धाड-धाड करीत वाळुचा ट्रॅक्टर आला आणि दोन चिमुकल्या सख्या भावांना चिरडून गेला, एक मयत, एक अत्यावस्थेत.! अधिकाऱ्याच्या घरासमोर अंत्यविधी.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात कोल्हेवाडी रोड येथे एका वाळुतस्कराच्या ट्रॅक्टरने अडिच वर्षाच्या चिमुरड्या मुलाचा जीव घेतला तर एक पाच वर्षाचा बालक गंभीर रित्या जखमी असून तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. हे दोघे सख्खे भाऊ असून ही धक्कादायक घटना रविवार दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात मोहम्मद इब्राहिम शेख हा चिमुकला मुलगा मयत झाला आहे. तर अबुहुरेरा इब्राहिम शेख (वय ५) हा जखमी झाला आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा स्थानिक नागरिकांनी पाहिले आणि संबंधित पळून जाणारा ट्रॅक्टर पकडला असून तो पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. काळजावर घाव घालणाऱ्या या घटनेमुळे मुलांचे नातेवाईक आक्रमक झाले असून मुलाचा मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. तर, त्याच्यावरील अंत्यसंस्कार हे अधिकाऱ्यांच्या घरासमोरच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, रात्री उशिरापर्यंत शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्या (दि. 27) सकाळी 11 वाजता नातेवाईक गुन्हा नोंदवायला येणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी सायंकाळी शेख कुटुंबातील तिघे हे पवार मळा येथे दुध आणण्यासाठी चालले होते. त्यांच्याकडे दुचाकी होती आणि ते त्यांच्या बाजुने कडेकडेने जात होते. त्याच वेळी संगमनेरात कोल्हेवाडी रोडकडून संगमनेर शहराकडे एक वाळुचा ट्रॅक्ट्रर भरधाव वेगात येत होता. त्याने या तिघांच्या वाहनाला कट मारला असता गाडीला धक्का लागला. तोच गाडीवर असणारे तिघे व्हायबल झाले. त्यात वाहन चालकाने प्रसंगावधान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील मोहम्मद इब्राहिम शेख या अडीच वर्षीय चिमुरडा वाळु ट्रॅक्ट्ररच्या चाकाखाली सापडला आणि तो चिरडला गेला. त्यात त्याचा जागिच मृत्यू झाला आहे. तर त्याचा दुसरा भाऊ अबुहुरेरा इब्राहीम शेख हा (वय 5) बाजुला पडल्याने जखमी झाला आहे. त्याला खाजगी दवाखान्यात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरातील नागरिक एकवटले आणि त्यांनी रोष व्यक्त करीत जोवर प्रशासकीय अधिकारी येथे येत नाही तो पर्यंत मयत बालकाला हात लावणार नाही. अशी भूमिका मुलाच्या पालकांनी घेतली. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवईकांचे सांत्वन केले. मात्र, यावेळी मयत मुलाच्या नावेवाईकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांची इमेज पार चव्हाट्यावर मांडली होती.
आता पुढे का ?
खरंतर, शहरासारख्या ठिकाणी आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे वाळुतस्कर आपली वाहणे चालवत असतात. कोणी मेलं काय आणि चिरडलं काय.! कलम ३०४ (अ) दाखल होतो आणि पुढे तडजोड होते किंवा एक अपघात तथा फेटल म्हणून त्याची फारशी कोणी नोंद घेत नाही. त्यामुळे, यांच्या माजुरीपणामुळे अनेकांची लेकरं अशी किड्यामुंगिसारखे चिरडले जातात. त्यामुळे, अवैध व्यावसाय करणाऱ्यांच्या गाड्यांखाली जर कोणी मयत झाले तर यांच्यावर कलम ३०२ दाखल केला पाहिजे. नाही ते शक्य तर कलम ३०४ (सदोष मनुष्यबळ) प्रमाणे तरी गुन्हा दाखल केला पाहिजे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे, केवळ वाहन चालक आरोपी नको. तर, त्याचा मालक आणि अन्य व्यक्तींसह मुळ सुत्रधार देखील आरोपी केले पाहिजे. अन्यथा ट्रॅक्ट्ररखाली मानसे मरतच राहतील आणि हे आरोपी मोकाट सुटून आपल्या मुलाबाळांचे बळी जातच पाहतील....
बळ कोणाचं आणि माज कशाचा ?
संगमनेर तालुक्यात कधी नव्हे इतके स्तोम वाळुतस्करांचे माजले आहे. पांढरेशुभ्र कपडे घालुन सभेत सज्जनतेचे आणि अवैध धंद्यांवर भाषणे गाजविणाऱ्यांचे ढंपर राजरोस सुरु आहेत, लोकशाहीचा स्तंभ ओळखल्या जाणाऱ्यांचे वाळुट्रॅक्ट्रर सुरु आहेत, अधिकारी व पदाधिकारी यांची अर्थपुर्ण भागिदारी असल्याचे बोलले जाते, त्यामुळे, बोलायचं कोणी आणि कारवाई करायची कोणी? आता कुंपनच शेत खातय तर येथे झाकली मुठ सव्वालाखाची.! अशी गत झाली आहे. अर्थात अवैध धंदे आणि तस्करी तर जिल्ह्यात सगळीकडेच सुरु आहे. परंतु, इतकी बेधुंदशाही आणि किड्या मुंगिसारखा जीवघेणा प्रकार कोठे नाही. गेल्या वर्षात प्रशासनाची गाडी मागे लागली म्हणून तिन जणांचा खड्ड्यात जीव गेला होता, जोर्वे नाका येथे वाळु भरलेल्या एका पिकपच्या धडकेत आरफाद शेख या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता, घारगाव बोटा येथे वाळु तस्करांनी तलाठी व पथकाच्या अंगावर गाड्या घातल्या होत्या, अनेकदा जिवघेणे हल्ले केले आहेत, इतकेच काय.!
अगदी महिन्यापुर्वी शिवसेनेच्या रमेश काळे यांच्यावर वाळुतस्करांनी ट्रॅक्टर घातला होता. तर काही दिवसांपूर्वी एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने तरुणाला उडवले होते ती घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. आता तर एका चिमुरड्याचा जीव गेला असून एक मृत्युशी झुंजतो आहे. म्हणजे, या संगमनेरात नेमकी लोकशाही आहे की हिटलरशाही? येथे प्रशासन अंमलबजावणीला आहे की हुजरेगिरी करायला? अवैध धंद्यांना आवर घालायला का प्रोटेक्ट करायला? असा संतप्त सवाल जमावाने उपस्थित केला आहे. म्हणजे, एखाद्या निरपराध मुलाचा बळी एखाद्या बिनधास्त, खुलेआम आणि दिवसा ढवळ्या वाळु वाहणाऱ्या ट्रॅक्टरखाली जात असेल तर त्या चिमुकल्याच्या आईचे काय हाल होत असतील, त्या पालकाला काय वाटत असेल.! हा तळतळाट हे अर्थपुर्ण व्यावहार करणारे का घेत असतील असाही प्रश्न उपस्थित केले जात आहे. एकंदर, येथील प्रशासनाच्या दारातून वाळुचे ट्रॅक्टर चोरी जातात त्यामुळे, त्यांची उदासिनता नव्याने काय मांडायची! पण, भर दिवसा शहर वस्तीतून भरधाव वेगात धाड-धाड करीत ढंपर आणि ट्रॅक्टर जातात याची पुण्याई कोणाची आहे ? येथील राजकीय नेतृत्व या अवैध धंद्यांवर आदेश का देत नाही ? याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहे. काही झालं तरी, लोकांची लेकरंबाळं मरत असतील तर त्यांच्या टाळुवरचं लोणी खाऊन कोणी मोठं होऊ नये.! आणि झालच तर त्याचा तळतळाट येथेच फेडून जायचा आहे. अशा प्रकारची तळमळ अनेकांनी व्यक्त केली.....