अखेर हिंदू-मुस्लिम वादातून अकोल्याला गालबोट, धार्मिक भावना दुखावल्या, चौघांवर गुन्हा दाखल.! पोलिस ठाण्यात मॉब शिरुन घोषणाबाजी.!
सार्वभौम (अकोले) :-
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा हिच्यावरुन राज्यात नव्हे देशात सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. मुस्लिम धर्माचे संस्थापक महंम्मद पैगंबर यांच्या बाबत या महिलेने अपशब्द वापरले आणि देशभर गुन्ह्यांचे सत्र सुरु झाले. या महिलेने माफी देखील मागितली. मात्र, धर्मप्रेमी काही गप्प बसायला तयार नाही. अनेक ठिकाणी शर्माचे समर्थन होऊ लागल्याने दोन्ही समाज देशात आणि राज्यात रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. आता हे दिल्लीचे स्तोम थेट गल्लीपर्यंत येऊन पोहचले आहेत. कारण, अकोले तालुक्यातील कोतुळ येथे चौघा तरुणांनी महंम्मद पैगंबर यांच्याविषयी अक्षेपहार्य पोष्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे, कोतुळ येथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात दोन गटांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले. मात्र, कोणत्याही प्रकारे कायदा हाती न घेता मुस्लिम बांधवानी थेट अकोले पोलिस ठाणे गाठले आणि पुरावे सादर करुन चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मयुर आरोटे, स्वप्नील बोऱ्हाडे, प्रणव सोनवणे आणि रवि आण्णा कोते अशा चौघांना आरोपी करण्यात आले आहे. परवेझ आब्दुल शेख यांनी फिर्यादीचे नाव आहे. पहिल्यांदा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. मात्र, तक्रारदारांनी देखील कायद्यावर बोट ठेवले. तर, लोकशाही मार्गाने दोनशे ते तिनशे जणांचा मॉब थेट पोलीस ठाण्यात आला असता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री पोलिसांची शोध मोहिम सुरु होती. यातील काही स्वप्निल व प्रणव यास ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर हे प्रकरण झाले तेव्हा एकही नेता यात मध्यस्ती करण्यास आला नाही. केवळ, दोन्ही जाती धर्माची मानसे जोपासली तरच मतांची गोळाबेरीज करता येते. त्यामुळे, महत्वाचे इतकेच की,कोणी कोणाच्या नेत्यांसाठी वाद करु नका. जात, धर्म, राजकारण, वेळ आणि प्रगती ही कोणावाचून कोणाची आडत नाही. मी आहे म्हणून धर्म आहे असे खुळ काढा आणि सलोख्याने रहा. असे सुज्ञ व्यक्ती तेथे समजून सांगत होते.
खरंतर, देशात आणि राज्यात काय चालले आहे. या ही पलिकडे शेजारी तालुक्यात जातीय तेढ बाबत काय चालु आहे. याचे जरा देखील अनुकरण अकोले तालुक्याने केले नाही. कारण, नुपूर शर्मावर राज्यभर गुन्हे दाखल झाले, संगमनेरात देखील गुन्हा नोंदविला गेला. मात्र, साधं निवेदन देखील येथील मुस्लिम बांधवांनी दिले नाही. त्याचे कारण असे की, नको तालुक्यातील सामाजिक सलोखा बिघडायला. अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा असून येथे कधी फारसा जातीयवाद आणि धर्मवाद होताना दिसला नाही. नगर, संगमनेर, औरंगाबादप्रमाणे अकोल्याला दंगलीच्या परंपरा नाहीत. येथे बहुतांशी मुस्लिम बांधव अन्य जाती धर्माच्या लोकांशी प्रचंड जवळीकतेने वागतात, सहज विश्वासाने व्यावहार करतात. एकमेकांचे सन उत्सव साजरे करतात. त्यामुळे, हा सलोखा तालुक्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपला आहे. त्यामुळे, ती नुपूर शर्मा दिल्लीत बोलली तरी अकोल्यात वादंग व्हायला नको. शेजारी संगमनेरात तिच्यावर गुन्हा नोंदला, पण अकोल्यात नाही.! केवळ सामाजिक स्थैर्यासाठी हे दुर्लक्षित करुन चालणार नाही. मात्र, तिचे समर्थन करुन जर काही तरुण सोशल मीडियावर मुस्लिमांच्या भावना दुखवत असतील. तर मात्र हा संयम सुटेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तुम्ही तुमच्या धर्माचे पालन जरुर करा, त्याची पुजा करा, ती संस्कृती जतन करा. पण, अन्य धर्मास, त्यांच्या धर्मगुरुस, नावे ठेवण्याचा आणि त्यास बदनाम करण्याचा अधिकार कोणालाच नाही. आम्ही प्रत्येकाचा आदर करतो तर आमचा आदर नाही करता आला तर किमान अनादर तरी करु नका. हे मुस्लिम बांधवांचे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने तिनशे ते चारशे मुस्लिम बांधवानी पोलीस ठाण्यात येऊन आपली कैफियत मांडली. त्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा वाद अधिक विकोपाला जाऊ नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
खरंतर, काल चिन मधील वुहान शहरातून कोरोना जवळपास जगात घरोघरी पोहचला. अर्थात विघातक शक्ती इतकी भयंकर वेगाने पसरते. की, तिच्या गतीला पारा रहात नाही. कारण, गेल्या दोन आठवड्यात दिल्लीत बोललेली नुपूर शर्मा जगभरात जाऊन पोहचली. भाजपच्या प्रवक्त्या म्हणून त्यांचे बोलणे जबाबदार असणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी महंम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नीबाबत अक्षेपहार्य बोलुन देश पेटवून दिला. अर्थात धर्मप्रेमी यांनी तिला नको तसे उचलुन धरले आणि त्या वक्तव्यामुळे जातीय अशांतता निर्माण झाली. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत धर्मप्रेमी जागे झाले. कोणी शर्माचे समर्थन केले तर कोणी शर्मावर गुन्हा दाखल केला. त्यात मात्र, काही तरुणांचा हकनाक बळी गेला. का? याचे देखील आत्मचिंतन केले पाहिजे. कारण, काय शेअर करावे आणि काय नाही, याचे ज्ञान काही व्यक्तींना अद्याप आलेले नाही, काय केल्यानंतर सामाजिक तथा धार्मिक तेढ निर्माण होईल याचे देखील भान तरुणाना राहिले नाही. काय बोलावे आणि काय बोलु नये याचे देखील तारतम्य आजच्या नव्या पिढिला नाही. को़ण आपली माथी भडकवितो आहे, कोण समाजद्रोह करण्यास सांगतो याचे देखील मुल्यांकन करता येत नाही. तर, सोशल मीडिया वापरण्याची मुल्य काय आहेत, आलेला डेटा कसा व कोठे खर्च करावा याची जरा देखील नव्या पिढीला जाण राहिलेली नाही. तर या पलिकडे शिक्षक, पालक आणि पाल्य यांच्यात सलोखा व सामोपचार नसून फार मोठी दरी निर्माण होत चालली आहे. त्यामुळे, मुलांचे वाचन कमी होत असून संगतगूण वाईट होत चालले आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. कारण, हकनाक तरुणांवर गुन्हे दाखल होतात आणि आयुष्य बरबाद होते. अर्थात गुन्हाला जात धर्म नसतो.
खरंतर हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, फुले-शाहु-आंबेडकरांचा आहे असे म्हटले जाते. परंतु, दुर्दैवाने आजकाल खरोखर पुरोगामित्व शिल्लक राहिलय का? ती विचारधारा अस्तित्वात आहे का? हा फार मोठा संशोधनाचा भाग आहे. आजकाल निवडणुका आल्या की आपल्या नेत्यांना आरक्षण दिसतं, आमुक धर्म खतरेमे हैं.! तमुक जाती खतरेमे हैं.! ही वाक्य फार अंगवळणी पडून गेली आहेत. मात्र, सर्वात मोठे दुर्दैव असे की, जाती धर्माच्या नावाखाली अवघी तरुण मुलं हसत हसत जीव देण्याच्या भाषा करु लागले आहेत. ज्यांच्या ओठांवर निट मिसरुड फुटले नाही. तो रंगांचे आणि झेंड्यांचे कट्टर बोल बोलु लागला आहे. म्हणजे, एकेकाळी अवघ्या शंभर निधड्या छातीच्या तरुणांवर भारत देश घडवू पाहणाऱ्या स्वामी विवंकानंदांना देखील या तरुणांकडे पाहून किती वाईट वाटत असेल. जे तिरंग्यात नव्हे, रंगांच्या झेंड्यात जात, धर्म आणि पंथ शोधतात. स्वत:च्या धर्मासाठी जीव देऊ पाहतात. व्यक्ती कोणताही असो, त्याने धर्मनिर्पेक्ष वागले आणि जगले पाहिजे. प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे. अन्यथा कोणतीही विघातक कट्टरता म्हणजे आतंकवाद, दहशतवाद, नक्षलवाद यापेक्षा कमी मुळीच नाही. एकंदर, मानसाने, मानसाशी, मानसासम वागणे हे फक्त गिताचे बोल नको तर ते भारताचे वास्तव असावे हिच प्रामाणिक इच्छा.!