अकोले नगरपंचायतीत नगराध्यक्ष कोणाचा.! येथेच अडकली महाविकास आघाडी.! काही करा, पण, भाजपचा पराभव करा-ना. थोरात

 



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                              अकोले नगरपंचायतीची निवडणुक लागली असून आता महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाहून तिढा कायम राहिला आहे. खरंतर, १७ जागांपैकी  प्रभाग क्र. १६ (एसटी) व प्रभाग क्रमांक ६ (एससी) या दोन जागेवर आरक्षण जाहिर झाले आहे. आता यात गंमत अशी की, १५ जागेंवर फारशी रस्सीखेच दिसून येत नाही. मात्र, या आरक्षित दोन जागा आपल्याकडे कशा राहतील, यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांची रेलचेल सुरु आहे. याचे कारण म्हणजे कदाचित नगराध्यक्ष म्हणून एसी किंवा  एसटी यांची वर्णी लागण्यची शक्यता आहे. त्यामुळे, उमेदवार गरिब असला तरी चालेल. त्याच्यावर उधळण करु, पण, आपला नगराध्यक्ष हा बहुमान मिळविण्यासाठी सर्वांचाच आटापिटा सुरु आहे. मुळात हा प्रकार चूक असून डॉ. किरण लहामटे, गायकर साहेब, मधुभाऊ नवले व मच्छिद्र धुमाळ यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा आदर्श समोर ठेवून तालुक्यातील हा तिढा सोडविला पाहिजे. कारण, महाराष्ट्रात अशक्य अशी युती घडवून आणण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे नेते ना. बाळासाहेब थोरात यांनी सलोख्याची संयमाची आणि समझदारीची भुमिका घेतली, म्हणून ते सत्ता स्थापन करु शकले. तर, आज दोन वर्षे झाली. तरी यांच्यात मतभेद व मनभेद नाही. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. तरी, कॉंग्रेस व राष्ट्रवादीला त्याची हाव नाही. मुळात,  ठाकरे आपले आहेत, सरकार आपले आहे, मंत्रीमंडळ आपले आहे. येणारा आनंद व दु:खही आपल्याला वाटून घ्यायचे असे यांनी ठरविले आहे. म्हणून सरकार स्थिर आहे. जर, हाच विचार डॉ. लहामटे, मधुभाऊ व धुमाळ यांनी केला. तर, नगराध्यक्ष कोणीही होवो.! तो आपलाच आहे. या निवडणुकीत आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे, हेच लक्षात ठेवले तर नक्कीच ना. बाळासाहेब थोरात यांनी भाजपचा पराभव करा हा दिलेला संदेश साध्य होणार आहे..! 

पिचड पिता - पुत्रांच्या भाजप प्रवेशाने अकोले नगरपंचायतीत औंदा भाजपची ताकद वाढली आहे. अकोेले तालुका हा पुरोगामी विचारांचा असून येथे आरएसएस व भाजपच्या विचारसारणीला वाव नाही. हे कोण्या ज्योतिषाने नव्हे तर खुद्द जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध करुन दिले आहे. तरी देखील भाजपनं आपली हार मानली नाही. शहरात १७ उमेदवार तयार करुन स्वबळाचा नारा दिला. तसे पाहिले तर देशात आणि राज्यात भाजपलाच जनाधार आहे. हे नाकारुन चालणार नाही. केंद्रात सत्ता आहे,  राज्यातही १०५ आमदार आहे. परंतु, हा भाजपचा विजयी रथ मागे खेचण्याचं धाडस राजकीय डावपेच खेळून शरद पवार यांनी तडीस नेले. खरंतर, भापला नक्कीच जनाधार आहे.  मात्र, स्थान परत्व आणि व्यक्तीपरत्वे हे एकाच मुल्यांकणात बसत नाही. जसे, नागपुर-पुणे येथे त्यांना प्रतिसाद मिळतो तर अकोले-संगमनेर येथे नाही. त्यामुळे, येथील नेत्यांना नेहमीच पराभवाचा सामना करावा लागला आहे. अर्थात भाजपचे वैभव पिचड यांचा जिल्हा बँकेसह दोन वेळा पराभव झाला असेच म्हणावे लागेल. त्यानंतर अनेकांना वाटले होते की,  यानंतर होणाऱ्या निवडणुका ह्या पॅनलच्या नावाखाली लढल्या जातील. मात्र, तसे झाले नाही. उलट भाजपने शहरात पुन्हा नव्या दमाने उभारी घेतली. त्यामुळे, वैभव पिचड यांनी पुन्हा एक मोठे आव्हान पेलले असून जर त्यांना यात यश मिळाले तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेत फार मोठा मेसज जाणार आहे. याच निवडणुकीचे प्रतिबिंब येणाऱ्या अन्य निवडणुकींवर पडणार आहे. त्यामुळे, जर नगरपंचायतीवर कमळ फुलले तर मात्र, राष्ट्रवादीला येणाऱ्या काळात फार मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे, भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यात वापरलेल्या नितीचा अवलंब करणे अपेक्षित असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.

              आता तालक्यातील दुर्दैव असे की, महाविकास आघाडीतील काही नेते भाजपला फॉर आहेत. तर, कोणी भाऊप्रेमी आहेत. त्यामुळे, येथे भाजप विचारसारणी आणि त्यांचे तत्व हे फार काही मायने ठेवत नाही. तरी देखील काही मुस्लिम व दलित समाज यांना व्यक्ती कोण हे महत्वाचे नाही तर भाजप नकोच हा नारा पुढे येतो. आता दुर्दैव असे की, महाविकास आघाडीतीन नेत्यांना सत्ता आणि विचार यांचे काही पडलेले दिसत नाही. त्यांना एकमेकांची उणीधुनी करण्यात आणि जुन्या आठवणी जाग्या करुन एकमेकांना डिवचण्यात धन्यता वाटू लागली आहे. स्पष्टच सांगायचं ठरलं तर, कधी (एप्रिल २०२१) ते रवि मालुंजकर बोलले होते. त्यात आमदारांचा काही एक रोल नव्हता, तरी ते त्यांच्या माथी मारुन आज त्या आठवणींचे उत्खनन करुन जागा वाटपात ताणाताण सुरु केली आहे. तर, मालुंजकर यांचा स्वभाव पाहता त्यांच्या प्रतिउत्तरात आवेश  असला तरी द्वेष नव्हता. हे सर्वांनीच पाहिले आहे. मात्र, त्याचे भांडवल करुन आज वांग्याचं तेल तिळावर काढण्यात काय अर्थ आहे.! उलट कॉंग्रेसने ना. थोरात साहेबांच्या शब्दाचा आदर करुन भाजपचा पराभव करा या आदेशाचे पालन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची ताणाताण न करता राज्यातील महाविकास आघाडी स्थापन करताना जी भूमिका ना. बाळासाहेब थोरात यांनी पार पाडली. तिच भुमिका येथे जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक मधुभाऊ नवले यांनी पार पाडावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. ते त्यास सार्थ ठरतील अशी खात्री देखील अनेकांनी व्यक्त केली आहे.

               नगरपंचायतीत येणारा नगराध्यक्ष हा एसी किंवा एसटीचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्वांना सामाजिक व राजकीय प्रवाहात आणण्याचा हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साध्य केला आहे. त्याची प्रचिती आज येऊ घातली आहे. प्रभाग क्र 16 येथे मीना भांगरे (कॉंग्रेस मुलाखत) माधुरी लेंडे (राष्ट्रवादी मुलाखत) आणि भाजपचा उमेदवार अद्याप निच्छित नाही. त्यामुळे, या प्रभागात मतदार आहेत मात्र, उमेदवारांचा तुटवडा असल्याचे पहायला मिळत आहे. आता भांगरे यांना रमेश जगताप यांनी पुर्णत: आपल्या ताब्यात घेऊन उमेदवारी देखील फायनल केली आहे. तर, भांगरे कॉंग्रेसवासी झाल्यामुळे लेंडे यांना राष्ट्रवादीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे, यांच्यात महाविकास आघाडी झाली तर जो एक उमेदवार  शिल्लक राहिल. तो बेशक भाजपचा असणार आहे. आता येथे भाजपला गोत्यात आणणं शक्य आहे. मात्र, आघाडीच्या विचारात बिघाडी असल्याने ते अशक्य आहे. विशेष म्हणजे हा संभाव्य नगराध्यक्ष असल्याने सर्वांनीच ताकद पणाला लावली आहे. तर, दुसरीकडे प्रभाग क्रमांक ६ मध्ये निखिल जगताप यांचा प्रबळ उमेदवार आहे. मात्र, त्यांच्या विखे पाटील धोरणामुळे, घर का ना घाट का.! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे ते कॉंग्रेसचे पदाधिकारी म्हणून निवडून आले होते. तर, दुसरीकडे विखे पाटील यांच्या फाऊंडेशनचे ते एक भाग झाल्याचे पहायला मिळते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुक लढू पाहिली आहे. तर, शिवसेनेच्या ते संपर्कात आहे. आता राष्ट्रवादीने तेथे शिवसेनेचे नेते मिलिंद रुपवते यांच्या मुलीचे तिकिट जाहिर केले आहे. तर, भाजपने घोडके यांचे तिकिट जाहिर केेले आहे. तर कॉंग्रेसने किशोर रुपवते यांच्या पत्नीचे तिकीट फायनल केले आहे. यात निखिल जगताप यांचा उमेदवार निवडून येण्यास पात्र असताना देखील संदिग्ध राजकारणामुळे त्यांना तेथे त्रास झाल्याचे पहायला मिळते आहे. तरी देखील, जगताप यांचा उमेदवार अपक्ष जरी लढला तरी जिंकूण येण्याची ताकद किंवा कोणालातरी पाडण्याची ताकद त्यात असणार आहे. तर, या मतविभाजनाचा फायदा शंभर टक्के भाजपला होण्याची शक्यता आहे.  यातील विशेष म्हणजे नगरपंचायतीत नगराध्यक्ष म्हणून एससी महिला राखीव निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, हा प्रभाग देखील निवडणुकीतच्या केंद्रस्थानी असणार आहे. या सर्व प्रक्रियेत रिपाईचा रोल देखील महत्वाचा असणार आहे.

        एकंदर, भाजपला रोखायचे असेल तर  शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र यावे लागणार आहे. त्यासाठी  राट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिपजी वर्पे यांनी अकोल्यात येऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. काही झालं तरी महाविकास आघाडील प्राधान्य द्या, भाजपला रोखण्यासाठी त्यांनी कॉंग्रेसचे नेते मधुभाऊ नवले यांची भेट घेत महाविकास आघाडी स्थापन करण्यास प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांची भुमिका पार पाडली आहे. त्यांनी पुढे येत डॉ. किरण लहामटे, सिताराम पा. गायकर व मच्छिंद्र धुमाळ यांच्याशी चर्चा करुन तालुक्यात महाविकास आघाडीची सत्ता आणावी अशी चर्चा केली. नवले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येणाऱ्या दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. फक्त येथील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या राज्यातील नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तालुक्यात काम करावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

           दरम्यान, आज १ डिसेंबर २०२१ रोजी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठक पार पडली, यात कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झाला नाही. यात कॉंग्रेसने सांगितले की, आम्हाला युतीबाबत ना.   बाळासाहेब थोरात यांना विचारावे लागेल. हे शब्द एकल्यानंतर अनेकांनी कॉंग्रेसच्या या युक्तीवादाची खिल्ली उडविली.! जर, नगरपंचायत आणि अशा काही शुल्लक गोष्टींसाठी नामदार तथा राज्याच्या महसुल मंत्र्यांची गरज पडते तर स्थानिक नेतृत्व काय कारते?  येथील पदाधिकारी स्वत: डिसिजन मेकर नाहीत का? नामदारांना राज्यातील नगरपंचयतींच्या युतीत लक्ष घालायला वेळ द्यायचा तर नेते काय करतात? त्यांना सिमित करण्याचे काम चालु आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. खरंतर, अकोले तालुक्यात तज्ञ संचालक म्हणून जिल्हा बँकेवर मधुभाऊ नवले यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे, ते खरोखर तज्ञ असून त्यांनी तरी असे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले पाहिजे. महाविकास आघाडी करायची की नाही हे ठरलेले आहे. किमान स्थानिक कॉंग्रेसन ठरविले असते, जागा वाटपावर बोलले असते आणि तडजोड नाही झाली तर नामदारांकडे गेले असते तर काही वाटले नसते. परंतु, बे एके बे पासून वरिष्ठापर्यंत जायचे. हीच प्रथा तालुक्यात रुजू पाहत आहे. म्हणजे, कारखान्याचा प्रश्न उभा राहिला की तालुक्यातील काही व्यक्तींनी उठायचं आणि अजित दादांकडे जायचं, कोणाला कारखान्यात राजकीय स्थैर्य मिळवायचे असेल तर त्यांनी उठायचे आणि बारामतीत जाऊन शरद पवार साहेबांना भेटायचे. कोणाला अन्य प्रश्न असेल तर त्यांनी जायचं आणि सुप्रिया ताईंना गळ घालायची. हे असेच होत असेल तर तालुक्यात आमदार काय कामाला असतो? वरिष्ट नेते आणि पदे काय कामाला असतात? मग आता शिवसेनेला युती करायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटायचे का? या तुमच्या बुळबुळीत भाजपच्या  उमेदवारांची बिनविरोध निवड झाली नाही म्हणजे देव पावला.!