अकोल्यात आमदारकीच्या व्युव्हरचना आणि राजकीय धर्मांतरे..! भांगरेंचा पुन्हा पक्षबदल.! अनेकांना आमदारकीचे डोहाळे.!
सार्वभौम (अकोले) :-
राज्य आणि देशात सन 2018-19 च्या काळात इडी नावाचा भोकाडी उदयाला आला आणि त्याने भल्याभल्यांच्या फाईली गिळंकृत करु पाहिल्या. आमच्याकडे येतो की आत जातो.! या बगुलबुवानं कमळ इतकं फुललं की, भलेभले नेते त्या भितीचे शिकार झाले. तेव्हा खर्या अर्थाने राज्यात राजकीय धर्मांतर पहायला मिळाले होते. मात्र, या भोकाडीची नसबंदी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी इतक्या सक्षमपणे केली की, त्यांच्याच गोटातील भगवा टिळा त्यांनाच लावून त्यांच्यावर राजकीय सन्यास घेण्याची वेळ आणली. मात्र, तरी देखील आजही केंद्राकडून इडी नावाचा भोकाडी राज्यातील महाविकास आघाडी नेस्तनाबुत करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत आहे. अर्थात त्याकाळी राजकीय धर्मांतरे झाली. आता मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकाराच्या निवडणुका लक्षात घेता अकोले तालुक्यात राजकीय धर्मांतरे होताना दिसू लागली आहेत. कारण, एकेकाळी काँग्रेसमध्ये असणारे सतिष भांगरे पुन्हा शिवसेनेत गेले आणि आता पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीचे शेंगाळ कुटुंब संधी पाहून काँग्रेसमध्ये दाखल झाले. तर, आता शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ आणि बाजीराव दराडे हे देखील दिल्या घरी सुखी नसून त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा तालुक्यात रंगल्या आहेत. तर अन्य काही पक्षबदल देखील होणार असून त्यांची गोपनियता अद्याप बाळगली जात आहे. त्यामुळे, आजकाल राजकारणाला गणपतराव देशमुख यांच्यासारखी निष्ठा राहिली नसून केवळ संधीसाधु राजकारण सगळीकडे पहावयास मिळत असल्याची चर्चा तालुक्यात होऊ लागली आहे.
खरंतर, अकोले तालुक्यात शिवसेनेच्या गटबाजीला आणि त्यांच्यातील मतभेदाला नेहमीच त्यांच्याच पदाधिकार्यांनी सोशल मीडियावर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे, पक्षाचे काम चांगले असले तरी गटबाजी आणि अपप्रचार यामुळे, सेना कायम टिकेची धनी ठरली आहे. त्यात मधुकर तळपाडे एकला चलो रे.! बाजीराव दराडे आणि मारुती मेंगाळ यांची वेगळी फौज, सतिष भांगरे यांचा ताफा वेगळा होता, मच्छिंद्र धुमाळ यांचे संघटन, महेश नवले यांचा गट, नाराज सतिष नवले, विभक्त नितीन नाईकवाडी, कट्टर शिवसैनीक मात्र नेहमी राजीनाम्याच्या पवित्र्यात असणारे महेश हासे म्हणजे यातील बरेच लोक एकत्र असले तरी त्यांच्यात मतभेद आहेत. यात महत्वाचे म्हणजे ज्यांना आमदार होण्याची इच्छा असते. त्यांच्या निष्ठेवर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. अर्थात ते खरे आहे.! मधुकर तळपाडे यांनी मात्र अद्याप भगवा सोडून कोणाचा भंडार उधाळला नाही. त्यामुळे, सतिष भांगरे का गेले आणि मारुती मेंगाळ हे का जातील हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. तरी देखील तालुक्यात शिवसेना हा पक्ष नेहमी 40 ते 50 हजार मते घेऊन दुय्यम स्थानावर कायम राहिला आहे. त्यामुळे, कोणी आलं काय आणि गेलं काय.! तळागाळातील शिवसैनिक हे भगवे पेलण्यास सदैव कटीबद्ध आहे...!
खरंतर सतिश भांगरे यांनी शिवबंधन सोडल्यानंतर तालुक्यात राजकीय धर्मांतराला वेग आला आहे. कोण कोठे जाईल तो विषय नंतरचा आहे. मात्र, भांगरे यांनी आता तरी काँग्रेसच्या विचारांवर आणि निष्ठेवर ठाम राहिले पाहिजे. कारण, खर्या अर्थाने ते शिवसेनेचे होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा राजकीय डोहाळे लागले आणि त्यांनी काँग्रेसकडून निवडणुक लढविली होती. तेव्हा त्यांना अवघी 6 हजार मते पडली होती. आता मात्र त्यांनी भांगरे परंपरेच्या पाऊलावर पाऊल टाकले नाही म्हणजे देव पावला.! अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही. आज मधुभाऊ नवले यांचे वलय फार मोठे झाले आहे. त्यात डॉ. सुधिर तांबे आणि खुद्द ना. बाळासाहेब थोरात यांनी देखील अकोल्यात लक्ष घालणे सुरू केले आहेे. त्यामुळे, येणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यात देखील काँग्रेसचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे, कोणालाही आमदार व्हायचे असेल तर घे घास पी पाणी असे करुन चालणार नाही. त्यासाठी डॉ. किरण लहामटे किंवा वैभव पिचड यांच्यासारखे ग्राऊंड लेवलने काम करावे लागेल. तर पुढील टप्पा शक्य आहे. हेच राजकीय गणित सतिश भांगरे यांनी आखले असून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे बोलले जात आहे.
खरंतर, आता मधुभाऊ नवले यांच्यावर नामदार साहेबांनी प्रचंड विश्वास टाकला आहे. येणार्या काळात अकोल्यात काँग्रेस विधानसभा विभक्त लढेल असे तुर्तास चित्र आहे. तहान लागल्यानंतर झरा खोदायचा ही काँग्रेसची रणनिती नाही. त्यामुळे, थोरातांनी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ही मोहिम त्यांनी नवले यांच्या हवाली केली असून 2024 ला नवले हे तालुक्यात बाजीप्रभूची भूमीका साकारताना दिसतील. आता पुर्वी 1952 गोपाळराव भांगरे ते यशवंतराव भांगरे तथा 1999 पुर्वी पिचड साहेब यांच्या काळापासून हा अकोले हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो पुन्हा काबीज करण्याचे काम नवले यांना करायचे आहे. त्यामुळे, त्यांना नामदारांनी जिल्हा पातळीवर घेऊन त्यांचे बाहु बळकट करू पाहिले आहे. अर्थात जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.! त्यामुळे, सगळ्यांना घेऊन चालताना भाऊंची मोठी कसरत होणार आहे. कारण, 22 डिसेंबर 2019 रोजी मधुभाऊंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून येथील काँग्रेस पुन्हा उर्जीत अवस्थेत आली. तर 27 जुलै 2021 रोजी डॉ. लहामटे यांना माननारे शेंगाळ कुटुंब काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांनीतर थेट नामदारांकडे आमदारकी मागितली. अर्थात प्रत्येकाचे मनसुबे असतात, त्यामुळे, भांगरे आणि शेंगाळ मेळ घालताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. कारण, एकाच उद्देशाच्या दोन तलवारी एकाच म्यानात ठेवणे हीच काँग्रेसची कसब असणार आहे.
खरंतर काल झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीपुर्वी असे वाटत होते की, भाजपला येथील मुस्लिम मतदार स्विकारणार नाही. जसे त्यांनी 2019 ला विधानसभेत भाजपला स्विकारले नाही. त्यामुळे, वैभव पिचड हे पुन्हा भाजपचे उमेदवार राहणार नाही. मात्र, या सर्व वल्गना फोल ठरल्या. केवळ मुस्लिम मतांमुळे भाजपला चांगला विजय मिळाला. त्यामुळे, येथे भाजप रुजु शकत नाही. ही जी भावना होती. त्यावर पाणी फेरले गेले. हे मांडण्याचे कारण असे की, जर नगरपंचायतीत भाजप पराभूत झाली असती तर पिचडांनी शंभर टक्के वेगळा विचार केला असता. मात्र, त्यांना जनता स्विकारु लागल्याने त्यांनी त्याच ठिकाणी आपली मांडणी आणि यंत्रणा मजबुत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे, ते काँग्रेस किंवा शिवसेनेत जातील असे म्हणणे या मितीला तरी चुक ठरेल. कारण, त्यांनी त्यांची जागा फिक्स केली आहे. त्यांच्याविषयीच्या चर्चा थांबु लागल्या आहेत. तर, डॉ. लहामटे राष्ट्रवादीवर ठाम आहेत. त्यामुळे अशोक भांगरे यांच्या भुमीकेकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहेत. अमित भांगरे हे नामदार साहेबांच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे येणार्या काळात राजकीय धर्मांतर फार गुंतागुंतीचे पहायला मिळणार आहे.
या सर्व गडबडीत मारुती मेंगाळ व बाजीराव दराडे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेना तालुकाध्यक्ष आणि मेंगाळ यांचे सेकंदभर जमत नाही. तर मेंगाळ यांनी वैयक्तीक संघटन चांगले उभे केले आहे. त्यामुळे, त्यांना ईच्छा आहे की, जिल्हा परिषदेत जो कोणता गट किंवा गण एसटी राखीव असेल तेथे त्यांना स्थैर्य हवे आहे. मात्र, येथील पदाधिकारी त्यांना साथ आणि साद द्यायला तयार नाहीत. त्यामुळे, ते राष्ट्रवादीकडे देखील हीच अपेक्षा ठेऊ शकतात. मात्र, आमदार महोदय भांगरेंना जवळ घेईना तेव्हा नव्याने विरोधक उभा करण्यात ते स्वारस्य दाखवतील का? असाही प्रश्न आहे. त्यामुळे काहींना राजकीय धर्मांतर करायचे आहे. मात्र, संधी आणि शाश्वती मिळत नाही. त्यामुळे, अनेकांना राजकीय कोंडी आणि घुसमटीला सामोरे जावे लागत आहे. येणार्या काळात तालुक्याला आणखी फार काही पहायचे आहे. एकीकडे सहकाराचे बॉयलर पेटू लागले आहेत. तर दुसरीकडे मीनी आमदार होण्यासाठी अनेकांच्या हलचाली सुरू आहेत. तोवर आम्ही वेट अॅण्ड वॉच ही भूमिका न घेता मांडत राहु राजकीय धर्मांतराच्या कला, वाचा रोखठोक सार्वभौम...! भाग 1. क्रमश: