महिलेच्या डोक्यात दगड मारला, भाजपच्या नगरसेवकांवर दोन गुन्हे दाखल.! पानसरवाडीचे पानचट राजकारण,अकोल्यात राडा.!

 

अकोले (सार्वभौम) :- 

                             अकोले  शहरालगत असणाऱ्या पानसरवाडी येथे जागेच्या वादातून अकोले नगरपंचायतीचे मा. नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवक यांनी वाद घातले.   ही जागा काय तुमच्या बापाची आहे का? असे म्हणत नगरसेवक यांनी एका महिलेच्या डोक्यात दगड मारला.  तर, तिने आरडाओरड केली असता नगरसेवकाने दांड्याने महिलेस मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना दि. १४ मे २०२२ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात लता बंडू पवार यांनी एक फिर्याद दिली असून त्यात एक महिला नगरसेवक आणि मा.  नगरसेवक परशराम शेळके अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरी फिर्याद सुनिता आहेर यांनी दिली असून त्यात शेळके यांनी शिविगाळ, दमदाटी व अपशब्दांचा वापर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, अकोले पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे, भाजपचे जबाबदार नगरसेवक असे वागत असतील तर सामान्य नागरिकांनी त्यांच्याकडे कसा न्याय मागायचा? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर, या प्रभागात यावेळी चांगलेच राजकारण रंगले होते. एव्हाना मारामाऱ्या देखील झाल्या होत्या. मात्र, ते राजकीय वातावरण अद्याप तापलेलेच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १४ मे २०२२ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास लता पवार ह्या पानसरवाडी येथे घराचे काम करीत होत्या. त्यावेळी परसराम शेळके आणि नगरसेवक कविता शेळके ह्या तेथे आल्या. त्यांनी संबंधित जागेवर घर बांधण्यास नकार दिला. ही जागा काही तुमच्या बापाची नाही, तुम्ही येथे घर बांधायचे नाही असे म्हणत त्यांचे तेथे वादिवाद झाले. त्यावेळी, परसराम शेळके यांनी महिलेस शिविगाळ दमदाटी सुरु केली. त्यावेळी लताबाई त्यांना समजून सांगत असताना परसराम यांनी महिलेस जमिनिवर ढकलून दिले. तेथे जवळच पडलेला दगड उचलुन त्यांनी महिलेच्या डोक्यात मारला. त्यामुळे, तिच्या उजव्या बाजुला मार लागून महिला रक्तबंभाळ झाली. तर, महिलेने आरडाओरड केली असता शेळके यांनी त्यांच्या हातातील काठी महिलेच्या डाव्या हातावर जोराने मारली. तिने विरोध केला असता शेळके यांनी महिलेच्या आंगावर काठ्या मारण्यास सुरुवात केली. महिलेस प्रचंड वेदना झाल्यामुळे त्या ओरडल्या असता त्यांची मुले,  नातेवाईक आणि पती धावुन आले. तेथे यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आजी माजी नगरसेवक तेथून निघुन गेले असे फिर्यादीत म्हटले आहे.

      तर, सुनिता आहेर (रा. शेकेईवाडी, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १६ मे २०२२ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा हा तेथील पानसरे यांच्या घरी असताना माजी नगरसेवक परसराम शेळके हे तेथे आले. त्यांनी पानसरे यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्यात शिविगाळ दमदाटी सुरु होती. त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा तेथे असताना शेळके यांनी त्याला देखील शिविगाळ दमदाटी करुन धक्काबुक्की केली. हा प्रकार सुनिता ताई यांना समजला असता त्यांनी थेट पानसरवाडी गाठली आणि परसराम शेळके यांना जाब विचारला. तेव्हा, शेळके यांनी महिलेस धक्काबुक्की करुन मी तुम्हाला बघुन घेईल अशी धमकी दिली. त्यामुळे, ताईंनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि शेळके यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

कायदा हाती घेऊ नये.!

दोन्ही बाजुंचे परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही. ज्याचे त्यांचे म्हणणे ऐकुण घेतले आहे. दोन्ही बाजुंच्या व्यक्तींना समोर बोलावून त्यांना समज दिली आहे. तर, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आता जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर पुढे कठोर कारवाई केली जाईल. शुल्लक कारणाहुन कोणीही कायदा व सुव्यवस्था ब्रेक होईल असे वागू नये. गाव पातळीवर काही समझदार व्यक्तींनी एकत्र बसून सामोपचाराने असे प्रश्न सोडविले पाहिजे. आम्ही देखील तो प्रयत्न करणार आहोत. मात्र, कोणी टोकाची भुमिका घेऊन कायदा हाती घेऊ नये. हेच आवाहन नागरिकांना आहे.

       -  सपोनि मिथुन घुगे ( अकोले पोलीस)

शेळके आणि राजकारण...!

परसराम शेळके यांनी गेल्या पंचवार्षीकमध्ये नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. तेव्हापासून पानसरवाडीत एक गट वेगळा पडला आहे. त्यानंतर जेव्हा २०२२ ची निवडणुक झाली तेव्हा देखील हा प्रभाग वादग्रस्त ठरला होता. कोणत्याही प्रभागात नव्हे, पण पानसरवाडीत निवडणुकीला गालबोट लागले होते. मात्र, गोष्ट कायद्यावर आली नाही. त्याचे राजकीय पडसाद आता पुन्हा उमटताना दिसू लागले आहेत. खरंतर शेळके यांचा स्वभाव सहकार्यवादी आहे. मात्र, तितकाच तापड आणि एकतारी देखील आहे. जनतेने त्यांना एकहाती कौल दिला. त्यामुळे, त्यांच्या विजयावर प्रश्नच नाही. मात्र निवडून आल्यानंतर मतभेद विसरुन एकोप्याने रहायचे हे काही तेथे दिसत नाही. खरंतर हा मुद्दा अतिक्रमणाचा आहे. त्यासाठी त्यांनी नगरपंचायतीत तक्रार करुन कायदेशिर लढणे, विरोध करणे, अतिक्रमण काढणे अपेक्षित आहे. मात्र, असे दांडे घेऊन कायदा हाती घेणे हे काही योग्य नाही. त्यांच्या वादाचा व्हिडिओ पाहिला तर हे लोकप्रतिनिधी आहेत हे देखील अनेकांना पटणार नाही. समर्थकांना पाठीशी घालायचे आणि विरोधकांना पायदळी घ्यायचे अशी निती अयोग्य असल्याचे आता स्थानिक नागरिक बोलु लागले आहेत. यात नगरपंचायत आणि पोलीस यांनी लक्षा घालावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.