पिचड व गायकरांशिवाय कारखाना अशक्य! पण, औदा साहेबांनी सलोख्याने घ्यावं.! हलचाली सुरू..!


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

          अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा 28 वा गळीत हंगाम पार पडला. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 6 लाख 22 हजार मेट्रीक टन ऊसाची गाळप झाली. ही एक आनंदाची बाब असली तरी, ज्यांचे कारखान्यात फार मोठे योगदान आहे ते राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मधुकर पिचड साहेब आणि मा. आमदार तथा कारखान्याचे संचालक वैभव पिचड हे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे, तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात कारखान्याच्या वाटचालीत पिचड साहेबांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे, सिताराम पा.गायकर साहेब यांनी ते श्रेय्य बेशक त्यांना दिले. मात्र, कारखाना चालवायचा असेल तर राज्यातील सत्ता आणि जिल्हा बँके याशिवाय तो चालणे शक्य नाही, याची प्रचिती पिचड साहेबांना देखील आहे. त्यामुळे, ते भाजपमध्ये गेल्यापासून त्यांच्या गोटातून काही शंका-कुशंका बाहेर पडू लागल्या आहेत. की, गायकर साहेब वगळता कारखान्यात एकहाती सत्ता येणे शक्य नाही, राज्यातील सत्ता बदल होण्याचे चिन्ह नाही, कारखाना आला तरी तो चालविणे सोपे नाही, गायकर साहेबांसारखा सर्व कारभार चालविणारा, धावपळ करणारा माणूस नाही, वेळोवेळी कर्जपुरवठा होणार नाही, अन यापलिकडे जर कारखान्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर पुढे आमदारकी सोपी नाही. त्यामुळे, असे अनेकांना वाटू लागले आहे की, जसे साहेबांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थांबून घेतले तसे कारखान्याला देखील थांबून घेत आता थेट आमदारकी टार्गेट केली पाहिजे. कारण, सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा आमदारकी हेच लक्ष राहिले तर 2024 शक्य आहे. अन्यथा 2019 प्रमाणे जनप्रक्षोभ उफाळण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे, ही भाग्यलक्ष्मी टिकवायची असेल तर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहिली तर पिचड साहेबांनी थांबले पाहिजे असे मत तालुक्यातील राजकीय विश्लेषक मांडू लागले आहेत. 

एकदा का पडता काळ लागला, त्यानंतर उभे राहताना फार संयमाने चाली खेळाव्या लागतात. ही एक खेळाची रणनिती आहे. वास्तवत: अशा डावपेचांची प्रगल्भता अद्याप मा.आ.वैभव पिचड यांच्यात आलेले नाही, ना विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यात संक्रमीत झाली आहे. मात्र, पिचड साहेब हे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे, कोणता डाव कधी टाकायचा, कोणती चाल कधी खेळायची हे त्यांच्याइतके येथे कोणलाही ज्ञात नाही. घर बसल्या त्यांनी नगरपंचायत हताळली आणि बघता-बघता एकहाती सत्ता देखील आणली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आनंदून गेले. मात्र, मोठ्या साहेबांना माहित आहे, या 10 हजार मतांवर ना आमदारकी आहे, ना सहकाराच्या निवडणुका जिंकल्या जातील. त्यामुळे, पुढील निवडणुकांना ते सावध भुमिका घेतील यात शंकाच नाही. अर्थातच कारखान्याच्या बाबत जी आर्थिक परिस्थिती आहे, ती पुर्णत: राजकीय परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे, आजवर जिल्ह्याचे आणि राज्याचे राजकारण पिचड साहेब हालवत होते. आता मात्र, तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे, सगळ्यांची सोंग नाचविता येतील. मात्र, कारखाना चालविण्यासाठी लागणार्‍या कोट्यावधी रुपयांचे सोंग नाचविता येणार नाही. कारण, ही काय नगरपंचायत नाही की, निधी आला काय आणि नाही आला काय.! सर्व यंत्रणा चालुच राहिल....हा कारखाना आहे. तात्पुरते कर्ज मिळाले नाही तरी उभा खेळ पायधुळीला मिळण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे, सध्या कोणीतरी एक पाऊल मागे टाकण्याची गरज आहे. तो मागे टाकलेला पाऊल कमीपणा नव्हे तर येथील शेतकर्‍यांचा श्वास चालु राहिल, त्यांचा संसार उभा राहिल, शेतकरी आज राजा आहे तो राजाच राहिल. फक्त हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा पिचड साहेब आणि गायकर साहेब एकत्र येऊन सामोपचाराने कारखान्याच्या राजकारणावर तोडगा काढतील.

खरंतर कारखान्याचा इतिहास तपासला तर 2002 च्या निवडणुकीत तालुक्यातील शेतकर्‍याने जीव गमविला तर कोणी आयुष्याचे आधु झाले. इतके सगळे होऊन सुद्धा झालं काय? कसाबसा कारखाना वर्षे दिडवर्षे चालला. तेव्हा शिखरबँकेकडून कर्जपुरवठा होण्यासाठी त्यावेळच्या संचालक मंडळाने किती आटापिटा केला आणि त्यांना कर्ज उपलब्ध होऊ नये म्हणून साहेबांनी किती प्रयत्न केले हे सर्व आजचे विरोधक कथन करतात. त्यामुळे, राज्यात सत्ता नसताना, बँका ताब्यात नसताना, राजकिय विपक्ष परिस्थिती असताना कारखाना चालविणे वाटते तितके सोपे नाही. केंद्राच्या भरवशावर कधीही कारखाना चालु शकत नाही हे त्रिकालबाधी सत्य आहे. खरंतर, गेल्या सहा महिन्यापुर्वी स्वत: साहेबांनी कथन केले होते. की, अगस्ति कारखाना हा केंद्रसरकार दत्तक घेणार आहे. आता राज्यांची गरज नाही. तेव्हा, खुद्द गायकर साहेबांनी त्यावर पहिल्यांदा पिचड साहेबांना क्रॉस केले होते. कारण, आजवर राज्यसरकार आणि जिल्हा बँक यांनी कारखाना तारला आहे. उद्या देखील तेच तारतील अशी धुमचक्री आपल्याला पहायला मिळाली होती. मात्र, नंतरच्या काळात राज्यसरकार आणि जिल्हा बँक यांनीच कारखान्याला मदत केली. म्हणजे, केंद्रसरकार आत्मनिर्भर योजना वैगरे यातून मदत करु शकते. मात्र, अशा तुटपुंजा रकमेतून कारखाना चालणे शक्य नाही. हे अनेकांना माहित असो वा नसो, पण पिचड साहेबांना ते ज्ञात आहे. त्यामुळे, नवोदीत तरुणांच्या मत मतांतरांना बगल देऊन मोठ्या साहेबांनी राजकारण हती घेतले पाहिजे तर कारखान्याला सुगिचे दिवस लागतील...!

आता महत्वाची बाब म्हणजे, कारखाना हाती द्यायचा कोणाच्या? तर, आत्तापर्यंत साहेब सत्तेत असताना त्यांनी कारखाना सोडला नाही. ते पदसिद्ध अध्यक्ष असले तरी कारभार गायकर साहेब चालतव होते. आजही अगदी कालच्या संगता समारंभात गायकरांनी पिचड साहेबांना भाषणातून मोठेपणा दिला. कारण, त्यांचे कर्तुत्व हे कोणी अमान्य करुच शकत नाही. मात्र, आता सत्ता नाही, कोणत्याही बँका ताब्यात नाही, ते आमदार नाहीत अशा परिस्थितीत तरी त्यांनी एकदा गायकर साहेबांच्या हाती सत्ता दिली पाहिजे. अर्थात हवं तर ती एकहाती नको, तर काही विश्वासू मानसे देखील भाजपची त्यात असावी. मात्र, निवडणुका, आरोप-प्रत्यारोप आणि त्यात कारखान्याची होणारी हेळसांड ही तालुक्याच्या दृष्टीने काही योग्य नाही. त्यामुळे, पाच वर्षे आमदारकी नाही, पाच वर्षे जिल्हा बँकेत नाही तर मग पाच वर्षे कारखान्यात नसल्याने काय होणार आहे? उलट, गायकर साहेबांच्या इतकी धावपळ आणि पिचड साहेबांचा विश्वास जिंकणारी व्यक्ती अद्याप तालुक्यात जन्माला आली नाही. म्हणून तर साहेब चेअरमन असताना गेली 10 वर्षे व्हा-चेअरमन म्हणून गायकरांनी विश्वासाने सर्व कारभार पाहिला आहे. त्यामुळे, एकदा होऊद्या की बहुजनांचा चेअरमन, काय हरकत आहे? अति शहान्यांच्या हाती कारभार देण्यापेक्षा शहान्या व्यक्तींनी तो आजवर चालुन दाखविला आहे. तर बंद कोणी पाडला. हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, तालुक्याची भाग्यलक्ष्मी टिकविण्यासाठी खर्‍या अर्थाने सहमती एक्सप्रेसची गरज आहे.

आता पिचड साहेबांनी हे देखील आठविले पाहिजे. की, आज जे तुमच्या बरोबर येऊन हात मिळवणी करण्यासाठी हापापले आहेत. काल, तेच तुमच्या नावाने बोटं मोडीत होते. तुम्ही कारखाना कसा बुढीताकडे नेला, कसा कडेलोट करण्याचा प्रयत्न केला, कसे कर्ज केले, कसे कामगार भरले, कसा भोंगळ कारभार चालु आहे, कशी उसतोड होत नाही, कसा भ्रष्टाचार होत आहे हे कालपर्यंत जनतेला पटवून सांगत होते. आज, गायकर साहेब त्यांना जवळ उभे करत नाही, त्यांना राजकीय स्थैर्य देत नाही त्यामुळे, तुम्ही विरोधकांना गोड वाटू लागले आहेत. मात्र, हे शातीर मानसे आयुष्यात कधी कोणाचे होऊ शकत नाही. हीच काळ्या दगडावरची रेष आहे असे मत तालुक्यातील सुज्ञ लोक व्यक्त करीत आहे. त्यामुळे, असे म्हणतात की, सहकारात पक्ष नसतो त्यामुळे, तालुक्याची भाग्यलक्ष्मी टिकावी, येथील शेतकरी जगावा, हिरवीगार शेती कायम रहावी, आत्महत्या थांबाव्यात यासाठी सर्व काही बाजुला ठेऊन चारदोन जागा इकडे तिकडे करुन सत्ता समिकरणे आणि आर्थिक सोर्स यांचा विचार करुन पिचड साहेब आणि गायकर साहेब यांनी एकत्र येऊन बाजारबुनग्यांचा बाजार उठवावा अशा प्रकारच्या भावना कारखान्याचे कर्मचारी, कारखान्याचे काही संचालक आणि शेतकरी यांनी रोखठोक सार्वभौमशी व्यक्त केल्या आहेत.

क्रमश: भाग 1