या पराभवाचे शिल्पकार डॉ.लहामटेंच.! भाजपच्या विजयात त्यांचाही खारीचा वाटा.! हेकेखोरीत नेमकी चुकले काय.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
सन 2019 च्या विधानसभा निवडणुका आणि तालुक्यात 40 वर्षेनंतर फार मोठे परिवर्तन झाले. जनतेने डॉ. लहामटेंना कौल दिला. तो विजय त्यांना पचविता आला असला तरी जनतेचे मन आणि कार्यकर्त्यांचे संघटन त्यांना बांधता आले नाही. याच्यावर विश्वास नाही, त्याची गरज नाही. अशा पद्धतीने एकला चलो रे.! ही भुमिका त्यांना सन 2022 मध्ये पराजयाकडे घेऊन गेली. ज्या पवार साहेबांनी 2019 मध्ये एकास एक उमेदवार देऊन पिचडांना नामोहरम केले. त्या पाऊलावर पाऊल ठेवण्यात डॉ. लहामटे हे निच्छितच कमी पडल्याचे पहायला मिळाले. याचे उत्तम उदा. म्हणजे, महाविकास आघाडी करणे ही त्यांचीच जबाबदारी होती. मात्र, मतांच्या विभाजनात पिचड नेहमी विजयी होतात हे माहित असताना देखील त्यांनी ताठर भुमिका घेतली आणि काँग्रेस विरहित बस्तान बांधले. परिनामी एक हाता बहुमत भाजपला मिळाले. त्यामुळे, भाजपच्या यशात खर्या अर्थाने आमदारांनी महत्वाची भुमिका घेतल्याचे पहायला मिळाले. कारण, समोर कोकणकडा आहे. हे माहित असताना देखील उडी मारणे म्हणजे मृत्युला निमंत्रण देणे नाहीतर काय? हीच भुमिका डॉ. लहामटेंनी बेजबाबदारपणे पार पाडली. तर, त्यांच्या विजयानंतर त्यांनी फक्त पदे वाटण्याचे काम केले. त्यांच्याकडून काय संघटन झाले, त्यांना यांनी काय बळ दिले, कोणते अधिकार दिले, किती विश्वासात घेतले, संघटनासाठी कोणती बांधणी केली? आपल्या सोबत तेव्हा किती होते आणि आता कोण आहेत? निव्वळ लग्न सभारंभ, दहावे आणि मौती करुन पुन्हा जनता पदारत घेणार नाही. याचे देखील डॉक्टरांनी आत्मचिंतन करणे अपेक्षित असल्याचे सुर आता जनतेतून निघत आहे.
अकोले तालुक्याच्या विधानसभेचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, मा. मंत्री मधुकर पिचड साहेब यांनी 1980 ते 2009 या काळात ज्या काही निवडणुका लढविल्या आहेत. इव्हान 2014 ची निवडणुक देखील अपवाद नाही. या सर्वच निवडणुकांमध्ये त्यांनी एकापेक्षा अधिक उमेदवारांना बळ दिले आहे. कारण, त्यांना माननारा वर्ग आणि शाश्वत मतदान यामुळे, मतांचे जे काही विभाजन होईल. त्याचा फायदा निर्विदा त्यांनाच झाल्याचे पहायला मिळाले आहे. आता हा फंडा खुद्द शरदचंद्र पवार साहेबांना माहित होता. त्यामुळे, पिचडांनी भाजप सोडली आणि पवार साहेबांनी त्यांचे शस्त्र बाहेर काढले. सन 2019 मध्ये त्यांनी तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र केले आणि एकास एक उमेदवार देऊन पिचडांचा पराभव केला. आता हे सुत्र कोणासाठी वापरले होते? तर खुद्द विजयी उमेदवार डॉ.लहामटेंसाठी. मग, याची प्रचिती असून देखील डॉ. लहामटेंनी कोणत्याही परिस्थितीत शहरात महाविकास आघाडी करणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेस थोडीफार ताठर वागली असेल. त्यापेक्षा ताठर भुमिका डॉक्टरांनी घेतली आणि गेले तर गेले, लढू एकटे अशा पद्धतीने त्यांनी काँग्रेसला अलिप्त ठेऊन निवडणुकींना सामोरे जाणे पसंत केले. त्याचे परिणाम काय झाले. हे कालच्या निकालात दिसून आले आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी पुन्हा 2024 च्या आमदारकीचे डोहाळे लागल्यामुळे, त्यांच्यासाठी 2019 ला सोबत असणारे नेते आणि कार्यकर्ते हे नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसून आले नाही. त्यात अशोकराव भांगरे असतील किंवा डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, अॅड. शांताराम वाळुंज, कॉ. कारभारी उगले, विनय सावंत आणि अन्य नेते मंडळी तथा या तालुक्यातील पिचड विरोधी एकोपा अॅज ए बॉस म्हणून त्यांना एकसंघ ठेवता आला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, भांगरे साहेबांची देखील शहरात मतपेटी आहे. डॉ. अजित नवले यांनी प्रभाग 7 मध्ये आपला उमेदवार उभा केला. विनय सावंत आणि अन्य पुरोगामी विचारांची लोकं देखील शहरात वास्तव्यला आहेत. थोडक्यात 1996 साली अवघ्या एक मताहून आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांना 13 व्या दिवशी पंतप्रधान पदाचा राजिनामा द्यावा लागला होता. त्यामुळे, मतांचे मुल्य हे काय असते हे आमदारांनी पुर्वीच लक्षात घ्यायला हवे होते. मात्र, जसे काही शिवसैनिक या प्रक्रियेतून बाहेर राहिले, तसे राष्ट्रवादीचे काही नेते देखील बाहेर राहिले आणि समविचारी देखील डॉक्टरांना सोबत घेता आले नाही. ही एकला चलो रे.! ची भुमिका त्यांना पराजयाच्या उंबर्यावर घेऊन गेली. याचे देखील त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे.
या निवडणुकीत सर्वात महत्वाचे म्हणजे, जेव्हा भाजपचे उमेदवार जाहिर झाले होते. तेव्हा महाविकास आघाडी म्हणून यांच्या बैठका देखील झालेल्या नव्हत्या. म्हणजे आमदार गप्प होते, गायकर साहेब बघ्याच्या भुमिकेत होतेे तर राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी अंतर्गत धुसफूस आणि जागेंसाठी वाटाघाटी करीत होते. त्यामुळे, महाविकास आघाडीचे नेते राहिले बाजुला आणि पदाधिकारी यांच्यातच जागा वाटपाहून मतभेद झाल्याचे पहायला मिळाले. म्हणजे इतका भोंगळा कारभार होता की, चहा पेक्षा किटल्या गरम दिसून आल्या तर एकात एक काही आणि बापात लेक नाही असे महाविकास आघाडीचे चित्र पहायला मिळाले. यात महत्वाची बाजू म्हणजे डॉ. लहामटे यांनी नगरपंचायतीला 2019 ची निवडणुक समजली ही त्यांची सर्वात मोठी चुक होती. जनता माझ्या पाठीशी आहे, धनशक्तीचा विजय होणार नाही, त्यांच्या आवेशाची भाषणे हे शहरातील जनतेला पटली नाही. ती लाट होती आणि येथे मिरीट हवे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे कोणी चांगला नेताच नव्हता, अन कोणी सांगीतल्यानंतर डॉक्टर ऐकतील असेही नव्हते. त्यामुळे, काही ठिकाणी उमेदवार देताना याने मला 2019 ला मदत केली आहे. द्या त्याला उमेदवारी, हे आपला विरोधी आहे. त्याला नको उमेदवारी यात काही ठिकाणी अगदी दुबळे उमेदवार दिले गेले. तर, सिताराम पाटील गायकरांना जे उमेदवार अपेक्षित होते. त्यात कोणाचीही वर्णी लागली नाही. ना भोईर गुरूजी ना प्रकाश नाईकवाडी अशा अनेकांना बाहेरचा रस्ता मिळाला. त्यामुळे, भावनांवर नव्हे तर नातेगोते आणि अर्थपुर्ण गोष्टींचा अवलंब करावा लागतो. याबाबत डॉक्टर पुर्णपणे अनभिज्ञ राहिले. जनता माझ्या पाठीशी आणि मी जनतेत आहे. हे म्हणता-म्हणता पराजय त्यांच्या माथ्यावर बसला तेव्हा त्यांचे डोळे उघडले.
एकंदर, विधानसभेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्यात फार मोठा फरक असतो. तर येथील सहकाराच्या निवडणुका यांना सामान्य जनतेच्या प्रमाणाचे सुत्र बसत नाहीत. त्यामुळे, 2019 च्या विजयाने हवेत गेलेले डॉक्टर आता 2022 च्या निवडणुकीत निम्मे खाली आले आहेत. विकास, भावना, दहावे-मौती, लग्न-समारंभ हे पहिल्या निवडणुकीत प्रमाण असू शकते. मात्र, दुसर्यांदा निवडून येण्यासाठी फार प्रयत्नांची पराकष्टा आणि गणिमी कावे खेळावे लागतात. कारण, सन 2004 साली मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी उत्तर नगरला खासदार निधी काय असतो हे दाखवून दिले आणि त्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यामुळे, विकास म्हणजे विजय असे संकल्पना निरर्थक आहे. तर भावना म्हणून सांगयचे झाले तर मणिपुरच्या इरोन चानू शर्मिला ह्या एक सामाजिक प्रश्न घेऊन दि. 4 नोव्हेंबर 2000 ते 9 ऑगस्ट 2016 असे 16 वर्षे उपोषणाला बसल्या होत्या. तेव्हा त्यांनी सन 2014 साली मणिपूर येथून निवडणुक लढविली होती तेव्हा त्यांना अवघे 93 मते पडली होती. त्यामुळे, समाज हा भावना आणि विकास याला दुय्यम ठेवतो हे आमदारांनी लक्षात घेतले पाहिजे. तर, पळ-पळ पळण्यापेक्षा नियोजन आणि राजनिती वापरुन निवडणुक लढविली असती तर त्यांना विजय अवघड नव्हता. पण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अशी उंदरांमध्ये चर्चा होते आणि शेवटी आहे ते चालुद्या असे म्हणून सुरात सुर मिसळले गेले. परिणामी नगरपंचायतीचा निकाल हाती आला. त्यामुळे, डॉ. लहामटे हे जरी जनमानसातील आमदार असले तरी त्यांना आज शहरातील जनतेने नाकारले आहे. कारण, भाजपचा हा विजय सुर्यासारखा प्रखर आहे. तरी देखील मतांची टक्केवारी लक्षात घेता अजून वेळ गेलेली नाही. त्यांनी संघटनात्मक लढाई उभी करणे अपेक्षित असल्याचे सुर आता बाहेर पडू लागले आहे.