पाच लाखांसाठी पत्नीला फाशी देऊन मारले.! पाच जणांवर गुन्हा, दोघांना अटक, पोलीस ठाण्यात राडा आणि लाठीचार्ज.!

                                                   


सार्वभौम (संगमनेर) :-

        संगमनेर शहराजवळ असणार्‍या घुलेवाडी येथील टायरचे दुकान मोठे करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपयांची मागणी पतीने केली होती. मात्र, त्याची इच्छा पुर्ण केली नाही म्हणून त्याने आपल्या पत्नीला फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. 16 एप्रिल 2022 रोजी घडली आहे. यात रविना सुनिल सांगळे (वय 26, रा. सोनेवाडी, ता. संगमनेर) हिचा मृत्यु झाला असून तिच्या नातेवाईकांनी आज पोलीस पोलीस ठाण्यात येऊन मोठा राडा केला. आमच्या मुलीची आत्महत्या नसून हत्या केली आहे त्यामुळे, कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्याचा अग्रह धरण्यात आला. यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हाद्दीत प्रचंड मोठा जमाव आल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती हाती आली आहे. पोलिसांच्या दबावानंतर देखील नातेवाईक त्यांच्या मतावर ठाम राहिल्यामुळे, रविना हिच्या मृत्यूला जबाबदार धरुन पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविना हिचा विवाह 21 मार्च 2016 रोजी सुनिल सांगळे (रा. सोनेवाडी) याच्यासोबत झाला होता. त्यानंतर सुनिल याचे टायरचे दुकान चांगले चालत होते. मात्र, ते अधिक मोठे करण्यासाठी त्याच्याकडे फारसा पैसा नव्हता. त्यामुळे, त्याने आहे तसेच दुकान सुरू ठेवले. दरम्यानच्या काळात यांचा संसार चांगला चालला होता. मात्र, कालांतराने आपले दुकान मोठे झाले पाहिजे. म्हणून सुनिलने त्याची मयत पत्नी रविना हिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तु काहीही कर आणि तुझ्या माहेरहून तेव्हढे पैसे घेऊन ये असा त्याने वारंवार तगादा लावला. मात्र, वडिलांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिने त्यांना फारकाही त्रास दिला नाही. मात्र, पैशासाठी रविनाला वारंवार मारहाण करणे, तिला उपाशीपोटी ठेवणे, घालुन पाडून बोलणे, तिचा अपमान करणे, शिविगाळ, दमदाटी आणि मारहाण करणे असे प्रकार होऊ लागले होते.

दरम्यान, सासरी अशी परिस्थिती असताना देखील माहेरी त्रास नको म्हणून तीने यांना काही एक सांगितले नाही. त्यामुळे, सासरी त्रास वाढत गेला. वारंवार शिविगाळ आणि मारहाण होत असल्यामुळे तिने हा प्रकार आपल्या नातेवाईकांच्या कानावर घातला होता. मात्र, आज-ऊद्या या प्रश्नावर उत्तर निघेल असे म्हणून यांनी समजून घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दि. 15 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल या दरम्यान आरोपी यांनी रविनाला संपविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राहत्या घरी या मुलीस गळफास देऊन मारुन टाकले असे शांताराम वनवे (रा. जांभुळवाडी, हिवरगाव पाठार, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी सुनिल बबन सांगळे, बबन दत्तात्रय सांगळे, तानाजी बबन सांगळे, यांच्यासह अन्य दोन महिलांवर हत्या केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.

दरम्यान, मुलीच्या हत्येची बातमी समजली असता वनवे कुटुंबाने आक्रमक रुप धारण केले. काही लोक म्हणत होते की, ही आत्महत्या आहे त्यामुळे, यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नुसार गुन्हा नोंदविला जाईल. मात्र, ही आत्महत्या नसून हत्याच केली आहे. त्यामुळे, अहवाल वैगरे सोडा, कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली होती. त्यामुळे, पोलीस आणि फिर्यादीचे नातेवाईक यांच्यात मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाली. तर धक्काबुक्की प्रमाणे काही प्रकार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे, पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून यात नंतर वैद्यकीय अहवाल आणि अन्य काही बाबी लक्षात आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे अशी माहिती खात्याकडून मिळाली आहे.