सप्त्यात दारु ढोसून आला, त्याचा भोकसून खून केला.! तो म्हणाला सकाळपर्यंत मी त्याला ठार करणार अन त्याने केलेच, संगमनेरात आरोपीस अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द गावात दारूच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या झटापटीत तोंडावर लाकुड मारले म्हणुन याची खुन्नस काढण्यासाठी धारधार शस्राने एकाची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.16 ते 17 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. यात प्रकाश उर्फ पप्पु दुर्योधन गोफणे (वय 32 रा. संगमनेर खुर्द,ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. हा खुन कोणी केला असा प्रश्न पडलेला असताना संगमनेर शहर पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे. यात सुरज सोमनाथ जेडगुले (वय 18 रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) यानेच ही निघृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपीचा मागमुस घेण्यासाठी शहर पोलिसांनी आपली प्रतिष्ठा सकाळपासून पणाला लावली होती. त्यात त्यांना अवघ्या काही तासात यश आले असून जेडगुले यास बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत प्रकाश उर्फ पप्पु दुर्योधन गोफणे व त्याची पत्नी हे मजुरी करून आपले गुजरान करत होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. संगमनेर खुर्द गावात रहिवासी असल्याने गावाच्या हनुमान जयंतीचा अखंड हरिनाम सप्ताह बसला आहे. गावात रामोशी समाजाच्या वतीने सप्त्यामध्ये पंगत द्यायची होती. त्यामुळे, समाजाचे लोक एकत्र आले होते. पंगतीची तयारी करत असतानाच आरोपी सुरज जेडगुले हा दारू पेऊन आला. तेथे मयत प्रकाश गोफणे व आरोपी सुरज जेडगुले यांच्या मध्ये दारूच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर झटापटीत झाले. यामध्ये मयत प्रकाश याने सुरजच्या तोंडावर लाकुड मारले. त्यानंतर मयताच्या भावाने हे भांडण सोडवले. त्यानंतर, आरोपी सुरज हा तेथुन निघुन गेला. सप्त्याची पंगत रात्री 9 वाजता चालू झाल्याने मयत प्रकाश हा जेवण करण्यासाठी सप्त्यात गेला होता.
दरम्यान, मयत प्रकाश यांचे भाऊ सप्त्याचे फ्लेक्स बोर्ड गावात लावत असताना रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान आरोपी सुरज हा त्यांच्याजवळ गेला व म्हणाला की, आता तुम्ही आमच्या भांडणामध्ये पडू नका. मी प्रकाश याला सकाळपर्यंत जिवंत ठेवणार नाही. असे म्हणून आरोपी सुरज हा तेथुन निघून गेला. त्यानंतर मयताचे भाऊ घरी गेले असता शेजारी राहणारा मयत प्रकाश व त्याची पत्नी घरी नव्हती. त्यामुळे, एवढ्या रात्रीचे कुठे गेले असावे म्हणुन मयताची आई व भाऊ गावात शोध घेऊ लागले. आजूबाजूचा परिसर देखील शोधला तरी ते सापडले नाही शेवट 2:30 वाजता मयताचे भाऊ घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मयताच्या भावाला उठवण्यासाठी एक तरुण आला व त्याने सांगितले की, मयत प्रकाश हा सुपेकर वस्तीवर चिंचेखाली पडलेला होता.
दरम्यान, मयताचा भाऊ सुपेकर वस्तीवर गेला असता तिथे पाहिले तर प्रकाश हा मयत अवस्थेत पडला होता. त्याच्या पोटावर डाव्याबाजूने मोठा चाकूचा वार होता. पाटीवर पुर्ण खरचटलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला भाऊ पाहुन त्यांनी पोलिसांना फोन केला. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाऊन पंचनामा करून तात्काळ घटनेची माहिती घेतली. आणि आरोपी सुरज जेडगुले हा पसार होण्याच्या आत त्यास बेड्या ठोकल्या आहेत.