सावधान.! टिका करताना तारतम्य बाळगा.! नगरपंचायतीत आठ प्रभाग अटातटीचे.! पाच संवेदनशिल.! आजी माजी आमदार आमने सामने.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                    अकोले तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधी नव्हे असा राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला आहे. स्वत:चे अस्थित्व निर्माण करण्यासाठी किंवा टिकविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या चारही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महाविकास आघाडीचे दुर्दैव म्हणा की, त्यांना एकमेकांमध्ये समन्वय राखता आला नाही. तर, भाजपचे सुदैव म्हणा की, यांच्यात आघाडी झाली नाही. त्यामुळे, रिपाई आणि भाजप यांची ठोस युती वगळता कोणाचे मनोमीलन झाले असे म्हणता येणार नाही. कारण,  असे पाच प्रभाग आहेत. की, ज्यात चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे, आघाडी आणि युती असा कोणताही धर्म न पाळता तालुक्यातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा पाऊस पाडणार आहेत. या सर्व प्रक्रियेत एकच गोष्ट महत्वाची आहे की. निवडणुका येतील आणि जातील. मात्र, कोणी कोणाचे चारित्र्यहनन करु नये, व्यक्तीगत कोणाच्या आयुष्यात डोकावू नये, प्रक्षोभीत भाषणे करून जनतेला पेटविण्याचा प्रयत्न करू नये. अकोले तालुका हा पुरोगामी चळवळीचा आहे. अगस्ति महाराज, छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यामुळे, आजकाल राजकारणाची जी पातळी खालावत चालली आहे. त्याचा सामाजिक आणि राजनैतिक स्थर उंचवावा अशीच अपेक्षा तालुक्यातील सुज्ञ व सुशिक्षित नागरिकांनी रोखठोक सार्वभौमकडे व्यक्त केली आहे.


खरंतर 2019 च्या विधानसभेनंतर तालुक्यात राजकीय वार्‍यांचा वेग वाढला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिष्ठेची ही पहिली निवडणुक लागली आहे. त्यामुळे, येणार्‍या सर्व निवडणुकांचे प्रतिबिंब याच निवडणुकीतून परावर्तीत होणार आहे. त्यामुळे, येथे जो-तो साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब करु पाहणार आहे. मात्र, यात सामान्य कार्यकर्ते भरडले जाऊ नयेत. अनेक कुटुंबांचा कोंडमारा होऊ नये, तरुणांना वाम मार्गाला लावू नये, आर्थिक बळापेक्षा भावनिक आणि सामाजिक प्रचाराचे दर्शन तालुक्यातील नेत्यांकडून होणे अपेक्षित आहे. अन्यथा ज्या तालुक्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्या तालुक्यातून राजकारण बळी जाणे म्हणजे फार लाजिरवाणी गोष्ट ठरणार आहे. हे सांगण्याचे कारण असे की, या निवडणुकीत अनेकांनी शब्दांची पायमल्ली केली. अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढाया आहेत, एकाच प्रभागात पाच-पाच उमेदवार आहेत, काहींना पक्षाला धोका दिला आहे. तर काहींना नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे, हव्यासापोटी माणूस काय-काय करु शकतो.!  हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

आज 4 प्रभाग ओबीसी आरक्षणामुळे रद्द झाले आहेत. तर 13 प्रभागात 44 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी अगदी प्रतिष्ठेच्या लढती आहेत. ज्या प्रभाग 1 मुळे, काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. तेथे शिवसेना आणि काँग्रेस अशी काट्याची टक्कर होणार आहे. तर तिसरी उमेदवार राष्ट्रवादीची असून त्यांना राष्ट्रवादी पक्ष सपोर्ट करणार नाही. कारण, त्यांनी आपला अर्ज माघारी घ्यावा अशी पक्षाची इच्छा होती. मात्र, मोठ्या नाराजी नाट्यानंतर देखील तो अर्ज राहुन गेला. तर भाजपने प्रभाग 1 मधील आपल्या उमेदवाराचा अर्ज काढून घेतल्याने तेथे भाजपच्या ऊभेदवाराकडून काँग्रेसला फायदा होणार असल्याचे दिसते आहे. या माघारी अर्जामुळे मात्र काँग्रेस आणि भाजपची तालुकाभर चर्चा होती. 

प्रभाग क्रमांक 5 कडे संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहे. जशी पुर्वी पिचड आणि भांगरे ही पारंपारीक लढाई होती. तशी कानवडे आणि नाईकवाडी यांच्यात टफ फाईट पहायला मिळणार आहे. खरंतर हा जागा-जमीन वाद आता पुन्हा राजकीय वादावर येऊन ठेपला आहे. कारण, येथील राजकारणाला व्यक्तीद्वेष आणि न्यायप्रविष्ठ गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे, ही राजकीय अस्थित्वाची नव्हे.! तर व्यक्तीगत आयुष्याच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. येथे साम, दाम, दंड, भेद सर्व नितींचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अकोले पोलिसांनी या प्रभागाकडे विशेष लक्ष ठेवले आहे. येथील राजकीय गणिते पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेने यांनी जर कसून तथा प्रामाणिक प्रयत्न केले. तर मात्र सोनालीताई नाईकवाडी यांच्यासाठी डोकेदुखी होईल. मात्र, राष्ट्रवादीतील काही नाईकवाडी पक्षाशी किती प्रमाणिक राहतील. हे निकालानंतरच लक्षात येईल. अशी चर्चा शहरात सुरू होती.  

अकोले तालुक्यातील प्रतिष्ठीत पत्रकार अमोल वैद्य यांची प्रतिष्ठा प्रभाग क्र. 9 मध्ये पणाला लागली आहे. कारण, त्यांच्या सौभाग्यवती शितल वैद्य आणि भिमाबाई रोकडे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. वैद्य यांनी त्यांच्या विरोधात ज्यांच्या नाराजा होत्या. त्या दुर केल्या आहेत. तर अन्य पक्षाचे उमेदवार देखील त्यांच्या पत्नीस साथ देण्याची शक्यता आहे. विशेषत: तेथे शिवसेना काय भुमिका घेते हे फार महत्वाचे आहे. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये 8 अर्ज दाखल झाले होते. खरंतर, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन नाईकवाडी हे या ठिकाणी फार इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना तेथे संधी दिली नाही. तर, राष्ट्रवादीचे संदिप शेणकर हे गेल्या कित्तेक महिन्यांपासून तेथे बोहल्यावर चढलेले होते. पक्षाने नाकारले तरी हरकत नाही. अपक्ष लढण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे, प्रकाश नाईकवाडी यांची गोची होऊन गायकर साहेबांचे प्रिय असूनही त्यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. आता मात्र तेथे पाच उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. 

खरंतर, प्रभाग क्रमांक 14 मध्ये तयारी करीत असलेले प्रदिप नाईकवाडी यांच्या नशिबावर आरक्षणाची कुर्‍हाड कोसळली आणि विक्रम नवले यांच्या प्रभाग क्रमांक 15 वर नाईकवाडी यांनी अतिक्रमण सुरू केले. त्यामुळे, विक्रम यांनी देखील नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, प्रदिप यांचे 15 मध्ये देखील काम चांगले होते. त्यामुळे, त्यांनी 15 वर आपला हक्क सांगितला आणि संगमनेरहून पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेऊन, वेळ आली तरी अपक्ष लढू असा नारा देत त्यांना आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, मधुभाऊ नवले यांनी अंतीम तोडगा काढत 15 नंबर प्रदिप यांच्या नावे केला. या दरम्यान, युती होते की नाही. याकडे टक लावून बसलेल्या संतोष नाईकवाडी यांचा जीव भांड्यात पडला. कारण, काँग्रेसच्या वाट्याला जाणार्‍या या प्रभागातून त्यांना लढण्याची प्रबळ इच्छा होती. अखेर, युती तुढली आणि संतोष नाईकवाडी यांच्या तळमळीला यश आले. या दरम्यान त्यांना अनेक ऑफर आल्या. मात्र, पडेंगे लेकीन लढेंगे.! अशी भुमिका घेत त्यांनी अनेकांना धुडकावून लावले. यात भाजपचे सचिन शेटे यांना बाकी फार नामी संधी मिळणार आहे. कारण, नाईकवाडी-नाईकवाडी यांच्या मतविभाजनाचा फायदा त्यांच्या पदरी पडणार आहे. 

यात सर्वात महत्वाचे म्हणजे, प्रभाग क्र. 16 हा एसटी राखिव असून तेथील उमेदवार नगराध्यक्ष देखील होऊ शकतो असे बोलले जाते. त्यामुळे, ही जागा सोडताना प्रत्येकाना फार बारकाईने विचार केला. म्हणून तर येथे चौरंगी लढत होत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा येथे उमेदवार मिळत नव्हता. तेथे चार उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. या प्रभागात पुर्वी काँग्रेसच्या नगरसेवीका होत्या. मात्र, सध्या त्या राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष असून यांनी ताकद लावली तर राष्ट्रवादी उभारी घेईल. मात्र, याच प्रभागात रमेश आण्णा जगताप यांचे चांगले प्राबल्य आहे. त्यामुळे, तेथे काँग्रेस काही कमी नाही. त्यामुळे, या उमेदवाराकडे देखील शहराचे लक्ष लागले आहे. तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये माजी नगरसेवक परसराम शेळके यांना चांगलेच कसावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे नातेगोते फार मोठे आहे. तर त्यांना राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे. ही लढत देखील प्रतिष्ठा आणि अस्मितेची असणार आहे.