अय भो.! तात्याला नाईंन्टी आण रे.! वाळु तस्करानं तलाठी टिंग केला आणि तो बंडल मोजू लागला अन व्हिडिओ झाला व्हायरल.! संगमनेरचा महसुली भ्रष्टाचार.!


 सार्वभौम (संगमनेर) :- 

                             गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्हा हा कोरोनासह भ्रष्टाचाराचा देखील हॉट्स्पॉट होऊ पाहत आहे. कारण, गेल्या काही दिवसांपुर्वी नगरचे अप्पर पोलीस अधिक्षक यांची एका नेवाशाच्या कॉन्स्टेबलसोबत अर्थपुर्ण तडजोडीची क्लिप व्हायरल झाली होती. तर, त्यानंतर अनेकजण लाचखोरीचे बळी ठरले आहेत. सर्व भ्रष्ट व्यवस्थेत संगमनेर देखील कोठे कमी दिसत नाही. कमी सोडा हो.! अगदी अव्वल म्हटलं तरी हरकत नाही. कारण, संगमनेरात क्लासवन ते कारकून इतकेच काय.! खाजगी दलाल देखील लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. आता संगमनेरची भ्रष्टाचारी खुलेआम अगदी गगणाला भिडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कारण, संगमनेरचा एक तलाठी चक्क लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाचशे रुपयांच्या नोटांचा बंडल तो मोजतो आहे आणि वरुन तराट होऊन मद्यधुंद झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. हा प्रकार येथेच थांबत नाही तर या तलाठ्याने चक्क आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्याच्या वरिष्ठांची नावे देखील स्पष्ट घेतली आहे. एकंदर हा व्हिडिओ थेट लाचलुचपत विभागाकडे जाणार असून या तलाठ्या"मुळे" आता कोणाकोणाचा बाजार उठतो, याकडे महसूल विभागाचे लक्ष लागले आहे. तर, हा व्हिडिओ धांदरफळ परिसरातील एका हॉटेलमध्ये काढण्यात आलेला असल्याचे दिसते आहे. त्या"मुळे" संगमनेर प्रांत, तहसिलदार, जिल्हाधिकारी आणि तक्रारीअंती लाचलुचपत विभाग नेमकी या प्रकरणी काय भुमिका घेतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका वाळु तस्कराने नेमकीच एक ट्रॅक्टर घेतला होता. आता गुंतवणुक केली म्हणजे धंदा हवाच.! त्यामुळे, त्याने थेट तलाठी गाठला. एका हॉटेलमध्ये ते बसले आणि आणि त्यांची अर्थपुर्ण तडजोड सुरु झाली. १० हजार द्यायचे की अधिक रक्कम मोजायची.! यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र, १० वर अंतिम निर्णय झाला आणि तलाठी महाशय नाईंटी मारुन पैसे मोजू लागले. त्या दरम्यान त्यांच्यात अगदी खमंग चर्चा सुरु होती. त्याचे हे पुढील वृत्तांकन जैसे-थे.!

तस्कर - तात्या मी तुम्हाला काही अडचणीत आणत नाही. आता १० हजार नाही राव.! हे नऊ हजार घ्या, आणि बाकी तुमचे हॉटेल बील मी भरतो. कारण, माझ्या पाकीटात आता फक्त शंभर ते दोनशे निघतील. साधे पेढे घ्यायला देखील पैसा राहिला नाही राव.!

 तात्या - तू मला येड्यात काढू नको.! 

तस्कर - ऐं भो.! आण्णाला नाईंटी आण.! (नाईंन्टी येताच पैसे दिले)

तात्या -

किती आहेत हे पैसे ? काय राव.! अशी घीसघीस घालुन सुरुवात करायची का? काही पत्रकार आमच्या साहेबाला जाम करीत आहेत. त्यामुळे, मला त्रास होतो आहे. माझ्याकडे त्या पत्रकाराला घेऊन ये. तुला वाळु चालवायला लै विरोध आहे. 

तस्कर - ते पत्रकार ट्रँक्टर धरुन देतात...

तात्या - हे बघ.! तुला दोन नंबर धंदा करायचे असतो. त्यामुळे, लक्षात ठेव. एकदाम भिकारचोट माणूस असला ना. तरी देखील त्याला दादा-दादा करावे लागते.

तस्कर - हो ना दादा.! तेच करतोय मी.

तात्या - तो पत्रकार दारु पितो का रे.? 

तस्कर - नाही ना राव..!

तात्या - मग त्याच्याकडे जाय, त्याला म्हण, दादा-दादा चला जेवायला जाऊ, तुम्हाला वाळू टाकायची का? तुमचं काही काम असेल तर ते सांगा, गोड बोलून त्यांच्या पोटात रहायचं आणि आपली कामं करुन घ्यायची.!

तस्कर - बरं बरं तसंच करतो आता...

तात्या - उद्या आमचे तालुक्याचे मोठे साहेब आणि जिल्ह्याचे बॉस यांचे जरी केले. तरी खाली त्रास झाला तर कोणी नाही बोलु देणार.!

तस्कर - (पैशांचा बंडल पुढे करीत) दादा हे घ्या आता, मला पेढे घ्यायला देखील पैसे नाही राहणार. 

तात्या - लई इवळतो बुवा तु.! ऐवढे पैसे छापतो पठ्ठ्या.! 

तस्कर - नाही ओ आण्णा, तशी परिस्थिती नाही. (जेवण आणि नाईंन्टीचे ६७० रुपये बील देऊन टाकले)

तात्या - रात्रीतून ४० ते ५० हजार रुपयांचा धंदा करतो राव तू.! तरी तुझं रडगाणं सुरुच राहतं.

तस्कर

:- आण्णा आता मला मैत्री खात्यात माफ करता का? मी तुमच्या गाडीत डिझेल ओततो. ट्रॅक्टर चालु असताना आपण, काटवणात बसून राहू. मग बघा मी किती ट्रिपा काढतो आणि ग्राहकाला तुमच्या देखत फोन लावून भाव ठरवितो. आण्णा आहो फक्त ३ हजाराने ट्रॅक्टर देतो हो मी..!

              दरम्यान, संगमनेर तालुक्यातील "धंद्याला फळ" देणारा एक तलाठी आणि एक वाळु तस्कर यांच्यातील हा व्हिडिओ संवाद आहे. धांदरफळ शिवारात एका हॉटेलात नाईंन्टी मारत बसल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे व्हिडिओत दिसते आहे. त्यामुळे, संगमनेरात महसुल किती भयानक पद्धतीने गोळा होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. एकीकडे महसुलमंत्री संगमनेरचे, त्यात सर्वात जास्त लाचलुचपत ट्रॅप संगमनेरात, त्यात असे धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. एकंदर या सर्व प्रकारामुळे संगमनेर आज चर्चेचा विषय ठरले आहे. उद्या येथील नगरपालिकेची निवडणुक येऊ घातली आहे. अशात साहेबांचे कार्यकर्ते आणि येथील प्रशासन त्यांना अडचणित आणण्यात कोठे कमी पडताना दिसत नाही. त्याचेच भांडवल येणाऱ्या काळात विरोधक करणार आहेत. त्यामुळे, येथील कोरोना अखेरपर्यंत अटोक्यात आणता आला नाही. किमान भ्रष्टाचार तरी आटोक्यात आणा.! अशी टिका देखील आता होऊ लागली आहे. त्यामुळे, अगदी काल परवा येथील कंत्राटी वायरमन लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे, या प्रकरणात पहिली कारवाई तहसिल, प्रांत, कलेक्टर कि अँन्टीकरप्शन करते.! याकडे संगमनेरचे लक्ष लागले आहे.