशय बसले होते.!
सार्वभौम(संगमनेर) :-
संगमनेर शहरातील दोन समाजात वाद होऊन तेढ निर्माण झाली होती. यातुनच एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले देखील झाले. एका युवकावर झालेल्या हल्यावर प्रतिहल्ला म्हणुन संगमनेर शहरातील जय जवान चौक येथे दि.9 जानेवारी 2014 साली दुपारी 2 च्या सुमारास नईम आयुब शेख व त्याचा मित्र हा गाडीवरून जात असताना त्याला दहा ते बारा जणांनी अडवुन त्याला खाली खेचले. त्याच्या गाडीवर पेट्रोल टाकुनगाडी पेटवून दिली होती. त्यानंतर नईम शेखला व त्याच्या मित्राला लोखंडी रॉडने व हॉकीस्टिकने मारहाण केली होती. त्यानंतर नईम शेख याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी करत होते. त्यांनी या संदर्भात सखोल तपास करून आठही आरोपींच्या विरुद्ध संगमनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
त्यावर न्यायालयीन प्रक्रीया म्हणुन केस चालु आहे. अद्याप त्या केस मध्ये अंतिम निकाल लागलेला नसुन केस प्रलंबित आहे. या केसच्या तारखेला आरोपींनी हजर राहणे गरजेचे असते. मात्र, आरोपी शैलेश राजगोपाल कलंत्री (कॉंग्रेस नगरसेवक) हा बहुतांश तारखांस हजर नसल्याने त्यांना 12 जानेवारी 2022 या तारखेला न्यायालयाने अटक वॉरंट काढले. तेव्हापासून प्रत्येक तारखेला ते गैरहजरच होते. त्यामुळे, कोर्टाने आरोपीवर नाराजी दाखवत त्यांचा जामीन रद्द केला. जो जमीनदार झाला होता, त्याचे प्रॉपर्टीचे देखील जप्ती वॉरंट काढून आरोपी शैलेश कलंत्री याला न्यायालयाने फरार घोषीत केले होते. काल शुक्रवार दि.17 जुन रोजी ते न्यायालयात हजर झाले असता त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कोर्टातून त्यांना पोलीस ठाण्यात आणले असता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले.
दरम्यान, आरोपी शैलेश कलंत्री हे काँग्रेसचे नगरसेवक आहे. त्यांनी भाजपचे जेष्ठनेते राधावल्लभ कासट यांचा पराभव करून ते 338 मतांनी विजयी झाले होते. पण त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते. 2014 साली झालेल्या या घटनेची केस संगमनेर येथील दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. यु. महादार साहेब यांच्या पुढे चालु आहे. नगरसेवक आरोपी शैलेश कलंत्री हे वारंवार तारखेला गैरहजर असल्याने त्यांना 12 जानेवारी 2022 रोजी अटक वॉरंट काढले. कोर्टाने पोलीस अधीक्षक याना पत्र पाठवुन कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश दिले होते. भाजपने हा मुद्दा उचलला आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय केला. यामध्ये पोलीस प्रशासनावर देखील आरोप करण्यात आले. तेव्हापासून आरोपी नगरसेवक हे शहरातून दिसेनासे झाले. त्यानंतर, काल शुक्रवार दि.17 जुन रोजी कोर्टात तारीख असल्यामुळे ते अचानक कोर्टात प्रगट झाले. नगरसेवक आरोपी शैलेश कलंत्री हे हजर झाले असता न्यायालयाने या नगरसेवक आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. कोर्टात दंडाची रक्कम 15 हजार रुपये भरून जप्ती टाळली व आरोपीचा जामीन अर्ज नव्याने कोर्टात समोर ठेवला. त्यावर कोर्टाने काल रोजी आरोपी नगरसेवकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. सदर जामीन अर्जावर सरकारी पक्ष व आरोपी पक्ष या दोघांसमक्ष सुनावणी ठेवली असताना आरोपीचा जामीन कोर्टाने आजरोजी सायंकाळी उशीराने मंजुर केला.
दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी पत्रकार परिषदेत या फरार काँग्रेसच्या नगरसेवकावर आरोप करीत शहर पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. शहर पोलीस रंगारगल्लीतील मंत्र्याच्या कार्यक्रमाला बंदोबस्तला होते. त्यांच्यासमोर हा फरार नगरसेवक मंत्र्यांच्या स्टेजवर 2 तास बसलेला होता. राष्ट्रवादीचे खासदार वंदना चव्हाण यांच्या सोबत सत्कार करताना देखील फोटो व्हायरल झाला. मंत्र्यांच्या मागे पुढे फिरून लाचार अधिकारी कोर्टाला खोटे रिपोर्ट पाठवतात. न्यायालयाने फरार घोषीत केलेले आरोपी जाहीर सभांमध्ये सत्कार करतात. मार्च पासुन फरार घोषीत केले तरी देखील कारवाई नाही.
इतकेच काय! शहर पोलिसांनी हुक्कापार्लरवर रेड केली. या रेडनंतर हुक्का पार्लरवर सापडलेले व चालवणारे यांना अटक न करता गुन्हा दाखल करा यासाठी त्यादिवशी पोलीस ठाण्यात रात्री अर्थपुर्ण तडजोड झाली त्यात गुन्हा दाखल झाला. पण, कोणाला अटक केली नाही. फरार आरोपी नगरसेवक हा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांसमोर बसलेला होता. फरार आरोपी म्हणुन ज्यांच्यावर शिक्का आहे. तो पोलीस ठाण्यात जाऊन तोडपाणी करतात. तो फरार आहे हे कोर्टाचे आदेश पोलीस निरीक्षकांच्या टेबलवर असताना देखील कारवाई नाही. हे खोटं असेल तर हुक्का पार्लरच्या कारवाईच्या दिवशीचे सी.सी.टीव्ही फुटेज पब्लिकला दाखवण्याचे नितीधैर्य मुकुंद देशमुखांनी दाखवावे असे आव्हान भाजपचे शहरअध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी पत्रकार परिषदेत केले होते.