मुलाने बापाच्या डोक्यात कुर्‍हाड घालुन ठार केलेे तर पोटाला दगड बांधून विहिरीत टाकले.! परस्पर शेळ्या विकल्याचा जाब विचारल्याने पुत्र कोपला.!



सार्वभौम (राजूर) :-

               बहिनीच्या बाळांतपणासाठी बाहेर पडल्यानंतर पित्याच्या पाच शेळ्या लेकाने विकून टाकल्या. पुन्हा आल्यानंतर बापाने मुलास जाब विचारला तर त्याने कुर्‍हाड घेतली आणि थेट मस्तकावर वार केला. काही क्षणात मुलाने बापाचा बळी घेतला आणि या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेताला जवळच्या एका विहिरीजवळ ओढत नेऊन पोटाला भलामोठा दगड बांधला. पुन्हा प्रेत वर येणार नाही अशी तजबीज करुन घरच्यांना देखील ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार अकोले तालुक्यातील राजुर परिसरात वारंघुशी शिवारात सोमवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला. यात रामदास लक्ष्मण घाणे (रा. बोरवाडी, ता. अकोले, जि. अ.नगर) यांचा मृत्यु झाला असून आरोपी काळु रामदास घाणे यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राजु घाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजूर पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घाणे कुटुंब हे बोरवाडी शिवारात राहवयास आहे. त्यात राजू घाणे हे अलिप्त असून ते बाहेरगावी राहून मोलमजुरीची कामे करतात. तर, घरात आई-वडिल आणि छोटा भाऊ काळु हे राहतात. यांची बहिन नाशिक येथे दिली आहे. ती गरोदर असून तिच्या बाळांतपणासाठी रामदास आणि जानाबाई हे गेले होते. जाताना त्यांना घरातील शेळ्या काळुच्या जबाबदारीवर सोडल्या होत्या. मात्र, जेव्हा ते सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी घरी आले तेव्हा घरात त्यांना 3 शेळ्या आणि 2 बोकडे कमी दिसले. तेव्हा रामदास यांनी काळुला विचारले की, काय रे.! शेळ्यांचे काय केले? त्यावर काळु म्हणाला मी विकून टाकले आहे. त्यावेळी यांच्यात शाब्दीक चकमक झाली आणि तुर्तास वाद मिटला होता. मात्र, कालांतराने काळु हा पुन्हा घरी आला आणि त्याने आपल्या वडिलांकडे पैशाची मागणी केली. तेव्हा, ते म्हणाले की तु आम्हाला न विचारता शेळ्या विकल्या त्याचे पैसे कोठे आहे?

दरम्यान, यांच्यातील वाद वाढत गेला आणि काळु याने जवळ पडलेली कुर्‍हाड घेऊन आपल्या जन्मदात्या बापाच्या डोक्यात मारली. एकच घावात मस्तक दुभांगले घरात रक्ताचे थारोळे पडले. हा सर्व प्रकार काळुने आपल्या आईच्या देखत केला. मात्र, मुलाच्या रैद्ररुपाकडे पाहून ती देखील घाबरुन गेली होती. काळुने तिला देखील धमकी दिली की, जर कोणाकडे काही बोलली तर तुला देखील ठार करुन टाकेल. त्यानंतर हा सर्व प्रकार कसा दडपला जाऊ शकतो यासाठी त्याने एक युक्ती लढविली. बापाच्या मृतदेहाला ओढत-ओढत कोठे उचलुन घेत जवळच असणार्‍या विहिरीकडे नेले. त्यानंतर मयत बापाच्या पोटाला एक भला मोठा दगड बांधला आणि मृतदेहाला विहिरीत ढकलुन दिले. त्यानंतर तो घरी आला आणि आपल्या कुटुंबाला त्याने सांगितले, जर कोणी बापाबद्दल ब्र शब्द काढला तर त्यांच्यासारखेच तुमचे देखील हाल होतील. त्यामुळे, बोलावं वाढून देखील ती माय माऊली बोलु शकली नाही.

दरम्यान, आरोपी काळु याचा मोठा भाऊ राजु हा गुरूवार दि. 22 फेब्रुवारी रोजी गावात आला होता. गावात सप्ताह बसल्यामुळे, किर्तन व जेवण करुन दुपारी तो घरी गेला होता. तेव्हा, आई जनाबाई ही एक पडवित बसली होती. मुलास पाऊन तिला रडू कोसळले. मुलास वाटले आईला आठवण आली असावी. मात्र, तिच्या चेहर्‍यावर प्रचंड दु:ख जाणवत होते. त्यामुळे, त्याने सहज विचाले. आई दादा कोठे गेले? तेव्हा ती बोलती झाली. काळुने तुझ्या दादाला ठार मारले आहे. परस्पर शेळ्या विकल्यानंतर त्यांनी पैसे दिले नाही. उलट आणखी पैसे मागण्यासाठी बापाकडे तगादा लावत होता. त्यामुळे, त्यांनी त्यास जाब विचारला असता काळुने थेट कुर्‍हाडीने तुझ्या बापाचा जीव घेतला. मी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मला देखील कुर्‍हाड दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे मी आजवर शांत बसले होते. हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर राजु यांना देखील धक्का बसला. काळुला त्याने आवाज दिला मात्र तो पळून गेला होता.

दरम्यान, राजु यांनी हा सर्व प्रकार पोलीस पाटील आणि गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना सांगितला. तर, आपल्या नातेवाईकांना देखील माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना देखील कळविला असता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी विहिरीत डोकावून पाहिले. मात्र, त्यात काही दिसले नाही. मात्र, नंतर घटनेची शहनिशा केली असता विहिरीत खरोखर रामदास घाणे यांचे प्रेत मिळून आले. तोवर ते कुजलेले होते. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविला होता. त्यात हा खून असून पुरावे नस्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या घटनेनंतर राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आरोपी काळु घाणे यास तत्काळ अटक केली आहे. घडलेला प्रकार फार निघृण असून आरोपी यास कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी राजूर येथून सामाजिक संघटनांनी केली आहे.