बाप रे.! 12 वर्षाचा मुलगा 20 वर्षाचा समजून पोलिसांनी जेलमध्ये टाकला.! पाच महिन्यांपासून तो जेलमध्ये सडतोय.! वा.! संगमनेर पोलीस...

 

संगमनेर :- 

               संगमनेर शहर पोलिसांचा एक भयानक कारणामा समोर आला आहे. दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी त्यांनी कोल्हेवाडी रोड परिसरातून ताब्यात घेतली होती. त्यात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा देखील होता. त्याला ताब्यात घेतले आणि अटक पंचनाम्यात 20 वर्षाचे दाखविले. चक्क तो अल्पवयीन मुलगा पाच महिने यांनी जेलमध्ये ठेवला असून त्याला पोलिसांनी जामीन देखील होऊ दिला नाही. त्यामुळे, पोलीस निरिक्षक, तपासी अधिकारी आणि पोलीस उपाधिक्षक यांच्या तपास व मार्गदर्शनावर कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पाच महिने एक 12 वर्षाचा विधी संघर्ष बालक जेलमध्ये रहाणे ही फार मोठी धक्का देणारी बाब आहे. त्यामुळे, यात आता मानव हक्क आयोग देखील ऐंन्ट्री करणार असून शहर पोलिसांच्या या भोंगळ कारभाराने यांच्या तपासाची आब्रु वेशीवर टांगली गेली आहे. या प्रकरणात कोर्टाने तपासी अधिकारी यांना नोटीस बजावली असून त्यांचे उत्तर मागविले आहे. त्यामुळे, तपासी अधिकाऱ्यांची भांबोरी उडाली आहे. मात्र, यात इतकी मोठी चुक होऊ या अधिकाऱ्याला पोलीस निरिक्षक ते पोलीस अधिक्षक असे सर्व अधिकारी पाठीशी घालतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हा तपासी अधिकारी साधा सोपा नाही. तो वर्दीतला महत्वाचा "कलेक्टर" आहे. तो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांना "अर्थपुर्ण" तडजोडीतून खुश करतो.  मात्र, पोलिसांची भुमिका काहीही असली तरी याबाबत उच्च न्यायालयात रिट दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. के.डी. दारोळे यांनी दिली आहे. या प्रकरणात हेबीअस कॉर्पसचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी. की, रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री संगमनेर पोलीस कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत होते. त्यांना गोपनिय बातमीदाराने माहिती दिली. की, काही दरोडेखोर कोल्हेवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर शहर पोलिसांनी तत्काळ त्या भागात गस्त घालायला सुरुवात केली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना काही संशयीत व्यक्ती दिसून आल्या त्यानुसार पोलीस रात्री दोन वाजेपर्यंत गस्त घालत होते. या दरम्यान पोलिसांनी सलिम अकबर पठाण (रा. जमजम कॉलनीं संगमनेर, अलीम अकबर पठाण (रा. जमजम कॉलनी संगमनेर), वसीम मन्सुर शख (रा. मदिनानगर, संगमनेर) निलेश बाळासाहब शेळके (रा. वाघापुर ता, सगमनर, सलमान अकबर पठाण (रा.घुलेवाडी सगमनेर) आणि 12 वर्षीय बालक अशा सहा जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, कोणत्याही प्रकारची खात्री न करता पोलिसांनी स्वत: अंदाजाने फिर्यादीत अल्पवयीन मुलाचे वय 19 टाकले आणि त्यांना अटक केली. यापेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे हा की या गुन्ह्याचा तपास ज्या अधिकाऱ्याकडे गेला त्या महाशयांनी चक्क अटक पंचनामा करताना या अल्पवयीन मुलाचे वय तपासुन पहायच्या ऐवजी वर्षे 20 टाकले. त्यामुळे, पोलीस शुद्धीत राहून तपास करतात की नाही? असा प्रश्न अनेक तज्ञांनी उपस्थित केला आहे.

          यातील विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांनी या तरुणास बेड्या देखील ठोकल्याचे समोर येऊ लागले आहेत. ते पुरावे देखील लवकर कोर्टापुढे मांडले जाणार आहेत. मुळात आरोपींचे वय तपासणे, सबळ कागदपत्र दोषारोपपत्रात सामाविष्ठ करणे, अल्पवयीन मुलांना बेड्या न ठोकणे हे सर्व पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी होताना शिकविले जाते. मात्र, हा लेक्चर सुरु असताना हे अधिकारी रजेवर होते की काय? असा प्रश्न तज्ञांना पडला आहे. इतकेच काय.! अल्पवयीन मुले आरोपी असतील तर त्यांच्या समोर खाकी वर्दीचा गणवेश देखील परिधान करुन जाता येत नाही. मात्र, तपासी अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून अल्पवयीन मुलावर बळजबरीचा रामराम ठोकला आहे. त्यामुळे, भेदरलेले बालक घाबरुन गेले आणि पोलिसांच्या प्रत्येक सुरात सुर मिसळीत गेले. त्यामुळे,  पोलिसांच्या या धिटाईपणामुळे एक 12 वर्षाचा बालक पाच महिन्यांपासून जेलमध्ये आहे. खरंतर पोलिसांचे ब्रिदवक्य आहे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" पण पोलिस 12 वर्षाच्या मुलासाठी खलनायक ठरले आहेत. यासाठी आता कायदेशील लढा उभारणार असल्याची माहिती भाजपाचे नेते ॲड. रविंद्र शेळके, ॲड. विनय लंकेश्वर, ॲड. सागर शिंदे यांनी दिली आहे.

          

दरम्यान, हा गंभीर गुन्हा आहे. या अल्पवयीन बालकाची जन्मतारीख पाहिली तर तो 12 वर्षे 1 महिना 8 दिवसांचा असताना अटक केल्याचे त्याच्या जन्मदाखल्यावर दिसत आहे. हा दाखला मुलाच्या आई वडिलांनी कोर्टात दाखल केला आहे. पोलिसांनी फक्त त्याच्या शेजाऱ्याला सांगून या बालकास अटक केली आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यात हा बालक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यामुळे त्याचे आई वडिल त्याला शोधत उत्तर प्रदेशहून संगमनेरला आले. तेव्हा त्यांना मुलगा अटक असल्याचे समजले. पोलिसांनी त्याचे वय, त्याचे आई बाप काहीच शोधायचा प्रयत्न केला नाही. इथे अजमल कसाबला देखील न्याय मागायची संधी दिली. पण, या बालकाच्या आई वडिलांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना काही स्वारस्य वाटले नाही. एका गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसानी स्वत: गुन्हा केला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, चुकीला माफी नाही या उक्तीप्रमाणे आता पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन हे यात काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. पोलिसांची भुमिका कायद्याला धरुन सखोल तपास करण्याची असते. ती भुमिका तपासी अधिकाऱ्यांनी चोख बजावलेली नाही. न्याय देवता म्हणते शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरापराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. इथे एक 12 वर्षाचा बालक चक्क पाच महिन्यांपासून जेलमध्ये आहे. त्याला बाल न्यायालयात दाखल करणे, त्याचे समुपदेशन करणे, पालकांना बोलावून त्याला व पालकांना समज देणे त्याऐवजी पोलीसांनी स्वत:च न्यायाधीश होऊन त्याला जेलमध्ये डाबून ठेवले आहे. 12 वर्षाच्या बालकाला बेकायदेशीर डांबून ठेवणे हा प्रकार हेबीअस कॉर्पस प्रमाणे आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच गरम होणार आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्यातील सामाजिक संघटना आता पुढे येऊ लागल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

क्रमश: भाग १