पतीचे अनैतिक संबंध पकडल्याने पत्नीचा खुन, प्रेत जखमी अवस्थेत तरंगत होते.! पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
पतीचे आपल्या जवळच्याच व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे पत्नीने उघड केले. झाली चुक आता परत असले चाळे नको म्हणून समज देखील दिली. मात्र, चटक लागलेल्या पतीने तो नाद सोडून न देता आपल्या रस्त्यातला काटाच काढण्यासाठी आपल्या पत्नीचा खून केला. ही घटना सोमवार दि. 30 मे 2022 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आरती राजेंद्र मुन्तोडे (वय 35, रा. शिबलापूर, ता. संगमनेर) या महिलेचा मृत्यु झाला आहे. या महिलेचा मृतदेह आश्वी खुर्द येथील पाटाच्या पाण्यात जखमी आवस्थेत मिळुन आला आहे. त्यामुळे, यात राजेंद्र यशवंत मुन्तोड, रविंद्र यशवंत मुन्तोड, रंजना रविंद्र मुन्तोड, अलकाबाई यशवंत मुन्तोड, प्रकाश सखाराम गायकवाड, शिला प्रकाश गायकवाड अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील पाच जणांना कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी अटक केली असून एक आरोपी पसार आहे.
याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र आणि आरती यांचे काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. मात्र, राजेंद्र यास बाहेरचा नाद लागल्यामुळे, त्याचे घरात फारसे लक्ष लागत नव्हते. हा प्रकार मयत आरती हिच्या लक्षात आला होता. त्यामुळे, तिने पतीस विचारले मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र हिने आपल्या पतीवर लक्ष ठेवले. दरम्यानच्या काळात राजेंद्र हा जवळच्या एका महिलेसोबत लगट करीत असल्याचे लक्षात आले असता तिने त्यांना समजून सांगितले. मात्र, हा प्रकार तरी देखील थांबला नाही. उलट राजेंद्र याने पत्नीस बेदम मारहाण केली. नंतर मात्र, यांचा राजरोस कारभार सुरूच राहिला. त्यामुळे, हा लफडेबाजीचा आणि मारहाणीचा प्रकार मयत आरती हिने आपल्या भावांना सांगितला. त्यानंतर पाहुणे असे काय करता? आपल्याला चांगली बायको आहे मुले आहेत हे समजून सांगण्यासाठी एक बैठक देखील भरविण्यात आली. त्यानंतर पुन्हा असे काही होणार नाही. मी पत्नीस मारहाण करणार नाही, नको त्या वाटेला जाणार नाही असे चार चौघात कबुल करण्यात आले. मात्र, हे सर्व करत असताना राजेंद्र यास उपरोक्त पाचही व्यक्तींची फुस होती.
दरम्यान, यांच्यात थोडे दिवस चांगले चालले. मात्र, एक दुचाकी घ्यायची म्हणून राजेंद्र याने आपल्या पत्नीस त्रास देण्यात सुरूवात केली. तुझ्या भावांकडून पैसे आण अशी त्याने वारंवार मागणी केली. मात्र, आपल्या बहिनीला त्रास नको म्हणून भावाने दुचाकी घेण्यास पैसे देखील दिले. त्यानंतर यांचा संसार पुन्हा थोडे दिवस चांगला चालला. त्यानंतर राजेंद्र याचा गोपनीय कारभार चालुच होता. हे जेव्हा आरतीला समजले तेव्हा तिने पुन्हा त्यास जाब विचारला. मात्र, उलट तिलाच वेड्यात काढण्याचे काम राजेंद्र यशवंत मुन्तोड, रविंद्र यशवंत मुन्तोड, रंजना रविंद्र मुन्तोड, अलकाबाई यशवंत मुन्तोड, प्रकाश सखाराम गायकवाड, शिला प्रकाश गायकवाड अशा सहा जणांनी केले. मात्र, आज ना उद्या पती आणि हे सर्व लोक सुधरतील, यांना खरे काय ते माहित होईल. पती देखील योग्य वळणावर येतील असे मयत आरतीला वाटत होते असे अविनाश पोपट गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, 28 मे 2022 रोजी सकाळी 12:30 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र याने अविनाश यांना फोन केला होता. की, तुमची बहिन माझ्यासोबत वाद घालत आहे. त्यामुळे, ती माळेगाव हवेली येथे गेली आहे. त्यानंतर आरतीच्या भावांनी तिची वाट पाहिली. मात्र, तीचा कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे, तिच्या भावाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सासरी गेला असता तेथे आरोपी यांनी आरतीच्या भावास मारहाण केली. मात्र, बहिन भेटली नाही म्हणून त्याने पोलीस ठाणे गाठले आणि मिसिंग दाखल केली. त्यानंतर, प्रकाश सखाराम गायकवाड याने पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की, आरती ही माळेगाव हवेली येथे आहे. असे सांगून लेखी जबाब दिली. मात्र, तो खोटा असून केवळ पोलिसांची दिशाभूल केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दि. 30 मे 2022 रोजी सकाळी अविनाश यांना आश्वी येथून फोन आला. की, अश्वी खुर्द येथील पाटाच्या पाण्यात एक स्त्री जातीचे प्रेत पाईपला लटकलेले आढळून आले आहे. त्याची खात्री करण्यासाठी या असा निरोप आला. तेव्हा, पाटाच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढला असता तो पुर्णपणे काळानिळा झालेला होता. मात्र, ती आरती असल्याची खात्री झाली. तिच्या हातावर, पोटावर फोड आलेले होते. त्यावेळी दिसताच क्षणी हे लक्षात येत होते की, ही आत्महत्या नसून तिची हत्याच करण्यात आली आहे. त्यानंतर घटनेचा पंचनामा, शवविच्छेदन आणि अन्य गोेष्टी झाल्यानंतर अविनाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.