अखेर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र.! ना.थोरातांचा संदेश, मग राष्ट्रवादीने एकच जागेवर लढायचे का?



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                    अकोल्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत आहे. तर त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी होऊ पाहत आहे. मात्र, कोणी किती जागा घ्यायच्या? आरक्षित जागांवर कोणी डल्ला मारायचा.! याबाबत अद्याप एकमत नाही. मात्र, आज काँग्रेस 07 जागा मागत आहे, शिवसेना 07 जागा मागत आहे. माकप आणि मित्रपक्ष किमान एक जागा तरी मागत असेल. त्यामुळे, 17 जागांपैकी 16 जागा जर वाटल्यावरी जात असेल तर सत्ताधारी आणि विद्यमान आमदारांच्या राष्ट्रवादीने काय फक्त एकाच जागेवर लढायचे का? अशी विनोदी परंतु वास्तवी चर्चा शहरात सुरु आहे. या वाटाघाटीतून मार्ग काढण्यासाठी काल शनिवार दि. 4 डिसेंबर 2021 रोजी डॉ. किरण लहामटे, सिताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले आणि अन्य नेत्यांनी ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. त्यात त्यानी सांगितले की, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना एकत्र घ्या, त्यांना सन्मानानं जागा द्या आणि काही झालं तरी भाजपला अकोले तालुक्यात डोकं वर काढू देऊ नका. त्यामुळे, ही बैठक पार पडल्यानंतर महाविकास आघाडीत एक बैठक झाली आणि त्यांनी भाजपला नामोहरम करण्यासाठी एक-एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज रात्री यावर जागा वाटपाचा तिढा सुटून महाविकास आघाडी होण्याचे चिन्हा निर्माण झाले आहे. 

         


  नगरपंचायतीत महाविकास आघाडी व्हावी अशी भाजप समर्थक वगळता सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, लॉस सहन करायचा कोणी आणि मागे पाऊल टाकायचे कोणी.? यात मात्र अनेकांमध्ये एकवाक्यता नाही. शिवसेना म्हणते आम्ही महाविकासआघाडीचा धर्म पाळणार आहोत. तसे पक्षाचेही आदेश आहेत. मात्र, सन्मानपुर्वक जागा देखील आम्हाला हव्या आहेत. शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी पहिल्यापासून ही भूमिका मांडलेली आहे. परंतु, अर्ज भरायला सुरुवात झाली, अनेकांनी अर्जही भरले तरी देखील महाविकास आघाडीचे कोणी जबाबदार घटक त्यांच्याशी चर्चा करायला गेले नाही. त्यामुळे, अखेर त्यांनी देखील शक्तीप्रदर्शन करीत १७ जागांवर आम्ही देखील टफ फाईट देऊ शकतो हे सिद्ध करुन दिले. त्यासाठी नितीन नाईकवाडी, मधुकर तळपाडे, महेश नवले, प्रमोद मंडलिक, माधवराव तिटमे, महेश हासे यांनी महाविकास आघाडीला ठणकावून सांगत भाजपचा समाचार घेतला. पुर्वीच्या नगरपंचायतीचा इतिहास उकरत शिवसेना म्हणाली की, तेव्हा भाजपच्या आडमुठेपणामुळे शिवसेनेला सर्वात मोठा तोटा झाला. ज्या जागा मागितल्या त्या दिल्या नाही. त्यामुळे, अल्प मतांनी जागा पडल्या. तर, जेथे पराभव झाला तेथे अगदी कमी मतांहुन जागा अगदी हातातून गेल्यात. भाजपने सत्ता स्थापन केली मात्र, नगरपंचायतीच्या हाद्दीत अनेक प्रश्न प्रलंबित राहुन गेले आहे. आता आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहे, नगरविकास खाते आपल्या पक्षाकडे आहे. त्याचा फायदा आपल्याला करुन घ्यायचा आहे. केवळ नगरसेवक निवडून द्यायचे नाही तर प्रभागांचा विकास करायचा आहे. आपल्याला क्वामन मिनिमम प्रॉग्राम तयार करुन जनतेत जायचं आहे असा नारा देताच राष्ट्रवादीचे त्यांना प्रेमपत्र आले. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि शिवसेनेने कोणतीही ताणाताण न करता राज्याच्या पावलावर पाऊल टाकायला मंजुरी दिली. आता जागा वाटपाचा तिढा कायम आहे. मात्र, ३ ते ५ जागांवर त्यांना समाधान मानावे लागू शकते. अशा प्रकारची परिस्थिती सध्या दिसून येत आहे. तर, शिवसेनेकडून पारंपारिक लढाईत सोनाली नाईकवाडी आणि गणेश कानवडे यांच्या लढतिकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. एकंदर शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री आहे. त्यामुळे, त्यांना जर बळ द्यायचे असेल तर यांना महायुती शिवाय पर्याय राहणार नाही हेच स्थानिक नेत्यांनी समजून घेतले पाहिजे.

             

 गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तथा आजच्या भाजपकडून कॉंग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या. खरंतर तेव्हा माजी मंत्री मधुकर पिचड साहेब व माजी आ. वैभव पिचड हे राष्ट्रवादीचे नेतृत्व करीत होते. विशेष म्हणजे, तेव्हा मधुभाऊ नवले हे देखील राष्ट्रवादीत होते. आता मात्र परिस्थिती फार वेगळी आहे. येथे नवा गडी नवे राज्य आहे. तर, मधुभाऊ हे स्वगृही परतल्याने कॉंग्रेसची फार मोठी ताकद शहरात उभी राहिली आहे. त्यांच्या प्रवेशाने ना. थोरात साहेबांना अत्यानंद झाला असून तो त्यांनी तालुक्याला जिल्हा बँकेत तिघांना संधी देत एका आगळ्या वेगळ्या रुपाने परावर्तीत केला आहे. त्यांचे पुढील व्हिजन काय आहे.! या गोष्टींची काही अंशी कल्पना बऱ्याच जणांना असेल. मात्र, तो पत्ता आज ओपन करण्यात काही एक अर्थ नाही. परंतु,  मधुभाऊ नवले यांना बळ देणं म्हणजे व्हिजनशुन्य नामदार असे मुळीच म्हणता येणार नाही. त्यामुळे, आता कॉंग्रेसला विश्वासात घेताना त्यांच्या भाव खाण्याला सामोरे जावेच लागणार आहे. कारण, नवले आणि पांडे यांना राष्ट्रवादीत येताना ज्या काही वेदना झाल्या. त्याचे प्रतिबिंब आज नक्कीच पडणार.! कारण, मोका देख के चौका मारना.! हीच कॉंग्रेसची निती आहे. आज कॉंग्रेसची ताकद नक्कीच मोठी आहे. तर, त्यांच्याकडे उमेदवार देखील तुल्यबळ आहे. त्यामुळे, नेते, कार्यकर्ते आणि इच्छुकांची भाऊगर्दी या सर्वांची नाराजी दुर करणे मधुभाऊ यांना फार जिकरीचे ठरणार आहे. खरंतर, नेत्यांनी महाविकास आघाडीचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवा होता. कारण, अनेक इच्छुक गुढग्याला बाशिंग बांधुन तयार आहेत. आघाडी होते की नाही, आपल्याला संधी मिळते की नाही. या प्रश्नांमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. तर, त्यांनी प्रचार देखील सुरु केला असून आता थांबायला कोणी तयार नाही. एकंदर, उमेदवार जास्त आणि जागा कमी, त्यामुळे देता येईना कोणाला हमी.! एकीकडे युती तोडायची नाही, नेतेही संभाळायचे, भाजपलाही हरवायचे या पेचात मधुभाऊंना सुवर्णमध्य काढावा लागणार आहे. त्यांची अपेक्षा ७ ते ८ जागेंची असली तरी त्यांना ५ ते ६ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर, जागा मात्र कोणत्या याहून पुन्हा वादाचा मुद्दा कायम पहायला मिळणार आहे.

          आता अंतीम सत्य असे की, यात डॉ. किरण लहामटे हेच निर्णय अधिकारी आहेत. त्यामुळे, त्यांनी या महाविकास आघाडील शरदचंद्र पवार साहेब यांच्याप्रमाणे कसे एकसंघ ठेवायचे यावर चिंतन केले पाहिजे. कारण, महाविकास आघाडी तर झालीच पाहिजे अन नाही झाली तर पुन्हा पिचड पर्व...हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे, त्यांनी सिताराम पाटील गायकर या वजिरास पुढे करुन नगरपंचायतीला सामोरे गेले पाहिजे. केवळ महाविकास आघाडी, मित्रपक्ष आणि ज्यांनी आमदारकीला मदत केली त्यांना संधी दिली तर मात्र, नगरपंचायत हातातून अगदी सहज निखळुन जाईल. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पक्ष, चिन्ह आणि आर्थिक बळाच्या जोरावर चालत नाहीत. तर, नातेगोते आणि स्थानिक प्रश्नांच्या मुद्द्याहून ताब्यात घेतल्या जातात. जर, भावना आणि मदतीचे प्रमाण लावले तर राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागेल. हे देखील साहेबांनी लक्षात ठेवले पाहिजे. तर, सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची दिशाभूल करुन त्यांनाच तोंडावर पाडण्यासाठी त्यांच्याच जवळचे नेते व कार्यकर्ते हे कार्यरत असल्याचे अनेकदा आपण पाहिले आहे. त्यामुळे, ही निवडणुक भावना आणि मनाने लढून चालणार नाही.! तर, चाणक्यनिती आणि विवेकी बुद्धीने हिला सामोरे जाणे अपेक्षित आहे. खरंतर, सिताराम पाटील गायकर हे एक असे व्यक्तीमत्व आहे. की, नगरपंचायत म्हणजे त्यांच्यासाठी शुल्लक बाब आहे. त्यांनी आमदारांच्या दिमतीने प्रभाग पिंजले तर कोणाची मजाल नाही राष्ट्रवादी तथा महाविकास आघाडीचा पराभव करण्याची. त्यामुळे, एकंदर नगरपंचातीत प्रबळ उमेदवार, प्राबल्य असणारा उमेदवार, लोकमताचा कौल, स्थानिक परिस्थिती, विरोधकांच्या तोडीचा व्यक्ती, व्हिजन असणारा तरुण अशा काही गोष्टी सोबत घेऊन जाणे अपेक्षात आहे. फार काही भावना आणि हळव्या मनाने विचार न करता योग्य उमेदवार देऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. अन्यथा भाजपचा विजयरथ आज पुन्हा मार्गस्त झाला तर तो रोखणे अशक्य आहे. तेव्हा विचार करा.........!