गायकरांचा राजिनामा मागुन संस्था पिचडांच्या ताब्यात देण्याची घाई कोणाला? राजिनामे नक्की घ्या.! पण, आमदारांची दिशाभूल करु नका.!



सार्वभौम (अकोले) :-

    अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड आणि सिताराम पा. गायकर ही तिघे कालपर्यंत कायम विश्वस्त होते. मात्र, आता सिताराम पाटील गायकर यांच्यावर पिचड साहेबांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे, त्यांचे बहुमत धोक्यात आले होते. म्हणून त्यांनी गिरजाजी जाधव यांना महत्वाचा हुकमी चौकट पपलु म्हणून बसविले. आता पिचड साहेबांसह तिघांमध्ये बहुमत होते. त्यामुळे, त्यांना टेन्शन नाही. मात्र, सिताराम पा. गायकर यांची कोंडी करून त्यांचा राजिनामा घेण्यासाठी काही राजकीय मंडळी टपली आहेत. अर्थात गायकर साहेब हे राजिनामा द्यायला तयार देखील आहेत. मात्र, त्यांनी राजिनामा दिल्यानंतर संपुर्ण संस्था ही पिचड साहेबांच्या ताब्यात देण्याची घाई कोणाला झाली आहे.? याचा शोध खर्‍या अर्थाने घेणे गरजेचे आहे. गेल्या 40 वर्षात येथे भल्याभल्यांनी तडजोडीचे राजकारण केले आहे. म्हणून तर एकच घराणे 40 वर्षे तालुक्यावर अधिराज्य गाजवत राहिले. तेव्हा या काही महाशयांना का नाही घराणेशाही आठवली? भल्याभल्यांनी मोठ्या साहेबांच्या विरोधात राहुन सहमत एक्सप्रेसने आतून सपोर्ट केला. तेव्हा त्यावर का कोणाला भाष्य करु वाटले नाही.? आज गेल्या 20 वर्षापासून गायकर साहेब विश्वस्त आहेत, त्यांनी काही केलं की त्यांचे नाव घेऊन राजकारण करायचे आणि तालुकाभर बहुजन नेता म्हणजे काय? असा डांका पिटायचा. मला त्यांच्याबाबत सहानुभूती नाही. मात्र, त्यांच्या आडून जो कोणी ही संस्था पिचड साहेबांच्या ताब्यात देऊ पाहतो आहे. त्यांचे पितड उघडे पाडायचे आहे. नगरपंचायतीत ज्यांनी गायकर आणि लहामटे नावाने बोटं मोडली, त्याचा परिणाम आज पिचडांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे, दुसर्‍याचे शत्रु मोजण्यापेक्षा आमदारांनी आपल्यातले फितुर मोजले पाहिजे असे मत तालुक्यातील सुज्ञ व्यक्तींकडून निघु लागले आहे. तर काही झालं तरी चालेल डॉक्टर  जीव गेला तरी बेहत्तर आम्ही आज, उद्या आणि अखेरच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबतीने रात्र उरावर काढू असे म्हणणारे किती लोक रात्री तुमच्या सोबत होते. अनेकांना माहित होते. आंदोलनाची धार फार काळ रहात नाही. त्यामुळे, पहिला दिवस डॉक्टरांचा असे म्हणून कितीजण निघून गेले. आधी लगिन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, असे म्हणणारे किती जबाबदार नेते भेटले? हा फार आत्मचिंतनाचा विषय आहे. डॉक्टर लहामटे म्हणजे फार साधाभोळा माणूस. पण, मावळे आणि कावळे.! फार शातीर. आता खरतर, डॉ. किरण लहामटे सोडा, पण, एक आमदार म्हणून आता पिचड साहेबांनी राजूर सोडले पाहिजे. कॉलेजवर येऊन लोकप्रतिनिधिंशी चर्चा केली पाहिजे. कारण, साहेब स्वत: 35 वर्षे त्या पदाचे मानकरी होते. त्यांनी त्याची गरिमा राखून चर्चेला आलं पाहिजे असे जनता बोलु लागली आहे. अन्यथा आज मोठ्या साहेबांना जी सहानुभूती आहे. ती कमी होण्यास वेळ लागणार नाही. 

खरंतर ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा प्रकारचे राजकारण तालुक्यात राजु होऊ पाहत आहे. हे अन्य कोठे नाही, परंतु राष्ट्रवादी पक्षात जास्त दिसून येत आहे. कारण, आजकाल कोणाला कारखान्यात बसायचे आहे तर कोणाला जिल्हा परिषदेचे तिकीट हवे आहे. कोणाला दुधसंघ हवा तर कोणाला पंचायत समितीचे तिकीट. त्यामुळे, याची वाटप करताना आमदार महोदय कोणाला विचारात घेतील.? तर अर्थातच सिताराम पा.गायकर यांना. त्यामुळे, त्यांना विरोध करायचा आणि आपले अस्तित्व सिद्ध करायचे असा पायंडा त्यांच्याच पक्षातील काही व्यक्तींनी पाडला आहेे. कोणी अजित दादांचे नाव घेऊन राजकारण करतय तर कोणी आमदारांच्या स्वभावाचा फायदा घेऊन टिमक्या वाजवतय. कारखान्याच्याबाबत तर त्यांना जेरीस आणले आहे. अगस्ति कारखान्याची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन कोणी अर्ज करतय तर कोणी हायकोर्टात अपिल करतय, कोणी आयुक्तांकडे तक्रारी करतय तर काही व्हाटसअ‍ॅप पुढारी स्टेटस ठेऊन बदनाम्या करतय, कोणी सुपारी घेऊन सोशल मीडिवर लिहीतय तर कोणी धोतरं उडवतय.! किती हा व्यक्तीद्वेष? किती सत्तेची हाव, किती गलिच्छ पातळीचे राजकारण आणि किती अट्टाहास.! या तालुक्यातील नेत्यांनी एकदा तरी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

ते बहुजन नेते असेल नसेल ते समाज ठरवेल, एव्हाना ते ठरविले आहे. त्या शब्दाची कोणाला अ‍ॅलर्जी होत असेल तो त्याचा प्रश्न. मात्र, राज्यात कोठेच अशी घराणेशाही नाही का? तालुक्यात पिचड साहेबांनी ती अवलंबविली नाही का? खुद्द पवार साहेब, देशमुख, राणे, पाटील, भोईर, विखे, थोरात यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिले नाही का? मग जे स्वत:ला ज्येष्ठ किंवा राज्याचे नेते म्हणून घेतात त्यांनी थोडं राज्याच्या घराणेशाहीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. खरंतर गायकरांनी स्वत :च्या नव्हे अनेक घरान्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. गोरगरिब मुलांना नोकर्‍या दिल्या आहेत. एक राजकीय किंवा कौटुंबिक हेतू म्हणून कोण धेय्यधोरणे आखून काम करत नाही असे दिसत नाही. सगळेच कारतात. म्हणजे केलं तरी नालायक आणि नाही केलं तरी नालायक हा काय प्रकार आहे.? घोड्यावरही बसायचं नाही आणि पायी देखील चालयचं नाही. याच्याइतकी गलिच्छ पातळी कोणती नाही. केवळ, विरोध करायचा आणि चर्चेत यायचे, मानसिक त्रास देऊन आम्ही प्रचंड हुशार आहोत या अविर्भावात राजकीय गणिते आखायची हे काही बरे नाही. मधल्या काळात तर अक्षरश: चारित्र्य हनन करण्याइतपत काहींची मजल गेली होती. तेथे माफी मागितली आणि आता कागदी घोडे रंगविण्याचे काम काहींनी सुरू केले आहेत. त्यामुळे, हेतुपूर्वक त्रास देऊन सत्ता मिळविण्याच्या पद्धती तालुक्यात रुढ होऊ लागल्या आहेत.

वास्तवत: पिचड साहेब 35 वर्षे तालुक्याचे आमदार होते. त्यांनी राज्याचे देखील प्रतिनिधीत्व केले. या दरम्यानच्या काळात त्यांनी अकोले तालुक्यातील संस्थांमध्ये स्वत:चे वर्चस्व प्रस्तापित केले. त्यात बहुजन सामाजाच्या माणसांना प्रतिनिधित्व देण्यात गायकर साहेबांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, आजकाल आतृप्त आत्म्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे, ते पिचड साहेबांवर नव्हे.! गायकर साहेबांना टारगेट करुन आपले राजकीय महत्व वाढवून घेत आहे. काल जे आंदोलन सुरू झाले त्यात अनेकांनी गायकर साहेबांना केंद्रस्थानी घेतले आहे. म्हतारी मेली तरी चालेल. परंतु काळ सोकावता कामा नये.! पिचड साहेबांच्या ताब्यात संस्था गेली तरी चालेल. मात्र, गायकर साहेबांचा राजिनामा घेतल्याशिवाय रहायचे नाही. यासाठी सहा जणांनी अगदी नियोजनपुर्वक कट रचल्याची खात्रीशीर माहिती सार्वभौमच्या हाती आली होती. हे आंदोलन उगच अयशस्वि व्हायला नको म्हणून आंदोलनापुर्वी मुद्दाम वृत्तांकन केले नाही. कारण, शिक्षण संस्था ही वाघीण आहे ती टिकली पाहिजे तेथे राजकारण नको. मात्र, आंदोलनाला चंगु आणि मंगुने वेगळे रुप द्यायला सुरुवात केली. एकीकडे आंदोलनाच्या तर दुसरीकडे कारखान्याच्या बातम्या शेअर होत होत्या. तेव्हाच आंदोलनासाठी निर्माण केलेल्या गृपवर तशी सुचना टाकली होती. मात्र, त्याकडे जाणकारांनी दुर्लक्ष केले. इतकेच काय? डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले तर गायकर साहेब विश्वस्त पदाचा राजिनामा द्यायला तयार आहेत. इतकी प्रांजळ भुमिका गायकर साहेबांनी त्यांनी मांडली होती. मात्र, या कटात डॉ. लहामटे सामिल नसल्याने त्यांनी राजिनामा देण्यास नकार दिला. ते स्वत: याबाबत अनभिज्ञ होते. त्यांची प्रांजळ भुमिका होती. गायकरांनी राजिनामा दिला तर संस्था पिचडांच्या मालकिची होईल. आता हे डॉक्टर समजू शकतात मग बाकीचे काय दुधखुळे आहेत का? त्यामुळे, "वान गायीचा आणि गुण गाढवाचा" असे रुप ज्यांनी परिधान केले आहे. त्यांचे कारणामे बाहेर येत नाही असे काही नाही. कारण, मांजर दुध पिताना डोळे झाकते, जग सर्व पाहत असतं..... गायकर हे एक संयमी नेतृत्व आहे. त्यांना कोणाच्या उंगल्या करायला आवडत नाही, ना कोणाच्या वाटा ते आडवतात. त्यामुळे, येणार्‍या काळात जनतेने ठरविले पाहिजे, कुरघोडीच्या राजकारण्यांना थारा द्यायचा की आमदार आणि गायकरांसारख्या प्रांजळ मानसांना..!! असे गलिच्छ राजकारण देशात पाहिले नाही....छी...!!!!