अकोल्यातील एक कोटीच्या खंडणीत संगमनेरच्या कानवडेंना रात्रीतून अटक, अटकेपुर्वीच एकाचा मृत्यू.! दोन दिवस पोलीस कोठडी.!


सार्वभौम (संगमनेर) :-

            एक कोटी रुपयांची खंडणी मागून 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात एका फिर्याद दाखल होती. त्यात शिवसेनेचे नेते गणेश कानवडे यांना अटक करण्यात आली होती. तर, याच गुन्ह्यातील मुुख्य सुत्रधार मयुर सुभाष कानवडे (रा. संगमनेर) यास अकोले पोलिसांनी काल दि. 28 डिसेंबर 2021 रोजी राहत्या घरावर धाड मारुन ताब्यात घेतले होते. आज त्यास न्यायालयात हजर केले असता पुढील तपासाठी कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, यातील आरोपी सुभाष भागुजी कानवडे यांना गेल्या काही महिन्यांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांना दुर्दैवाने म्युकरमायकोसेसची लक्षणे आढळुन आली आणि त्यांचा मृत्यु झाला. यात पसार असणार्‍या दोघांचा उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर मयुरचे लोकेशन मिळताच पोलिसांनी त्यास अटक केली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेतन नाईकवाडी हे एक आर्कीटेक असून ते त्यांच्या मित्रांसोबत अर्बन जिनेसीस इन्फ्राकन कंपनीत भागीदार होते. कालांतराने या कंपनीत मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी त्यातून बाहेर पडून अगस्ति डेव्हलपर्स फर्म स्थापन केली. मात्र, या दरम्यान त्या कंपनीत मयुर सुभाष कानवडे व सुभाष कानवडे यांची गुंतवणुक होती. तेव्हा नाईकवाडी हे त्यातून बाहेर पडलेले होते. मात्र, यांच्यात गैरसमज आणि मतभेद निर्माण झाले आणि यांनी चेतन नाईकवाडी यांच्या कामाच्या ठिकाणी माहिती अधिकार टाकणे, काम बंद पाडणे, त्यांच्या विषयी तक्रारी दाखल करणे, त्यांची बदनामी करणे असे प्रकार सुरू केले. तेव्हा हे सर्व बंद करण्यासाठी काय करावे लागेल? तर यांनी तेव्हा 1 कोटी रुपयांची मागणी केली होती असे नाईकावाडी यांचे म्हणणे आहे. एकंदर आपली प्रतिष्ठा आहे, काम बंद पडायला नको.! कागदी घोडे नाचवायला वेळ नाही म्हणून नाईकवाडी यांनी त्यांनी 30 लाख रुपये दिल्याचे पुरावे त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केले होते. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शिवसेनेचे नेते गणेश कानवडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे, हा गंभीर गुन्हा असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. नंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर, मयुर कानवडे आणि सुभाष कानवडे यांनी सरेंडर न होता दि. 9 मार्च 2020 रोजी सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्जासाठी खटाटोप सुरू केला. मात्र, दोघांचाही जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर पर्यायाने ते औरंगाबाद उच्च न्यायालयात गेले. मात्र, मोठी रक्कम आणि वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन हायकोर्टाने दि. 26 जून 2021 रोजी दोघांचे जामीन फेटाळले. तेव्हापासून यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र, मध्ये कोरोनाचा काळ आला. त्यामुळे, पोलिसांना अन्य कामे लागली तर आरोपींनी देखील सुप्रिम कोर्टात जाणे टाळले. या दरम्यान, सुभाष कानवडे यांना कोरोना झाला आणि दुर्दैवाने त्यांना मृत्युला सामोरे जावे लागले. तेव्हापासून मयुर कानवडे हा पसार होता.

दरम्यान, मंगळवारी अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना माहिती मिळाली होती. की, मयुर कानवडे हा संगमनेर येथील गुंजाळवाडी येथील राहत्या घरी आहे. तेव्हा, पोलिसांनी रात्र होऊ दिली आणि अंधाराचा फायदा घेत 11 वाजण्याच्या सुमारास मयुरला ताब्यात घेतला. त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, गेल्या आठवड्यात अकोले नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात फिर्यादी चेतन नाईकवाडी यांची पत्नी तथा भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी व गणेश कानवडे यांच्यात एकदम काट्याची टक्कर पहायला मिळाली. जर, त्यात ही अटक प्रक्रिया झाली असती तर तो फार चर्चेचा मुद्दा ठरला असता. मात्र, सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिसांनी सावध भुमिका घेत टप्प्यात कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे.