है रे मास्तर.! शाळेच्या मुख्यध्यापकांनी बनावट उपाध्यक्ष व पर्यवेक्षक उभा करुन 75 लाखांचा फ्रॉड केला.! सहा जणांवर गुन्हा.!

 


सार्वभौम (संगमनेर) :-

         शालेय संस्थेच्या नावे असलेल्या लेटरपॅडचा वापर करुन बनावट पर्यवेक्षक आणि अध्यक्ष उभा करुन सहा जणांनी शाळेच्या विकास कामांसाठी 75 लाख 31 हजार 350 रुपये कर्ज घेतले. मात्र, ही रक्कम संस्थेच्या किंवा शाळेच्या खात्यावर न घेता वैयक्तीक खात्यावर घेऊन तिचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला. ही घटना 2018 ते 2022 रोजी या दरम्यान संगमनेर-कोल्हेवाडी या परिसरात घडली. जेव्हा संस्थेचे अध्यक्ष बदलले तेव्हा त्यांनी या घटनेची चौकशी केली. तेव्हा, ठराव, सह्या, कागदपत्रे सर्व बनावट असल्याचे उघडकीस आले. तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र, राजकीय दबावापोटी पोलिसांनी त्यांना उभे देखील केले नाही. त्यानंतर त्यांनी न्यायालय आणि वरिष्ठ पातळीवर धाव घेतली असता त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संस्थेचे माजी अध्यक्ष करिम इस्माईल तांबोळी (मयत), जाकीर करीम तांबोळी, वसिम करीत तांबोळी (व्यापारी), नाजीम करीम तांबोळी, नाजिर इस्माईल तांबोळी (रा. लोणी, ता. राहाता) व मुख्याध्यापक प्रकाश जालिंदर वर्पे (रा. कनोली. ता. संगमनेर) यांना आरोपी करण्यात आले आहे. तर, याप्रकरणी नुतन अध्यक्ष रइस अहमद शेख (रा. समनापूर, संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

रइस अहमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे नॅशनल स्कुल चालविले जाते. तेथे विद्यार्थ्यांच्या फी मधून शाळेसाठी एक जागा खरेदी करण्यात आली होती. त्यात आरोपी यांनी अपहार केला. तर कर्जाची कोणतीही गरज नसताना मुख्याध्यापकांसह सहा जणांनी 75 लाख रुपये कर्ज काढून ते स्वत:च्या फायद्याकरीता वापरले. तर, ही संस्था 2002 पासून सुरू झाली आहे. तेव्हापासून ते सन 2022 पर्यंत संस्थेच्या कोणत्याही कामकाजात पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. संस्थेचे कधीही ऑडिट करण्यात आलेले नाही. आरोपी यांनी वारंवार खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटे ठराव करणे, खोट्या सह्या करणे त्यातून फार मोठा गैरकारभार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी दिलेल्या रकमेतून एक जागा खरेदी करण्यात आली होती. ती संस्थेच्या नावे न करता त्यांनी जाकीर तांबोळी यांच्या नावे केली. त्यानंतर त्याच जागेवर संस्थेची इमारत उभी केली. 

दरम्यान, अशा प्रकारचे गैरव्यावहार उघडकीस येऊ लागल्यानंतर आरोपी यांनी संबंधित इमारत विक्रीसाठी काढली आणि एका त्रयस्त व्यक्तीबरोबर त्याचा व्यावहार सुरू केला. आरोपींचा हा प्लॅन हानून पाडण्यासाठी फिर्यादी शेख यांनी कोर्टात धाव घेऊन मनाई हुकूम जारी केला, त्याचे कामकाज प्रलंबित आहे. दरम्यान संस्थेचे पुर्वाश्रमीचे अध्यक्ष करीम तांबोळी हे मयत झाले आहेत. ते दि. 27 जुलै 2018 नंतर अध्यक्षपदी नसताना देखील त्यांनी त्यांचे सहकारी वसिम तांबोळी जाकीर तांबोळी, मुख्याध्यापक प्रकाश वर्पे यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन संस्थेच्या नावे कर्जाची मागणी केली होती. त्यावेळी संस्थेच्या लेटरहेडवरती ते स्वत: संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून एका थेरुमेन फायनान्स कंपनीकडून 75 लाख 31 हजार 350 रुपये कर्ज घेतले. तसेच ते संस्थेच्या कामी न वापरता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व कुटुंबासाठी वापरुन फार मोठा अपहार केला. हे करण्यासाठी आरोपी नाजीम तांबोळी याने आपण संस्थेत पर्यवेक्षक असल्याचे तर नाजिर तांबोळी याने आपण उपाध्यक्ष असल्याचे भावसून ही रक्कम हडप करण्याच्या कटात सहभाग घेतला आहे.

आता ज्यावेळी आरोपी यांनी कर्ज काढले होते. त्यावेळी शाळेेला कोणत्याही परिस्थितीत पैसे तथा कर्ज घेण्याची गरज नव्हती. तसेच कर्जासाठी चॅरेटी कमिशनर किंवा शालेय व्यवस्थापन यांच्याकडून आरोपी यांनी कोणताही परवानगी घेतली नव्हती. इतकेच काय.! त्याबाबत कोणताही ठराव देखील करण्यात आलेला नाही आणि त्याहून धक्कादायक म्हणजे आलेली 75 लाख 31 हजार 350 रुपये ही रक्कम संस्थेच्या खात्यावर नाही. तर, शाळेच्या विकासासाठी देखील संबंधित रक्कम खर्च केलेली कोठेही दिसत नाही. त्यामुळेे या रकमेचा सहा आरोपींनी स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केलेला आहे. म्हणजे कर्ज आरोपी यांनी काढले आणि त्या कर्जाचे हाप्ते दरमहा 1 लाख 16 हजार 761 रुपये शाळेच्या खात्यातून वजा होत आहे. ही रक्कम आजवर 25 लाख पेक्षा जास्त रक्कम कर्जापोटी संस्थेकडून भरण्यात आली आहे. त्यामुळे फिर्यादी शेख यांनी संबंधित फायनान्स कंपनीकडे चौकशी केली असता त्यांनी काही कागदपत्रे ई-मेल केले आहेत.

आता संबंधित कागदपत्रे मिळाल्यानंतर ती कितपत खरी आहेत. त्यातील ठराव, सह्या, कगदपत्रे यांची तपासणी केली असता त्यात सर्व फ्रॉड असल्याचे समोर आले आहे. त्यात आरोपी सहा जणांनी संस्थेच्या नावे 75 लाख 31 हजार 350 रुपये कर्ज काढून या संपुर्ण रकमेचा अपहार केला आहे. या पैशाचा वापर करुन स्वत:च्या नावे मालमत्ता कमविली आहे. त्यामुळे, आरोपींच्या संपत्तीची चौकशी करुन त्यांची आत्ता कमविलेली मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर, या अपहाराबाबत संगमनेर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधिक्षक अ.नगर, शिक्षण महासंचालक पुणे यांना यापुर्वीच माहिती कळविण्यात आली आहे. मात्र, आरोपींच्या राजकीय प्रभावामुळे पोलीस कोणताही कारवाई करत नव्हते असे फिर्यादी शेख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.