होय.! मी तिच्यावर अत्याचार करुन दांड्याने ठेचून खून केला. दारुच्या नशेत गटारातही फेकून दिले.! हॉटेलच्या वेटरला अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                          संगमनेर शहरच्या लगत जुना विडी कामगार परिसरात गटार चॉकअप झाली म्हणून ती साफ करण्यासाठी काही कर्मचारी गेले होते. मात्र, कचरा समजून ओढताढ सुरु असताना अचानक एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार फार काही जुना काही अवघ्या चार दिवसांचा विषय आहे. मयत महिला बाहेर काढली असती तिच्या डोक्यात दांड्याने मारहाण केल्याचे लक्षात येते होते. त्यामुळे शंभर टक्के पोलिसांना डाऊट आला आणि त्यांनी प्रथम अकस्मात मृत्यू आणि नंतर कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आता, ना महिलेची ओळख ना आरोपीची.! त्यामुळे, यांची नावे डिटेक्ट होणार तरी कशी. एकवेळी मयत महिलेची माहिती मिळविणे शक्य होते. मात्र, आरोपीची.! अशक्य, तरी देखील संगमनेर पोलिसांनी मोठ्या शिताफिने या आरोपीचा शोध घेऊन त्याला कोपरगाव येथून अटक केली आहे. तर त्यानंतर त्याने सांगितले की, होय घडला प्रकार हा मीच केला आहे. तर, तिच्यावर अत्याचार करुन मारुन टाकल्याचे देखील आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे, या निर्दयी मानसाला आता कठोर शिक्षा झाली पाहिजे. असाही सुर काही समाजसेवकांनी लावला आहे. या प्रकरणात रुपचंद मुकूतराम वर्मा ( हल्ली. रा. संगमनेर, वय ४२, मुळ छत्तीसगड) यास बेड्या ठोकण्यात आल्या असून आज त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.            

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरात नाशिक-पुणे रोडवर माझे घर सोसा. तथा जुना बीडी कारखाना येथील परिसरात गटार चॉकअप झाली होती. हा ब्लॉक काढण्यासाठी काही कर्मचारी तेथे गेले आणि त्यांनी  गटारात गुंतलेला कचरा काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा कचरा नसून येथे एक मृतदेह गुंतलेला आहे. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि अनेकाच्या भुवया उंचावल्या. महिलेची बॉडी तातडीने बाहेर काढण्यात आली. ही महिला कोण? कुठली आहे, काय करते याबाबत सर्वच्च अनभिज्ञ होते. त्यामुळे, ही खबर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तेथील परिस्थिती समजून घेतली.  हा तपास पोलिसांसाठी फार गरजेचा व आव्हान देणारा होता. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी जे काही संशयित वाटते ते सर्व ताब्यात घेतले. दुर्दैवाने मयत महिलेच्या मृत्युनंतर कोठे मिसिंग देखील मिळून आली नाही. त्यामुळे, तिची ओळख पटणे कठीण झाले होते.

         दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना एक काठी, चप्पल आणि काही अन्य संशयित साहित्य मिळून आले. त्यानुसार पोलिसांचा शोध सुरु झाला. ती चप्पल आणि साहित्य पाहता आरोपी फार काही चालाख असेल असे काही वाटले नाही. पण, त्याला शोधायचे कसे ? हा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. मात्र, तरी देखील त्यांनी सुताहून स्वर्ग गाठला. त्या चपला, कपडे व साहित्य घेऊन पोलिसांनी त्याच परिसरातील काही दुकाने, हॉटेल, घरे येथे विचारणा केली. तेव्हा एका हॉटेल चालकाने सांगितले की, साहेब.! हे सर्व साहित्य माझ्याकडे कामाला असणाऱ्या व्यक्तीचे असण्याची शक्यता आहे. तो परप्रांतिय असून गेल्या दोन दिवसांपासून तो पसार आहे. हाच पहिला क्ल्यु घेऊन संगमनेर पोलिस त्याच्या शोधात निघाले. आरोपी हा रुपचंद मुकूतराम वर्मा (हल्ली रा. स़गमनेर, मुळ, छत्तीसगड) हाच असावा. म्हणून हॉटेल मालकाकडून पोलिसांनी त्याची सखोल माहिती घेतली. तो यापुर्वी कोठे कामाला होता त्याचा तपशिल देखील घेतला. त्यानंतर समजले की, तो कोपरगाव तालुक्यात एका हॉटेलवर कामाला होता. तो तेथे जाऊ शकतो. त्यानंतर संगमनेर पोलिसांचे एक पथक तडक कोपरगावात दाखल झाले.दिवसरात्र एक करत तपास सुरु झाला. मात्र, अनेक ठिकाणी शोध घेऊनही संशयित आरोपी  मिळत नव्हता. मात्र, कोपरगाव तालुक्यातील त्या हॉटेल चालकाने पोलिसांना सांगितले की, संबंधित व्यक्ती हा काही पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एका दुकानात जात असतो. तेथे कदाचित त्याचा शोध लागू शकतो. म्हणून पोलिसांनी तेथे चौकशी केली. मात्र, तोवर हा व्यक्ती तेथे आलेला नव्हता. जर तो आलाच तर आम्हाला संपर्क करा अशी विनंती पोलिसांनी दुकानदाराला केली होती. तोवर यांनी जवळचे रेल्वे स्थानक, बस स्थानक, गर्दीची ठिकाणे यावर शोध घेतला. काही ठिकाणचे सीसीटिव्ही तपासले. मात्र त्याचा चेहरा कोठे दिसला नाही. दुदैवाने दुसऱ्या दिवशी एका दुकानदाराचा फोन आला. हा शुटर पैशांसाठी त्या दुकानात आला होता. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता दुकानदाराने पोलिसांशी संपर्क साधला आणि काही तासात पोलिस तेथे पोहचले. त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले आणि थेट संगमनेर पोलीस ठाण्यात आणले.

            दरम्यान, त्याला ताब्यात घेतले असता त्याला सदर घटनेबाबत विचारणा केली. तेव्हा पहिल्यांदा त्याने हल्लीगुल्ली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास त्यांच्या भाषेत विश्वासात घेतले असता दोन झापडित त्याच्यातील पोपट टमाटमा बोलु लागला. त्याने सांगितले की, संबंधित व्यक्ती ही हॉटेलहुन जात होती. त्या दरम्यान, मी तिच्याकडे काही सुखची मागणी केली. तिने विरोध केला तरी मी नशेत असल्यामुळे तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान आमच्यात काही व्यावहार ठरला होता. मात्र, त्याहून आमच्यात वाद झाले आणि नशेत असल्यामुळे मी दांड्याच्या सहाय्याने तिच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर तिला शेजारच्या गटारीत (चेंबर) लोटून दिले. मी नशेत असल्यामुळे, ती मयत झाली की नाही हे लक्षात आले नाही. मात्र, घडला प्रकार माझ्यावर येऊ नये म्हणून मी तेथून चालता झालो आणि जुन्या मालकाकडे जाऊन तेथे काम करण्याचे मी ठरविले होते. मात्र, पोलिसांनी मला पकडले. त्या महिलेवर मीच अत्याचार करुन खून केला आहे अशी तुर्तास माहिती आरोपीने कबुल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर, पोलिसांनी अद्याप या प्रकरणात वाढिव कलम लावले नाही. मात्र, पोलिस कोठडीनंतर काही चित्र स्पष्ट होऊन वाढीव कलमे लागतील असे पोलिसाचे म्हणणे आहे. यात पीएम रिपोर्टमध्ये डॉक्टर काय मत देतात हे देखील पाहणे गरजेचे आहे.