काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांना भिडली, भाजपला गुदगुल्या.! आमदार आणि मधुभाऊ यांच्यात वाद कोण लावतो आहे.! एकच चुल मांडायची तर भडका कशाला.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले नगरपंचायतीच्या 13 प्रभागांच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. तर, 4 प्रभागांसाठी आज रणधुमाळी सुरू झाली आहे. यात सर्वात महत्वाचा आणि चर्चेचा विषय म्हणजे आ.डॉ. किरण लहामटे आणि मधुभाऊ नवले यांच्यातील वाकयुद्ध होय.! खरंतर दोन्ही नेते हे वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांच्यातील मतभेद आणि गैरसमज यांची परिसिमा पार होताना दिसत आहे. वास्तवत: वेळ पडली तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांना सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याची वेळ येऊ शकते. हे माहिती असताना देखील एकमेकांवर चिखलफेक करणे याला नैतिक राजकारण म्हणता येणार नाही. खरंतर डॉ. लहामटे आणि ना. थोरात साहेब यांच्यात नेमकी कोणी द्वेष निर्माण करु पाहत आहे आणि नवले आणि लहामटे यांच्यात कोणी कटुता निर्माण करीत आहे. याचा या नेत्यांनीच शोध घेणे गरजेचे आहे. कारण, मतभेद होणे सहाजिक आहे. मात्र, मनभेद झाल्यास उद्या सत्ता स्थापन झाली तरी यांच्यातील कळवंड थांबणे अशक्य आहे. त्यामुळे, राजकारण विरहीत कोणीही आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. तर, काँग्रेसने राष्ट्रवादीला उत्तर देण्यापेणा भाजपला अजेंड्यावर घेणे अपेक्षित आहे तर राष्ट्रवादीने काँग्रेसला सडेतोड उत्तर देण्यापेक्षा मुळ विरोधकांना उत्तर देणे अपेक्षित आहे. तर, उद्याच्या नगरपंचायतीत हे एकाच चुल्हीवर आपली भाकरी भाजू शकतात.! अन्यथा कधी नव्हे अशी येथे अभद्र युती अकोले तालुक्यात झाली तर नवल वाटण्याचे काही कारण नाही.
अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत काल जर महाविकास आघाडी झाली असती तर आज अकोले शहरात वेगळे चित्र पहायला मिळाले असते. मात्र, या तालक्याचा इतिहासच असा आहे. कोणीतरी ताठर भुमिका पार पडते आणि त्याचा फायदा पिचड साहेबांना होतो परिणामी ते सहज विजयी होतात. आज देखील नकळत असेच झाले आहे. महाविकास आघाडी एकत्र आली नाही. त्याचा फायदा असा झाला की, प्रभाग क्र.1 मध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात लढत झाली. अन्यथा तेथे महाविकास आघाडीचे एक शिट बिनविरोध शाश्वत निघाले असते. तर प्रभाग क्र.2 मध्ये देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक असते तर शंभर टक्के मतांचे विभाजन झाले नसते. आता हा प्रकार काही एकाच प्रभागात नाही. तर अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे, जसे सन 2019 निवडणुकीत पिचडांना एकटे पाडून सत्ता काबीज करता आली. तसे जर 2021-22 च्या नगरपंचायतीत डॉ.लहामटे, गायकर साहेब, मधुभाऊ आणि मच्छिंद्र धुमाळ हे एकत्र आले असते तर नगरपंचायत काही अवघड नव्हती.
आता या निवडणुकीत आपण एक गोष्ट प्रकर्षाने पाहतो आहे. ती म्हणजे, भाजप ही काँग्रेसवर शब्दभर बोलायला तयार नाही. ना काँग्रेस भाजपवर बोलताना दिसते आहे. खरंतर राज्यात पहिल्यांदा अकोल्यात हे राजकीय समिकरण होऊ पाहत आहे. खरंतर काँग्रेसने येथील राष्ट्रवादीच्या आमदारांवर टिका टिप्पणी करण्यापेक्षा भाजपचा खरपूस समाचार घ्यायला हवा. मात्र, त्यांचे सर्वच वक्ते फक्त आमदारांवर बोलुन भाजपकडे काना डोळा करताना दिसत आहे. यात प्रमुख्याने नमुद करावेसे वाटते की, तालुक्यातील ज्येष्ठ नेतेनी पहिले आमदारांना आपल्या अजेंड्यावर घेतले. त्याचे परिणाम असा झाला की, आमदारांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आणि ते मधुभाऊ नवले यांनी अंगावर घेत आपली मालिका सुरू केली. म्हणजे, त्यांच्या सानिध्यात आमदार विरोधी मानसे असल्यामुळे तसेच वातावरण होऊ लागले आणि परिणामी भाजप राहिली बाजुला आणि हेच एकमेकांना उत्तर प्रतिउत्तर देण्यात मग्न झाले आहेत. दुर्दैव इतकेच की, दिग्गज नेत्यांना देखील आपली दिशा चुकते आहे. हे लक्षात येत नाही याची खंत पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना वाटते. मग तेथे आमदार असोत किंवा नवले साहेब.! आणि यांची जर धेय्यधोरणे ठरलेली असतील तर यात जनता वेड्यात निघत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, जे काही चालु आहे. ते येणार्या महाविकास आघाडीच्या दृष्टीने चुकीचे आहे असाच सुर समोर येत आहे.
एकंदर, महाविकास आघाडीचा जन्म होऊ पाहत होता. तेव्हा नवले आणि लहामटे यांच्यात द्वेष निर्माण करण्यासाठी एक यंत्रणा काम करीत होती. तर नामदार आणि आमदार यांच्याबाबत सुद्धा तेच षडयंत्र राचण्यात आले. त्यामुळे, त्याचे पडसाद नकळत अकोल्यात बस स्थानक परिसरात जी काँग्रेसची सभा झाली त्यात थोरात साहेबांच्या तोंडून ऐकावयास मिळाले. हे सर्व करता करविता धनी कोण आहे? याचे आत्मपरिक्षण यांनी केले पाहिजे. नामदारांचा हात डोक्यावर आहे म्हणून मधुभाऊ यांनी त्यांना माननार्या वैचारिक लोकांची मने दुखावने कधीच संयुक्तीक राहणार नाही. कारण, त्यांच्या राजकीय जीवणासह त्यांना सामाजिक व शैक्षणिक देखील वारसा आहे. त्यामुळे, ज्यांचा राजकीय स्थैर्य धोक्यात आहे. त्यांच्या सुरात सुर मिळवून वाईट होणे हे त्यांच्या समर्थकांना कधीच न पटणारे आहे. कारण, डॉ. लहामटे यांनी त्यांच्याविषयी कधी अपशब्द वापरले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार ते आजही त्यांचा तितकाच आदर करतात. मात्र, बोलायचे एकाला असते आणि मनावर तेच घेतात. अशा प्रकारचे ते म्हणत असतील तर नेमकी दुखणे आहे तरी कोठे? राहिला प्रश्न जागा वाटपाचा तर काँग्रेसला स्वत: सिताराम पा. गायकर हे पाच जागा देत होते. त्यामुळे, केवळ आणि केवळ शब्दांच्या खेळातून झालेले गैरसमज आता दोन्ही पक्षाकडून चव्हाट्यावर येताना दिसत आहे. खरंतर जर यांना उद्या एकत्रच यायचे असेल तर यांनी भाजपवर टिका करुन आपले संधान साधले पाहिजे. मात्र, भाजप राहिलाय बघ्याच्या भुमिकेत आणि हेच एकमेकांवर शब्दशस्त्रांचा वार करीत सुटले आहे. त्यामुळे, काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे? यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मात्र, काही असले तरी मधुभाऊ आणि आमदार यांच्यात जो काही वाद उभा राहत आहे. त्याचे मुळ यांनी शोधून तो नामशेष केला पाहिजे. असेच तालुक्यातील सुज्ञ व्यक्तींचे मत आहे.