ओबीसींचे आरक्षण भाजपमुळे रद्द झाले, त्यामुळे, भाजपला मदत होईल अशी आमची भुमिका नाही.! पण, महाविकास आघाडीची गरज लागणार नाही - ना. थोरात

 


सार्वभौम (अकोले) :- 

                राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. यात ऐनवेळी ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले. त्याचा फटका अकोले नगरपंचायतीत पहायला मिळाला. कारण, या आरक्षणाला विरोध करणारे कोण? न्यायालयात याचिका दाखल करणारे कोण? याचा सखोल अभ्यास केला असता भाजपने यास विरोध केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, ओबीसी समाजाला विरोध कोणाचा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, भाजपला घरी बसवा अशा पद्धतीचे आवाहन ना. बाळासाहेब थोरात यांनी केले. तर, शहरात कॉंग्रेसला सन्मान मिळाला नाही म्हणून स्वबळावर आम्ही लढलो आहोत. आजवर मी अकोल्यात डोकं घातलं नव्हतं, पण आता घालणार आहे. या शहराचा मी चेहरा बदलुन टाकणार आहे. त्यामुळे, उद्याच्या काळात ७ अधिक ४ असे ११ नगरसेवक कॉंग्रेसचे निवडून द्या व नगराध्यक्ष करा. मी स्वत: येथे लक्ष घालेल असे अश्वासन ना. थोरात यांनी अकोलेकरांना दिले. ते कॉंग्रेसच्या प्रचारादरम्यान शहरातील बस स्थानकावर आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.


             ना. थोरात म्हणाले की, अकोले तालुक्यात महाविकास आघाडी होणे हे मला अपेक्षित होते. परंतु, तेथील नेतृत्व कॉंग्रेसला सन्मान देणार नाही. याची मला खात्री होती. त्यामुळे, मी मधुभाऊ यांना पुर्वीच सांगितले होते. की, महाविकास आघाडीत जाल तर तुम्ही फसाल बरका.! आणि तसेच झाले. खरंतर, मी सांगितले तसे केले असते तर आज १३ प्रभागांमध्ये १३ उमेदवार उभे करता आले असते. अशा प्रकारची खंत नामदारांनी बोलुन दाखविली. ते म्हणाले की, मी ४० वर्षे राजकारण केले, नगरपंचायतीचा अभ्यास आणि निवडणुका केल्या. त्यात अकोल्यात कोठे कधी लक्ष घातले नाही. परंतु, आता जर कॉंग्रेसचे ११ नगरसेवक निवडून दिले तर मी अकोल्यात लक्ष घालेल आणि संगमनेर प्रमाणे अकोल्याचा विकास करेल. ते पुढे म्हणाले की,  निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. ते कोणी केले? याची माहिती आहे का? आरक्षण रद्द होण्यासाठी कोणी अपिल केले आहे? तर, महागडे वकील देऊन भाजपने हा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे, भाजपला निवडुन देऊ नका. अशा पद्धतीचे अवाहन नामदारांनी केले.

         


मधुभाऊ नवले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षावर चांगलीच तोफ डागविली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी होण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले. मात्र, आमची अवहेलना झाली. आघाडी आमच्यामुळे झाली नाही असे म्हणणारे स्वार्थी व ढोंगी आहेत. एकीकडे एक तासापुर्वी शिवसेना आम्हाला प्रस्ताव देत होती आणि दुसऱ्या तासाला ती राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेली. त्यामुळे, यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? आम्ही आघाडीसाठी कधीच आडवं गेलो नाही. उलट आघाडीला अडचण येऊ नये म्हणून सात जागा दिल्या आहेत. अन्यथा १३ जागा दिल्या असत्या असे त्यांनी स्पष्ट केले. आता आमचा कोण्या लबाडांवर विश्वास नाही. येथे आघाडी म्हणायचे आणि आपल्याच उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा. मग आघाडी म्हणजे काय शिमगा आहे का?  त्यामुळे, येणाऱ्या काळात अकोले तालुक्यात पुन्हा कॉंग्रेस उभी करायची आहे. संगमनेर प्रमाणे अकोले तालुक्याचा विकास करायचा आहे. म्हणून आमच्या उमेदवारांना निवडून द्या. असे आवाहन नवले यांनी केेले.

              दरम्यान आज नामदार थोरात साहेब यांच्या भाषणातून एक निच्छित झाले की, महाविकास आघाडी करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते तथा जिल्हा बॅंकेचे संचालक मधुभाऊ नवले हे तयार होते. मात्र, त्यांना ना. साहेबांकडून तसे संकेत मिळाले नाही.  तथा युती करावीच असा काही अग्रह दिसला नाही. उलट त्यांनी माना सन्मानाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन स्वत:ची आणि ज्यांना तज्ञ संचालक म्हणून नेमले गेले. त्यांची ताकद आजमावू पाहिली आहे. या कार्यक्रमादरम्यान नामदार म्हणाले की, विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन येथील नेतृत्वाने काम केले पाहिजे. अर्थात हा टोला त्यांनी विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना लावला आहे. मात्र, डॉ. लहामटे यांनी त्याच दरम्यान माळीझाप येथे भर सभेत बोलताना सांगितले की, नामदार बाळासाहेब थोरात हे माझ्या गुरुस्थानी आहेत.  त्यांचा मी प्रचंड आदर करतो, परंतु, माझ्याविषयी साहेबांच्या मनात कोणीतरी द्वेष भरुन दिला आहे. कोणी कार्यकर्ता बोलला हे त्याच्या मनचे वाक्य माझ्या तोंडी घातले. मी लोकशाही माननारा माणूस आहे. त्यामुळे, तो बोलला त्याचे तोंड मी धरु शकत नाही. परंतु, त्याच्या बोलण्याचे मी समर्थन देखील केले नाही. मात्र, दोन नेत्यांमध्ये कोणीतरी कुलूपितपणा आणण्याचे काम केले आहे. मधुभाऊ यांचा देखील माझ्या मनात राग नाही, ना त्यांच्या मनात असेल.  परंतु, बाकी काही चुगल्या करणारांमुळे द्वेषाचे वातावरण निर्माण होऊ पाहत आहे. एकंदर, कॉंग्रेस श्रेष्ठींना महायुतीत सहभागी होण्याची इच्छा मुळीच वाटत नव्हती. कारण, त्यांना त्यांची स्वबळाची ताकद आजमवायची होती. जेणे करुण उद्या अकोले तालुक्यातून एखादा सक्षम नेता पुढे काढायचा आणि कॉंग्रेस पक्षाकडून त्यास बळ द्यायचे. तर, तालुक्यात पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा फडकवायचा. हिच रणनिती त्यांच्याकडून आखताना दिसली आहे.


                  या सर्व गडबडीत एक प्रश्न अनेक अकोलेकरांच्या मनात भेडसावून गेला. तो म्हणजे नामदार साहेबांसोबत आलेले गवई गटाचे रोहम साहेब म्हणाले की, अकोल्याला आम्ही हक्काचे पाणी मिळवून देऊ.! तेव्हा अनेकांनी तोंडात बोटं घातली. संगमनेरात कोणतं पाणी आहे बुवा.! जे संगमनेर हक्काने अकोल्याला देईल. तळेगावात आढळाचे पाणी जाते, जवळ्यात देवठाणचे पाणी जाते, शहरात प्रवरेतून निळवंडे भंडारदऱ्याचे पाणी जाते आणि मुळेतून पठारावर पाणी जाते. त्यामुळे, एकंदर संपुर्ण संगमनेर तालुक्याला अकोले तालुक्यातून पाणी जाते, येथे दशरथ सावंत, मधुभाऊ नवले, कारभारी उगले, शांताराम वाळुंज, मधुकर पिचड यांच्यासह अनेकांच्या उभ्या हयाती गेल्या पाण्याचा लढा लढता. त्यामुळे, उचलायची जीब आणि लावयची टाळुला अशा प्रकारची टिका त्यांच्यावर झाली. पाणी देणारा अकोले तालुका आहे. येथे येऊन हक्क गाजवू पाहणाऱ्यांनी विचार करुन बोलले पाहिजे. असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. उलट येथे आणायचे असेल तर एमआयडिसी आणली पाहिजे, कॉलेज, संस्था, बॅंका, उद्योग व्यावसाय आणले पाहिजे. असे मत अनेकांनी व्यक्त केले.