संशयाच्या कारणाहून नवर्याने बायको ठार मारली, रात्रभर ती रक्ताच्या थोरोळ्यात पडून होती, तो कुलूप लावून गायब,! गुन्हा दाखल.!
सार्वभौम (राजूर) :-
पत्नीवर कायम वेगवेगळे संशय घेऊन नवर्याने आपल्या पत्नीची धारधार हत्याराने हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथे दि. 19 मे 2022 रोजी रात्री 8 वाजण्यापुर्वी घडली. त्यानंतर पतीने घराला कुलूप लावुन धुम ठोकली आणि त्यानंतर रात्रभर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. जेव्हा मुलाने दुसर्या दिवशी कुलूप तोडून ही घटना पाहिली तेव्हा घडला प्रकार उघड झाला. यात रंजना जगन्नाथ आडे (वय42, रा. शेलविहिरे) या महिलेचा मृत्यु झाला आहे. तर मुलाने दिलेल्या फिर्यादीनंतर जगन्नाथ भागा आडे (रा. शेलविहिरे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. यापुर्वी गेल्या आठवड्यात राजूर परिसरात पाबुभळवंडी येथे भालेराव यांची हत्या झाला होती. तर आता ही दुसरी हत्या ठरली आहे.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवार दि. 19 मे 2022 रोजी जालिंदर आडे (वय 26) हा घरातून कामासाठी बाहेर निघाला होता. तेव्हा त्याच्या आई वडिलांमध्ये वाद सुरू झाले. अर्थात यांच्या सततच्या वादाला हा देखील कंटाळला होता. वडिलांचे आईला मारहाण करणे, शंका घेणे, शिविगाळ दमदाटी करणे हे नेहमीचे झाले होते. त्यामुळे, जालिंदर याने दोघांना समजून सांगितले आणि तो घराबाहेर पडला. तेव्हा त्याचे वडिल आईला म्हणत होते की, आज तुझे कामच करतो, आज तुझा बेत पाहतो, तुला मारुनच टाकतो. त्यावेळी त्याने पुन्हा दोघांना समज दिली आणि तो कामाला उशिर झाल्यामुळे निघुन गेला. त्यानंतर दिवसभर काम केले आणि रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घरी आला असता त्याला घराला कुलूप दिसले. मात्र, आपले आई वडिल कोठेतरी गेले असतील, गावात बसले असतील किंवा मळ्यात वैगरे गेले असतील असा विचार करुन जालिंदर जवळच असणार्या मावस भावाकडे डोंगरवाडी येथे गेला.
दरम्यान, त्याने आपल्या आईला वारंवार फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील बंद येत होता. त्यामुळे, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा शेलविहिरे येथे घरी आला. तेव्हा देखील त्यांच्या घराला कुलूपच लावले होते. त्यामुळे, नेमकी आई वडिल गेले कोठे हे त्याला समजेनासे झाले. सकाळी दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्यामुळे त्याच्या मनात शंका होती. त्यामुळे कोणी काही बरेवाईट करू नये या चिंतेने तो पुन्हा आपल्या मावस भावाकडे डोंगरवाडी येथे गेला. त्याने घडला प्रकार सांगितला. तेव्हा ही दोघे गावात आले, त्यांनी अन्य ठिकाणी चौकशी केली, काही व्यक्तींना फोन करुन विचारणा केली. मात्र, कोणाकडून प्रतिदास आला नाही. त्यामुळे, यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केेला. घरात प्रवेश केेल्यानंतर पडवित डोकावले असता तेथे त्याच्या आईचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेला होता. काहीतरी कडक व धारधार हत्याराने आईची हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, आचानक आईचा रक्तरंजित मृतदेह पाहुन मुलाने टाहो फोडला. हा प्रकार कोणी केला असावा हा प्रश्न पडण्यापुर्वीच लक्षात आले होते की, सकाळी आपले वडिल म्हणत होते. आज हिला पाहुन घेतो, हिचा मर्डर करतो. अशी पार्श्वभूमी असताना बाप देखील तेथून गायब झालेला होता. तशा प्रकारची परिस्थिती होती आणि काही सबळ पुरावे देखील हाती होते. आता हा प्रकार पाहिल्यानंतर आईला दवाखान्यात नेण्यासाठी कोणी नव्हते आणि तितका वेळ देखील हाती नव्हता. कारण, आदल्या दिवशी हा प्रकार घडलेला होता. त्यामुळे, तरी देखील मुलाने मामाकडे धाव घेतली. देवगाव येथून मामांना घेऊन आल्यानंतर त्यांनी देखील पाहिले असता त्यांची बहिन मयत अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करुन आता जगन्नाथ भागा आडे (रा. शेलविहिरे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.