कॉंग्रेस गटनेत्याचा भर शहरात राडा, दगडफेक, तोडफोड आणि तुफान हाणामाऱ्या.! ना गुन्हा ना एनसी ना नोंद.! वा रे दडपशाही.!
सार्वभौम (संगमनेर) :-
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील सावता माळी नगर परिसरात काल शनिवार दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 च्या दरम्यान दोन गटात तुफान राडा झाला. यामध्ये जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे व प्राध्यापक यांच्यासह अनेकांनी एकमेकांना गच्ची धरून मारहाण केली. तर पठारातून कार्यकर्ते बोलावून काही युवकांनी दांड्याने गाडीच्या काचा फोडल्या. हा प्रकार पोलिसांकडून दाबला असला तरी तो एका कॅमेरात कैद झाला आहे. केवळ डोक्यात बाटली मारली म्हणुन त्याची खुन्नस काढण्यासाठी हा प्रकार घडला आहे. पण, थोरात साहेबांनी जो युवा चेहरा जनतेच्या समोर आणला जिल्ह्याची जबाबदारी दिली तोच चेहरा गल्लीबोळात येऊन गाड्या फोडत असेल, गच्ची धरून भांडण करत असेल तर यामध्ये ना. थोरात साहेबांची प्रतिमा मलीन होत असल्याचे बोलले जात आहे. दुर्दैव इतकेच की, राजकारण्यांनी केली ती मस्ती आणि सामान्यांनी केली ती दंगल.! अशा पद्धतीने लोकशाही सांगणाऱ्या आणि माननाऱ्या तालुक्यात होत असेल तर येथे नेत्यांची हुकूमशाही आणि प्रशासनावर दडपशाहीचा अवलंब केल्याची टिका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे, अजय यांचा पराजय करणाऱ्या घटना अशाच घडत राहिल्या तर सांगनेरात तथा पठारावर लॉन्च केलेला चेहरा चुकीचा आहे का? याचे चिंतन पक्षाने करणे गरजेचे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील तळेगाव येथे कॉंग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थित शेतकरी विरोधी कायदे रद्दचा किसान विजय दिन साजरा झाला. हा कार्यक्रम सायंकाळ पर्यंत चालला होता. आमदार, नामदार हे तेथून निघून गेल्यानंतर तेथे एका ठिकाणी जेवणासाठी जिल्हा परिषदेचे गटनेते व प्राध्यापक यांनी हजेरी लावली. त्यावेळी बाटली फेकाफेकीहून यांच्यात बाचाबाची झाली या बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाले. तेथे दोन्ही व्यक्ती एकमेकांना भिडले आणि ती चर्चा तालुकाभर पसरली. त्यामुळे हा वाद तळेगाव पुरता मर्यादीत न राहता तो प्राध्यापकाच्या घरापर्यंत आला. घडल्या घटनेचा कड काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट नेत्याने कार्यकर्ते जमा केले आणि सायंकाळी प्राध्यापक घरात जात असताना त्याला हटकवत गच्ची धरून बाहेर ओढले. त्यानंतर, प्राध्यापकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती प्रत्येक्षदर्शी यांनी दिली. यावेळी प्राध्यापकाची पत्नी सोडवण्यासाठी गेली असता जिल्हा परिषदेच्या गटनेत्याने व कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाला बेदम मारहाण केली. तर, सत्ताधाऱ्यांचा माज इतका होता की, यांनी माणसांसह मोटार सायकलींची देखील नुकसान केली. यामध्ये प्राध्यापकाच्या लहान मुलीला देखील पायाला काच लागल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर, रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान पोलीस घटनास्थळी आले. पण, दबावतंत्राचा वापर करून या घटनेवर पडदा टाकला.
मात्र, तुमचे राजकारण गेेले चुल्हीत असे म्हणत प्राध्यापकाच्या पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले. आता पोलीस ठाणे म्हटले की, रोडरोमिओ सुद्धा हाताची घडी घालुन उभे राहतात, येथे तर जबाबदार पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे, जितके मारायला होते, त्यापेक्षा अधिकजण सोडवायला होते. एकीकडे पोलीस ठाण्यात न्याय मिळतो असे म्हटले जाते. तर, दुसरीकडे पोलिस, राजकारणी आणि या बरबटलेल्या व्यवस्थेचा असली चेहरा जय भिम या चित्रपटाने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तशीच काहीशी दडपशाही पद्धत संगमनेर पोलीस ठाण्यात पहायला मिळते आहे. कारण, तेथे फिर्यादी गेली. मात्र, त्यांच्यावर दबाव आणायला पोलिसांनीच वेळ दिला. इतकेच काय.! पोलीस गाडी तेथे गेली, त्यांनी घडलेला राडा अगदी डोळ्यांनी पाहिला, आरोपी कोण हे देखील माहित झाले. पण, काय तर म्हणे फिर्यादीने तक्रार केली नाही. विशेष म्हणजे सार्वभौम प्रतिनिधी यांनी सकाळी जाऊन पोलीस ठाण्यात विचारले, गुन्हा दाखल आहे का? स्टेशन डायरीला नोंद आहे का? सीसीटीएनएस ला नोंद किंवा अदखलपात्र काही आहे का? त्यावर ठाणे आंमलदार यांनी सागितले ते आले होते. परंतु, तक्रार दिली नाही. म्हणजे रात्री अपरात्री एखादी महिला पोलीस ठाण्यात काय चहापाणी करायला येते का? तिची तक्रार होती म्हणूनच ती पोलीस ठाण्यात आली होती ना.? पण, संगमनेरात आता न्याय मिळतो असे जरा देखील वाटत नाही. असे मत आणि खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर अंतीम क्षणी प्रचंड दबाव व अनेक कारणास्तव बड्या नेत्यांच्या मध्यस्थी नंतर हा वाद पोलीस ठाण्यात मिटला. परंतु, गाड्या फोडल्या, घरांवर दगडफेक, हणामार्या असे होऊनही कोणीही आरोपी नाही. मग, असा प्रकार घडलाच नाही का? अशा वेळी खुद्द पोलिसांनी फिर्यादी होणे अपेक्षित आहे. पण, अशी हिंम्मत संगमनेरात दाखवणे अशक्य अशी गोष्ट आहे. असे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, थोरात साहेबांनी या तरुणाला ज्या पद्धतीने विश्वसात घेऊन पठारभागावरील नेता केले. तालुक्यात युवा चेहरा तयार केला. सभापती पद दिले. मात्र, त्याच चेहऱ्याने आज पठारावरील कार्यकर्ते जमा करून शहरात राडा घातला. गाड्या फोडल्या हे वागणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता संगमनेरातील सुज्ञ जनता करत आहे. आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पठारावर शिवसेनेला शह देण्यासाठी या चेहऱ्याला थोरात साहेबांनी पुढे काढले होते. पण, तोच चेहरा रस्त्यावर भांडण करत असेल तर थोरात साहेबांवर देखील या चेहऱ्याचा विचार करावा लागेल. अशी परिस्थिती त्याने स्वत: निर्माण केली आहे. पठारावर असे होत असेल तर कॉंग्रेसला फटांगरे यांच्याकडून आहेर मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, ज्या जनतेची सेवा करण्याची आणि पुरोगामी तथा गांधीवादी चेहरा म्हणून कॉंग्रेसची ओळख आहे. त्यांनी लोकांचे चेहरे फोडण्याचे काम केले तर जनता त्यांना त्यांचा चेहरा दाखविल्याशिवाय राहणार नाही. कारण, भर निवडणुकीच्या तोंडावर अशी राडेबाजी पक्षाला घातक ठरेल इतका देखील विवेक नेत्यांकडे नसेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांची वाटचाल प्रगतीकडे आहे की अधोगतीकडे चालली आहे. याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
दरम्यान, संगमनेरमध्ये एरवी गुन्हे दाखल होतात. मात्र, आजकाल पोलीस ठाण्यात राजकीय हस्तक्षेपामुळे दबाव असल्याचे पाहायला मिळत असल्याचे बोलले आहे. दिल्ली नाक्यावर पोलिसांवर दगड फेक झाली. सय्यद बाबा चौक येथे एच.एमचा प्रकार झाला. गोमांस वरून हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला. वादग्रस्त पोस्ट वरून एक समुह पोलीस ठाण्यावर आला यामध्ये पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले. पोलीस ठाण्यात कुंड्या फोडल्या आणि आता दोन गटात तुफान हाणामाऱ्या झाल्या तरी देखील साधा गुन्हा नाही. स्टेशन डायरीला नोंद नाही त्यामुळे, संगमनेरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असुन. येथे पोलिसांचा वचक राहिला की नाही असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहे. पोलिसांच्या या गलथान कारभारामुळे संगमनेरसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस निरीक्षक यांनी आपली भुमिका बदलणे गरजेचे आहे. नाहीतर यामुळे जनसामान्यांना हाक ना नाक त्रास सहन करावा लागतो. असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, ना. थोरात साहेबांची किर्ती आणि राजकीय संस्कृती याची राज्यात नव्हे, देशात किर्ती आहे. त्यामुळे, त्यांच्या माध्यामातून कोट्यावधी रुपयांचा निधी, मोठमोठी पदे आणि प्रतिष्ठा ही कार्यकर्त्यांना न सांगता मिळते. त्यामुळे, त्यांच्याकडून दुसरी काहीच अपेक्षा नाही. फक्त साहेबांच्या विश्वासाला तढा जाऊ न देणे, जी कामे येतील त्यांचे नियोजन करुन अंमलबजावणी करणे आणि स्वत:ची प्रतिमा पक्ष म्हणून मलिन होऊ न देणे. या व्यतिरिक्त यांच्याकडून अपेक्षा काय आहे. मात्र, दुर्दैवाने शुन्याला किंमत देऊन देखील काही कार्यकर्त्यांना त्याची किंमत नाही. हे फार मोठे दुर्दैव आहे. एकीकडे डॉ. सुधिर तांबे व दुर्गाताई यांचा स्वभाव व राजकीय संस्कार याला भल्याभल्यांनी सॅल्युट केला आहे. मात्र, त्यांच्या नगरपालिकेच्या हाद्दीत जर असे जबाबदार नेेत उतमात करीत असतील तर त्याचा तोटा याच कुटुंबाला सहन करावा लागणार आहे. ना. साहेबांना अपराजित करण्यासाठी पाच वर्षे एकएक कार्यकर्ते जमा करण्याचे काम त्यांची टिम करते आहे. तर, दुसरीकडे या टिमच्या कर्तुत्वावर पाणि फिरविण्याचे काम काही नेते करीत आहे. त्यामुळे, येणारा काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा आहे. तो लक्षात घेऊन जबाबदार नेत्यांनी वागले पाहिजे. असे मत कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.