अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कळसच्या चौघांना अटक, संगमनेर अकोल्याचे अनेक गुन्हे उघड.!



सार्वभौम (अकोले) :-

                अकोले तालुक्यासह संगमनेर, कोपरगाव, घारगाव अशा अनेक ठिकाणी विहिर आणि नदीवरील मोटर चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी विशेष पथक तयार करुन लक्ष घातले होते. त्यामुळे, तालुक्यात कोंम्बींग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात अकोल्यातील कळस येथून चार दरोडेखोरांना या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून काही पाण्याच्या मोटारी व अन्य 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भाऊसाहेब तुकाराम डोके, संदिप सखाराम पथवे, विकास वसंत वाकचौरे, निलेश गोरख अगविले (सर्व रा, कळस बु. ता. अकोले. जि. अ.नगर) अशा चौघांना पोलिसांनी अटक करुन आज न्यायालयासमोर हजर केले होते. त्यांना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या अनेक घटना घडत होत्या. सहा महिन्यांपुर्वी तालुक्यात एकाच वेळी मेहेंदुरी, विठे ते चितळवेढे असा चोरीचा सपाटा लागला होता. तर, अकोल्यात देखील धान्यचोरी आणि पिकांची चोरी होत होती. त्या पाठोपाठ आता शेतातील विहिरी आणि नद्यांवरील पाण्याच्या इलेक्ट्रॉनिक मोटारी देखील चोरीच्या घटना वाढत चालल्या होत्या. त्यामुळे, शेतकरी हैरान झाले होते. एकीकडे कोरोनाच्या भयानक संकटामुळे, शेतकरी हतबल झाला होता. आता कोठे शेतातील माल मार्केटला जातो कोठे नाहीतर पाण्याचे वांदे आणि त्यात पाणी उपलब्ध झाले तर मोटारी चोरी जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे, शेतातील पीक तोंडाशी आल्यानंतर ते शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत जळून जात होते. त्यामुळे, हतबल शेतकर्‍यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपली कैफीयत सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यापुढे मांडली.

त्यानंतर, घुगे यांनी या चोर्‍यांची गांभीर्याने दखल घेतली. ज्या काही ठिकाणी संशयीत लोक मिळून येत होते. त्या परिसरात घुगे यांनी नाकाबंदी लावली. एका पथकाने नाईट पेट्रोलिंग करुन संशयीतांवर लक्ष ठेवले आणि जेव्हा चोरट्यांवरील शंका खरी ठरली तेव्हा कोंम्बिंग ऑपरेशन करुन कळस येथून काहींना ताब्यात घेतले. दरम्यान, भाऊसाहेब तुकाराम डोके, संदिप सखाराम पथवे (रा. कळस, ता. अकोले) या दोघांना अटक केली असता त्यांच्याकडे चोरीबाबत चौकशी केली. मात्र, आम्ही अशी कामे करीत नाही. त्यामुळे, आम्हाला सोडा अशी त्यांनी विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांना वर्दीचा इंगा दाखविला असता ही दोघे पोपटासारखे बोलु लागले. त्यांनी सांगितले की, आम्ही विकास वसंत वाकचौरे, निलेश गोरख अगविले (रा, कळस बु. ता. अकोले) यांच्या मदतीने चोर्‍या केल्या आहेत. तेव्हा यांच्या घराची झडती घेतली असता त्यात काही पाण्याच्या मोटारी मिळून आल्या. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले होते. कोर्टाने यांना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यात देखील त्यांनी काही गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. 


दरम्यान, यात भाऊसाहेब तुकाराम डोके याच्यावर संगमनेर शहर, कोपरगाव, संगमनेर तालुका, घारगाव, संगमनेर तालुका आणि अकोले अशा सहा ठिकाणी चोर्‍या घरफोड्यांची गुन्हे दाखल आहेत. तर, संदिप पथवे याच्यावर ओतूर, आळेफाटा आणि अकोले अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सद्या यांच्याकडून काही गुन्ह्यांची उकल झाली आहे. मात्र, पुढे देखील अधिक गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता घुगे यांनी दिली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे सफौ शेख,पोकॉ विजय खुळे, पोकॉ आंनद मैड, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, यांनी केली असुन पुढील तपास सफौ एम आय शेख हे करीत आहे.