आदिवासीं विद्यार्थ्यांच्या मटनासह दुध, किराणा आणि भाजीपाल्याचे 18 लाख 20 हजार संगमनेरच्या दलालाने खाल्ले.!

  

सार्वभौम (संगमनेर) :-

            आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत नाशिक येथून एक संस्थेला भोजनाचे टेंडर देण्यात आले होते. त्यात राहाता आणि संगमनेर यांच्यासह अन्य काही ठिकाणांच्या वस्तिगृहांना किराणा, भाजीपाला, मटन, चिकन यांचा सामावेश होता. दि. 21 ऑगस्ट 2019 पासून त्यांनी ठरल्याप्रमाणे काही वस्तु पुरविल्या. मात्र, या खाजगी संस्थेतील सचिवाने अध्यक्षांना गंडा घातला आणि शासनाकडून जे 18 लाख 20 हजार आले. ते स्वत:च्या खात्यावर घेऊन ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन घेतले. त्यामुळे, भाजीपाला, मटनवाला, किराणा दुकानदार हे अध्यक्षांच्या नावे बोंबा मारत असून त्यांनी माल देणे बंद केले आहे. तर, हमी म्हणून जे चेक घेतले होते ते बँकेत भरले असता ते बाऊंन्स झाल्याने दुकानदारांनी यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. त्यामुळे, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब बबन घोडे (रा. कोळवाडे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे सचिव निवृत्ती शंकर घोडे (रा. कोळवाडे, जनतानगर, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावसाहेब घोडे आणि निवृत्ती घोडे यांनी एकमताने आदिवासी सर्वांगिन विकास सेवाभावी संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत सुरू असणार्‍या काही संस्थांचे टेंडर भरले होते. त्यात किराणा माल, मेससाठी लागणारे साहित्य, कामगारांचे पगार अशी जबाबदारी आरोपी निवृत्ती शंकर घोडे याच्याकडे सोपविण्यात आली होती. तर, रावसाहेब घोडे हे भाजीपाला पुरविण्याचे काम करीत होते. जेव्हा किराणा घ्यायचा होता. तेव्हा त्यांनी दिवटे शॉपी, जगदंब किराणा स्टोअर जाखुरी, ओम ट्रेडर्स संगमनेर यांच्याकडून उधारीने माल नेला होता. त्या विश्वासापोटी त्यांनी आदिवासी सर्वांगिन विकास सेवाभावी संस्थेच्या नावे काही चेक दिले होते. मात्र, दिलेली वेळ निघुन गेली तरी देखील यांनी पेमेंट केले नाही. आज उद्या करुन मालक वैतागून गेले. त्यामुळे, त्यांनी संबधित चेक बँकेत टाकून दिले. मात्र, खात्यावर पैसे नसल्याने ते बाऊंन्स झाले आणि अध्यक्षांना नोटीसा निघाल्या.

दरम्यान, या संस्थेने घेतलेल्या मालापोटी श्री ट्रेडर्स यांना 3 लाख 53 हजार 650 रुपये, दिवटे किराणा यांना 3 लाख 19 हजार 650 रुपये, जगदंब किराणा मालकास 3 लाख 82 हजार, राज मटन अ‍ॅण्ड चिकन शॉप राहाता यांना 23 हजार 950 रुपये, मिल्क सप्लायर्स मालदाड रोड यांना 1 लाख 20 हजार 60 रुपये, गुरूकृपा भाजीपाला यांना 78 हजार 780 रुपये, कृष्णा व्हेजीटेबल्स यांना 1 लाख 21 हजार 53 रुपये, जयबाबाजी व्हेजीटेबल्स यांना 1 लाख 3 हजार 268 रुपये, मेससाठी जे मजुर होते त्यांना 4 लाख 76 हजार, मेसच्या माहिला कामगार यांना 5 लाख 37 हजार 499 रुपये, असे एकुण 25 लाख 22 हजार 911 रुपये देणेदरी आहे. त्यापैकी आदिवासी सर्वांगिन विकास सेवाभावी संस्थेचे सचिव निवृत्ती घोडे याने 18 लाख 20 हजार रुपये त्याच्या एका खात्यावर आरटीजीएस केले. तर ते तेथून काढून घेत ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन शासनाचा, त्यांच्या संस्थेचा आणि अध्यक्षांचा विश्वासघात केला आहे.


तर आदिवासी समाजाची उन्नती व्हावी, या समाजातील मुलांनी शिक्षणाच्या मुळ प्रवाहात यावे. यासाठी, राष्ट्रीय उत्पन्नाच्या 9 टक्के बजेट हे एसटी बांधवांसाठी असते. मात्र, दुर्दैवाने येथे काही खादाड लोक आहेत. ज्यांच्यामुळे, या सामाजाची उन्नती सोडून अधोगती होऊ पाहत आहे. असेच प्रकार आज नव्हे अनेक ठिकाणी घडताना दिसून येत आहे.  यापुर्वी आश्रमशाळा, वस्तिगृह आणि तेथील भोजन व्यवस्था यावर रोखठोक सार्वभौमने आवाज उठविला होता. तर, तत्कालिन जिल्हाधिकारी अनिलक कवडे साहेबांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या. त्यानंतर त्यावर कठोर पाऊले उचलली गेली आणि काही अंशी सुधारणा झाल्या. आज देखील आदिवासी विभागात मोठमोठे घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे. तर येथील मुली सुरक्षित नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे, खरोखर ही समाजव्यवस्था सुधरेल का? असा प्रश्न उभा राहतो.  तर आदिवासी समाजाला मुळ प्रवाहात आणण्यापुर्वी येथील काही अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि काही लोकप्रतिनिधिंचे डोके ठिकाणावर आणणे गरजेचे असल्याच्या तिव्र प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील माजी सरपंचाने व ग्रामसेवकाने 25 लाख 21 हजार रुपयांचा अपहार केला होता. तर घुलेवाडी येथे धनगंगा पतसंस्थेत 48 लाख 60 हजार रुपयांचा अपहार समोर आला आहे. धनगंगा पतसंस्थेचे धन मॅनेजरने लुटल्याचा प्रकार उघड झाला होता. तर बहुचर्चित टीईटी पेपर घोटाळ्यात सुखदेव डेरे यांना संगमनेरातुन अटक झाली आहे. शहरातील युनियन बँक या शाखेत 56 लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक व अन्य तीन लोकांवर गुन्हा दाखल आहे. तर  मंगळापूर येथील ग्रामपंचायत मध्ये देखील घोटाळा झाल्याचे बोले जात आहे. त्यावर गटविकास अधिकारी यांची चौकशी सुरू आहे. इतकेच काय! पोलीस यंत्रणेवर शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी 45 लाखांच्या मलिद्याचा आरोप वरिष्ठांकडे केला होता. तर विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची टिका भाजपने केली आहे. संगमनेर शहरातील अमरधामच्या विकास कामामध्ये दोन निविदा काढून घोटाळा केल्याचा आरोप करत भाजप ने आज नगरपालिका कार्यलयात ठिय्या आंदोलन केले आहे. तर बसस्थानक कामात आदर्श बीओटी घोटाळा झाल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. 

      येवढेच नाही! तर "वर्ग 2"ची जमीन "वर्ग 1" करण्यासाठी बनावट कागदपत्रचा वापर झाल्याचा व बनावट वारस उभे करून जमीन बळकवन्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे, संगमनेरात घोटाळे होणे हे संगमनेरकरांना काय नवीन नाही. इतकेच काय! ह्या वर्षी जिल्ह्यातील सर्वाधिक लाचखोर शासकीय कर्मचारी संगमनेरात सापडेल. कोणी वारस नोंदीसाठी लाच घेते तर कोणी धाक दडपशाही दाखवुन लाच घेते. त्यामुळे, संगमनेरात चेरिमेरी सारखे प्रकार शासकीय दरबारात सर्रास होताना दिसतात. एकीकडे ना.साहेब महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. तालुक्याच्या सुसंस्कृतपणाचे दाखले देतात. साहेबांच्या प्रतिमेचे उदाहरण विरोधीपक्ष सुद्धा स्तुतीसुमने उधाळून करत असतात. मात्र, संगमनेरात अवैध धंदे, घोटाळे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाला आहे. यावर वेळीच अंकुश लावणे गरजेचे आहे. संगमनेरात साहेबांनी बारीक लक्षदेणे आवश्यक असल्याची चर्चा आता संगमनेरातील सुज्ञ लोक करत आहे.