अताऐसो नंतर आता चलो कारखाना.! गायकर साहेबांचा राजिनामा घेऊन अगस्ती पिचडांच्या ताब्यात द्यायचा आहे.! पुढची सुपारी..!
- सागर शिंदे
अकोले (सार्वभौम) :-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही पिचड साहेबांच्या ताब्यात देण्यासाठी काही लोकांनी आंदोलन करुन आकांत तांडव केला. बहुजन नेत्यांच्या नावे बोटं मोडून त्यांची राजिनामे मागितले. पिचड आणि गायकर ह्या एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत असे भासवून आंदोलनाची दिशाभुल केली आणि अलगद एज्युकेशन संस्था पिचडांच्या स्वाधिन केली. दुर्दैव असे की, सहा महिन्याच्या मुदतीवर आंदोलनाला स्थगिती दिली. ही किती बालीशपणाची बाब आहे. मग ४० वर्षे यांनी पिचड कुटूंबाला किती ओळखले ? ही मोठी आत्मचिंतनाची बाब आहे. खरंतर जेव्हा कॉलजवर गायकर साहेबांनी त्यांचे राजिनामे आणले होते. तेव्हा ते राष्ट्रवादीचा आमदार म्हणून सामोरे गेेले होते. तेव्हा आमदारांनी त्यांची सदसद विवेकबुद्धी वापरुन ते राजिनामे स्वत:जवळ ठेवून पिचडांना आव्हान करायला पाहिजे होते. की, आमचे राजिनामे तयार आहेत. तुम्ही जोवर राजिनामे टाकत नाहीत तोवर आंदोलन मिटणार नाही. मात्र, गायकरांनी संस्थेकडे राजिनामे द्यावेत, ते स्विकारणारे आम्ही कोण? असे वाकडे तोंड करुन काहींनी हे राजिनामे संस्थेकडे देण्यास भाग पाडले आणि त्यानंतर मात्र आंदोलन मिटले. यात साध्य काय झाल? राष्ट्रवादी तथा महाविकास आघाडीतील नेत्यांना पायउतार करण्यात आमदार यशस्वी झाले, ज्यांना गायकर टारगेट करायचे होते त्यांचे बरोबर फावले, ज्यांना अताएसो पिचडांच्या ताब्यात द्यायची आहे, त्यांचा योग्य निशाणा लागला, ज्यांना संस्थेत जाण्याची इच्छा होती त्यांची नावे चर्चेत आली. म्हणजे, एकाच उद्देशाने झपाटलेली मानसे तेथे नव्हती तर बऱ्याच जणांनी आपापल्या राजकीय व वैयक्तीक पोळ्या तेथे भाजून घेतल्या. पण, ज्यांनी त्या मंडपात बसून भलीभली भाषणं ठोकली, आमचे राजिनामे आम्ही आत्ताच देतो अशी गर्जना केली. त्यांनी राजिनामे दिले का? हे देखील तालुक्याला कळुद्या.! म्हणजे ताकाला जायचे आणि गाडगे लपवायचे. हे असले पुतना मावशीचे प्रेम तालुक्यात रुजले आहे. अर्थात गायकरांचा पाडाव करण्यासाठी काही लोकांनी जो अततापणा केला. तो साध्य झाला. आता एज्युकेशन संस्था झाली. उद्यापासून हा कारखाना देखील पिचड साहेबांच्या ताब्यात देण्यासाठी कोणतरी सुपारी घेतील, तेथे देखील मंडप उभा राहिल आणि मोठमोठी भाषण होऊन गायकर साहेबांना टारगेट केले जाईल. ही टोळी पिचडांसाठी काम करेल आणि गायकर दुधसंघासारख्या ठिकाणी पिचडांना प्रचंड विरोध करुन वारंवार डोळ्यावर येतील. हेच षडयंत्र आता रचू पाहत आहे. काल एज्युकेशन संस्था होती, आज कारखाना आणि उस प्रश्न पुढे केला आहे. उद्या मंडप उभा राहिल आणि पुन्हा गायकरांच्या नावे बोटं मोडून आंदोलन उभे राहिल. आमदारकी लहामटेंकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्था पिचडांकडे बहुजन लोकं निव्वळ कुरघोड्या करीत राहतील. असे परखड मत बहुजनांचे तरुण व्यक्त करु लागले आहेत.
काय करायला हवे होते
आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे बसले म्हणून गायकर साहेबांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखविला आणि सर्व नवनियुक्त व्यक्तींचे राजिनामे लिफाफ्यात ठेऊन ते आमदारांच्या स्वाधिन केले. तेव्हा आमदारांनी ते स्विकारायला पाहिजे होते. त्यांच्या जवळ ठेवायला पाहिजे होते. त्यांनी पिचडांना आव्हान करुन ठणकावून सांगायला पाहिजे होते. आमचे राजिनामे आलेत तुमचे काय? यात महत्वाचे म्हणजे आमदारांनी स्वत: निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, त्यांच्या भोवती जी कनफुकी गँग होती. ते स्वार्थापोटी आंदोलनात आले होते, ज्यांना गायकर नावाचं वचकं येतं त्यांच्या आहारी जाऊन ते म्हणतील तसे वागणे चुक होते. आता डोंगर पोखरुन उंदिर निघाला आहे. त्यामुळे, आमदारांनी गर्दी नको पण दर्दी लोक जमा करुन आंदोलन करणे आपेक्षित आहे. त्यांच्याकडून आंदोलनाची दिशा चुकली हे त्यांनी मान्य करायला हवे, त्यांच्या प्रेमापोटी गायकर साहेबासह अन्य व्यक्तींनी राजिनामे दिले, त्या सर्वांचा अवमान झाला हे देखील अधोरेखीत केले पाहिजे, पिचड साहेब ज्या गोष्टीची अपेक्षा होती, तेच झाले हे देखील मान्य केले पाहिजे, आंदोलनात काही प्रामाणिक तर काही बोलघेवडे होते, त्यांनी द्वेषाचे राजकारण केले हे देखील वास्तव मान्य केले पाहिजे. खरंतर सार्वभौमने आमदारांच्या विरोधात लिहिले असेल तर सर्वात जास्त समर्थनार्थ देखील लिहिले आहे. त्यामुळे, जनतेला जे वाटते आहे, जी जनतेत चर्चा आहे, जे लोकांना नको आहे तेच होत आहे. हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोण्या चंगू - मंगुच्या साथीने तुम्हाला कधीच योग्य दिशा मिळणार नाही. उलट असेच अपयश मिळेल आणि करायला जाल एक अन होईल एक असेच हाती येईल. कारण, इतिहास साक्ष आहे. शंभर कौरवांना एक शकुणी मामा मार्गदर्शक म्हणून चुकीचा लाभला तर संपुर्ण हस्तिनापुरचे साम्राज्य गेले आणि अवघ्या पाच पांडवांना एक श्रीकृष्ण मार्गदर्शक होता तर होतं नव्हतं ते साम्राज्य पुन्हा मिळाले. त्यामुळे, आमदार महोदयांनी योग्य मार्गदर्शक कोण हे पहावे. कारण, या सगळ्यांनी आदोलन म्हणून कमी अन आमदार म्हणून राजिनामे दिलेत. परिनामी संस्था एक हाती आता पिचडांची झाली आहे हे वास्तव. नाकारुन चालणार नाही.....!!!
आता पुढे काय.!
तुम्ही खरच सांगा, तुम्ही १४ मागण्या मांडल्या त्यात खुले सभासदत्व हे पिचडांना फार काही जड होणार नाही. पण, खरोखर ते म्हणतील का ? की, होय आम्ही 42 लाख रुपये शिक्षक भरतीत घेतले, होय आमच्या अॅडिटमध्ये चुका आहेत, आम्ही संस्थेत अफरातफर केली आहे. होय संस्थोचे एक वेगळे खाते आहे. आमदार साहेब तुम्ही असालही हरिश्चंद्र नगरितले, पण त्यांनी गेल्या ४० वर्षात असा कधी उल्लेख केला नाही. त्यामुळे, प्लस मायनस मागण्या मान्य होतील. मात्र हाती काही येणार नाही. जे येईल तेथे फक्त गायकर, चासकर, शेटे, धुमाळ, भोर यांच्या ऐवजी कुलकर्णी, गजे, वाकचौरे, प्रकाशजी यांच्यासारखी नावे दिसून येऊ शकतील. म्हणजे आपणच आपली जीभ चावल्यासारखे होईल. त्याच्या वेदना येणाऱ्या काळात फार भयानक राहतील हे नंतर लक्षात येईल. तेव्हा मात्र वेळ निघुन गेलेली असेल. त्यामुळे, आता पुन्हा आंदोलन छेडले पाहिजे, जे राजिनामे झालेत ते स्थगित केले पाहिजे, स्वार्थी आणि पिचडांची बी टिम म्हणून काम करणाऱ्यांना बाजूला हकलले पाहिजे, आंदोलनाची दिशा ठरविली पाहिजे, कोणाला त्यावर संधी द्यायची हे ठरविले पाहिजे, महत्वाचे म्हणजे व्यक्तीद्वेष असणाऱ्यांना तेथे उभे न करता बोलघेवड्यांनाही संधी टाळली पाहिजे अशा अनेक गोष्टी विचारपुर्वक टाळल्या पाहिजे.
गायकर साहेब सावधान.
आमदार आणि पक्षाच्या प्रेमापोटी जेथे झुकायचे तेथे गायकर पाटील स्वत: सरेंडर होतात. भावना प्रामाणिक असल्या तरी त्यांची कदर होत नाही. त्यामुळे, आता तुम्ही थोडफार धुर्त राजकारणी झाले पाहिजे. आपलेच पायतान पायत नाही असे म्हणतात ते खरे आहे. कारण, तुमच्या जवळचे आणि नात्यातलेच तुमच्या मोठेपणावर टपलेले आहे. काही ठिकाणी असे दिसले आहे की, तुमच्या जवळच्यांना तुमच्या विषयी बोलता येत नाही, गरळ ओकता येत नाही. त्यामुळे ते दुसऱ्याला पुढे करतात. ते साथी देखील त्यांचे काम प्रामाणिकपणे पार पाडताना दिसतात. त्यामुळे, आजकाल भावनिक राजकारण टाळले तर बरं होईल. अन महत्वाचे म्हणजे, जे राजिनामे दिले आहेत, त्यावर वकिल टाकून अपिल केल्यास किमान पिचडांच्या विरोधात जसे दुधसंघात लढले तसे अताएसो मध्ये लढता येईल. आता तरी तुम्ही "पक्षाशी प्रामाणिक" आहात याचे "प्रमाण" कोणाला देण्याची गरज उरली नाही. त्यामुळे, ही कायदेशिर लढाई उभी करुन ती जिंकावी असे तालुक्यातील सुज्ञ लोकांना वाटते आहे. साहेब.! तुम्हाला बदनाम करुन काही महाभाग मोठे होऊ पाहतात, पण भगवान के पास देर हैं लेकीन अंधेर नाही. कारण, ज्याची नियत चांगली नाही त्याचे कधी कल्याण होत नाही. म्हणून अनेकांना राजकारणात यश नाही आणि ज्याची नियत साफ आहे. त्याच्याकडे यश स्वत:हून चालत येते. तुम्हाला बहुजन ही उपाधी जनतेने बहाल केली आहे. चार डोक्यांना त्याची अॅलर्जी असेलही पण तालुका तुमच्या पाठीशी आहे. आता जनतेने ठरवावं प्रामाणिकपणाचा अजून किती अंत पहायचा आहे.....!!!