दारुच्या कारणाहून दोघा सख्ख्या भावांनी एका तरुणास ठार मारले.! थांब तुझा मुडदा पाडतो असे म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी हत्या केलीच.! मृतदेह ताब्यात घेईना.!
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यातील पाभुळवंडी येथे दि. ४ मे २०२२ रोजी ९ वाजेच्या सुमारास दारुच्या कारणाहून किरकोळ वाद झाले होते. त्याचे रुपांतर शिविगाळ दमदाटी आणि नंतर थेट हाणामारीत झाले. त्यानंतर आरोपी यांनी मयतास व्यक्तीस मुडदा पाडण्याची धमकी दिली. त्या पहिल्या दिवशी वाद पुर्णत: मिटला होता अशी माहिती स्थानिकांनी दिली. मात्र, मारहाण झाल्याचे शल्य आरोपींना रात्रभर बोचत होते. परिणामी दि. ५ मे २०२२ रोजी सकाळी आरोपी रमेश दत्तू जाधव आणि मधुकर दत्तू जाधव (दोन्ही रा.पाभुळवाडी) या सख्ख्या भावांनी योगेश संतू भालेराव यास देवगाव शिवारात गाठविले आणि त्याला लाथाबुक्क्या व अन्य काही वस्तुच्या सहाय्याने ठार मारले. जेव्हा हा मृतदेह देवगावचे पोलीस पाटील यांनी पाहिला असता त्यांनी तत्काळ राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांना सांगितले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पहाणी केली. जेव्हा, मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला गेला. त्यानंतर मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मोठा आक्रमक पवित्रा घेतला. जोवर आरोपींना अटक करत नाही, तोवर आम्ही बॉडिला हात लावणार नाही. त्यामुळे, नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात ठाण मांडले. मात्र, काही तासानंतर समझदार मानसांच्या मध्यस्तीने सायंकाळी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या गुन्ह्यासाठी नगरहुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक अकोल्यात दाखल झाले होते. मात्र, अद्याप आरोपींचा शोध लागलेला नव्हता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील पाभुळवंडी येथे मयत योगेश भालेराव याचे छोटेसे कुटुंब आहे. त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालत होता. मयत योगेश हा आई वडिलांना शेतीत मदत करू लागत होता. तर त्याचा वेगळाही एक व्यवसाय होता. पण, बुधवार दि. 4 मे रोजी अचानक मयत योगेश रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घाई-गरबडीत घरी आला व वडिलांना म्हणाला मी गावातुन जावुन येतो असे म्हणुन तो पाभुळवंडी गावात गेला. व पुन्हा 8:30 वाजता घरी आला. तेव्हा मयत योगेश हा वडीलांना सांगु लागला की, माझे व गावातील आरोपी रमेश जाधव व त्यांच्या नातेवाईक यांच्या सोबत माझे भांडण झाले आहे. या झटापटी मध्ये मी त्याला मारले आहे. असे सांगत असतानाच आरोपी रमेश जाधव हा मयत योगेशच्या घराबाहेर आला व योगेश बाहेर ये तुला दाखवतो. तुझा मुडदा पाडतो असे बोलुन मोठं-मोठ्याने शिवीगाळ करून आरोपी रमेश जाधव हा तेथुन निघुन गेला.
दरम्यान, गुरुवारी 5 मे रोजी मयत योगेश हा आई वडिलांना म्हणाला की, मला शेंडी येथे काम आहे. मी शेंडीला जाऊन येतो. असे बोलुन मयत योगेश हा दुचाकीवर सकाळी 7 च्या सुमारास शेंडी येथे कामानिमित्त जातो. त्यानंतर सकाळी 10 वाजता देवगावचे पोलीस पाटील हे मयत योगेशच्या घरी आले. व मयत योगेशच्या वडीलांना म्हणु लागले की, तुमचा योगेश हा देवगावच्या शिवारात आंब्याच्या झाडाखाली पडलेल्या अवस्थेत आहे. तुम्ही ताबडतोब चला. असे पाटलाने सांगताच मयत योगेशचे आई वडील पाटला सोबत देवगावच्या शिवारातील आंब्याखाली जातात तेथे योगेश हा आई वडीलांना मयत अवस्थेत दिसुन आला. जेथे योगेश मयत अवस्थेत दिसुन आला ते शेत मालक मयत योगेशच्या वडीलांना म्हणाले की, सकाळी माझ्या शेतात दोन व्यक्ती मयत योगेशला घेऊन आले. व त्याला बेदम मारहाण करीत होते. मारहाण करत असताना शेतमालक आले व त्यांना म्हणाले तुम्ही येथे मारहाण करू नका तुम्ही तुमच्या घरी जा असे म्हणुन देखील त्यांनी ऐकले नाही. त्यावेळी शेत मालकाने मारहाण करणाऱ्यांना नाव विचारले असता त्यातील एकाने मी पाभुळवंडी येथील दत्तु जाधव यांचा मुलगा आहे असे सांगितले.
दरम्यान, मयत योगेशच्या वडिलांना योगेशचा खुन रमेश जाधव व मधुकर जाधव या दोघ्या सख्या भावांनीच केल्याची खात्री झाली. त्यानंतर, त्यांनी थेट राजुर पोलीस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची कैफियत पोलीस ठाण्यात सांगितली. त्यावरून रमेश दत्तु जाधव व मधुकर दत्तु जाधव (रा. पाभुळवाडी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास राजुर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक करत आहे. मात्र,आरोपीचा शोध घेण्यास अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे, आरोपी मिळेपर्यंत गावात एकच तणावाचे वातावरण आहे.