कधी नव्हे गायकर साहबे तापले आणि संतापले.! जे व्यक्तीगत टिका करतात त्यांचे राजकारण संपले.! काय कराचे ते करुन घ्या.!



सार्वभौम (अकोले) :-

               सिताराम पाटील गायकर यांनी अल्पावधीत भाजप सोडली आणि पुन्हा आपल्या घरात दाखल झाले. त्यांच्या घरवापसीने राष्ट्रवादीत अनेकांना धुरी लागली तर अनेकांना आनंद झाला. इतकेच काय.! डॉ.किरण लहामटे यांनी देखील काही दिवस प्लस मायनस भुमिका घेतली होती. मात्र, गायकर पा. आणि आमदार हे एकत्र आले आणि अनेकांचे राजकीय भविष्य अंध:कारमय झाले. त्यामुळे, संतुलन सुटलेल्या व्यक्तीप्रमाणे तालुक्यात काही अगदी खालच्या पातळीला जाऊन भाषणे ठोकली. त्याचा परिणाम असा झाला की, दुसर्‍याचा बाजार उठविण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा जनतेने बाजार उठविला आणि अल्पकालावधीसाठी काही विरोधकांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणे पसंत केला. आता इथवर गायकर पाटलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. मात्र, त्यानंतर अकोले नगरपंचायतीत देखील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शहरात शेंडी लावण्याचे काम केले. यापलिकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील चक्क भाजपला मदत केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे, यांनी स्वत:चा स्वार्थ पहायचा आणि गायकरांनी कोणच्या प्रभागात जायचे नाही, कोणाला फोन करायचा नाही, त्यांची चौकाशी लावू, इडीची चौकशी लावू हा काय प्रकार आहे? काय कराचे ते करुन घ्या.! मी कशालाच घाबरत नाही. अशा प्रकारचे मत रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले.

अकोल्यात नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र, निवडणुकीत सामाजिक आणि राजकीय मुद्दे सोडून वैयक्तीक टारगेट केले जात आहे. निवडणुका नगरपंचायतीच्या आणि कारखाना, पतसंस्था यांच्या चौकशांच्या अप्रत्यक्ष धमक्या लोक देत आहेत. त्यामुळे, यांच्या राजकारणाची पातळी किती हिन आणि निच आहे हे लक्षात येते. अर्थात कोणी कितीही चौकशा लावल्या तरी मी काही घाबरत नसतो. कार नाही त्याला डर कशाला.! मी शरदचंद्र पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेला पहिलवान आहे. परंतु राजकीय स्थैर्यासाठी यांनी किती पातळी सोडली हे पाहिल्यानंतर फार वाईट वाटते. विरोधकांच्या सभा बंद झाल्या, पण यांच्याकडून अंतर्गत कुरघोड्यांनी मला जेरीस आणायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जेव्हा ही लढाई जनतेच्या हाती जाईल.! तेव्हा मात्र, यांचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही. कारण, मी येथील जनतेच्या, शेतकर्‍यांच्या आणि तालुक्याच्या हितासाठी लढतो आहे.

अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. त्यामुळे, त्यांनी जे काही उमेदवार दिले आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे अद्यकर्तव्य आहे. मात्र, हे करीत असताना आम्ही कोणाची घरे उध्वस्त केली नाहीत. कोणाला कधी अमिष दाखविले नाही. गेल्या 40 वर्षात मला जे काही बहुजनांचे संघटन बांधता आले, ते मी बांधण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाला न्याय देता आला तर कोणी दुखावले गेले असतील. मात्र, यात मी माझा वैयक्तीक स्वार्थ कधीच पाहिला नाही. मात्र, आज माझे विरोधक नको त्या टिमक्या वाजवत आहेत. खरंतर त्यांना मी उत्तर देत नाही याचा अर्थ त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये. आजवर संयमाने घेतले आहे. उद्या तो जर सुटला तर भांडवल आमच्याकडे देखील आहे. फक्त आमच्या सामाजिक आणि राजकीय कामाचा पिंड हा भांडकुदळ आणि कोणाला उध्वस्त करणे किंवा सत्तेच्या लालसेपोटी कोणाला धोका देणे हा मुळीच नाही. 

खरंतर सन 2019 मध्ये आम्ही आमच्या नेतृत्वावर निष्ठा आणि प्रेम म्हणून भाजपत गेलो. अक्षरश: राष्ट्रवादी सोडून जाण्याची इच्छा नसताना देखील जावे लागले. मात्र, अवघ्या सहा महिन्यात स्थानिक आमदार आणि कार्यकर्ते काय म्हणतील किंवा पक्षात परत गेल्यानंतर कारखान्यात देखील एकत्र काम करावे लागेल या सर्व गोष्टींचा विचार सोडून देखील आम्ही पुन्हा पणात आलो. केवळ आणि केवळ पवार कुटुंबाच्या निष्ठेपोटी.! त्यामुळे, आम्हाला या तालुक्यात काल जे कोणी राष्ट्रवादीत आले आणि पवार कुटूंबाचे नाव घेऊन निष्ठेचे व प्रशासकीय धडे शिकवित असेल तर त्यांनी त्यांच्या बुद्धीचा उपयोग दुसरीकडे करावा. येणार्‍या काळात डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसाठी जे काही करण्याची वेळ येईल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. भलेही आमच्यातील फुटील विरोधकांना जाऊन मिळाले तरी आम्हाला कोणताही फरक पडणार नाही. त्यामुळे, जसे आम्ही एक होऊन नगरपंचायतीवर आमचा झेंडा फडकविणार आहोत. त्याच पद्धतीने येणार्‍या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येईल. यात तिळमात्र बदल होणार नाही.