अकोल्याचे थडक्लास राजकारण.! राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडून हे वाक्य शोभा देत नाही.! शिविगाळीचं व्यासपीठ.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्याला आजही पुरोगामी तालुका म्हणून संबोधले जाते. येथील चळवळींनी एकेकाळी राज्याची समीकरणे बदलविली आहेत. मात्र, आज अगदी बोटावर मोजता येतील असे लोक सोडले तर तालुक्याला खरोखर पुरोगामीत्वाचा चेहरा राहिलाय का? येथे विचारांपेक्षा व्यावहाराचे राजकारण रुजले आहेत आणि 5 टक्के समाजकारण तर 95 टक्के थडक्लास राजकारण उभे राहिले आहे. म्हणजे, 1925 पासून कम्युनिस्ट उभा राहिला. मात्र, त्यांनी कधी इतक्या थडक्लास शब्दांचा वापर करुन ना सत्ता मिळु पाहिली ना कोणाची उणीधुनी केली. त्यानंतर काँग्रेस आणि एवढेच काय.! मार्कवादी पक्षाने देखील टोकाचा विरोध केला. मात्र, जे काही मांडायचे ते अभ्यासपुर्ण, कोणाला नागडं करणे किंवा अनैतिक शब्दांच्या भाषेचा वापर त्यांनी कधी केला नाही. याचे उत्तम उदा. म्हणजे डॉ. अजित नवले आहेत. त्यामुळे, अकोले तालुक्यात मधुकर पिचड, डॉ. नवले, विजय वाकचौरे, विनय सावंत, कॉ. कारभारी उगले, मधुकर नवले, अॅड. शांताराम वाळुंज आणि अशा अन्य काही व्यक्ती सोडल्या तर तालुक्यात पुरोगामी चळवळीचे नाते राहिले का? असा प्रश्न सहज पडतो. कारण, येथे निवडणुका आल्या की, आवकाळी पावसासारखे नेते उगवतात आणि असे काही बरसतात की, खरोखर यांना नेते म्हणावे का? लोक यांना स्विकारतात तरी कसे? यांच्याकडे राजकीय संस्कृतीचा काही वारसा आहे की नाही? असेल तर त्यांनी तो अंगिकारला का? असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यामुळे, आजकाल नेत्यांची भाषणे पाहिली की, हा तालुका खरोखर पुरोगामी चळवळीचा आहे का? असा प्रश्न सहज उभा राहतो.
काल मी एका ज्येष्ठ कम्युनिस्ट व्यक्तीमत्वाशी बोलत होतो. तेव्हा, त्यांचे काही शब्द कानावर पडले आणि खरोखर मन सुन्न झाले. ते म्हणत होते की, ज्यांनी उभी हयात राजकारणात घातली. त्यांनी टिका टिपण्णी करताना तरी शब्दांचे तारतम्य बाळगले पाहिजे. समोरचा किती हिन आहे. यापेक्षा आपली राजकीय संस्कृती गल्लीच्छ नाही. हेच त्यांच्या वक्तृत्वातून प्रतित होणे अपेक्षित होते. खरंतर आम्ही पिचड साहेबांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, इतक्या हिन शब्दांचा वापर केला नाही. कारण, ती लढाई विचारांची होती आणि आजची लढाई सत्तासंघर्ष, रजकीय स्थैर्य आणि नैतिकता गहाण ठेऊन सुरू आहे. खरोखर याला जर राजकारण म्हणत असाल तर हे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे. याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
आता, एक काळ असा होता की, डॉ. आ. किरण लहामटे यांच्या शब्दांना प्रचंड धार होती. टिका टिपण्णी करताना त्यांच्या शब्दांचे तोल जात होते. त्यामुळे, माध्यमांमध्ये त्यांच्या स्वभावाबाबत उलटसुलट लिहिले जात होतेे. तेव्हा त्यांच्याच सोबत राहणार्या कपळकरंट्यांना फार गोड वाटत असे. आता मात्र आमदारांच्या शब्दांना प्रगल्भता आली असून तो व्हायरस त्यांच्या काही सहकार्यांमध्ये घुसला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, काही झालं तरी आपलं कोण आणि परकं कोण? आपल्या खांद्यावर बंदुक ठेऊन कोण निशाणा साधत आहे, कोणाला कशाचे डोहाळे लागले आहे, कोणी त्यांची पाठमोर्ही निंदा नालस्ती केली व करत आहे. त्यांच्या भोळ्यापणाचा फायदा कोण-कोण घेत होते. हे आता डॉक्टरांनी चांगलं समजून घेतलं असून काही भामट्या नेत्यांना त्यांनी बरोबर बाजुला सारले आहे. त्याचेच शल्य म्हणून कोणाकोणाचे शब्द किती घसरत आहे. हे आपल्याला पहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
खरंतर या तालुक्याला जशी निसर्गाची देणगी आहे. तशी, संस्कार आणि संस्कृतीची देखील देणगी आहे. येथे 1962 साली मंत्रीपदापेक्षा तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देणारे स्व. यशवंतराव भांगरे साहेब आपण पाहिले आहेत. तर, 1964 पासून ते आजवर कम्युनिस्ट विचार उराशी बाळगुन प्रत्येकाला प्रेमाणे बोलणारे, आरोग्य विचारत आदराने मनसोक्त मोकळे होणारे कॉ. कारभारी उगले साहेब आपण पाहतो आहे. इतकेच काय.! डॉ. अजित नवले यांनी सन 1995 पासून ते आजवर हजारो मोर्चे काढले आहेत. मात्र, कधी कोणाला नागडं केलं नाही, कोणाचे चारित्र्य हनन केले नाही, कोणाच्या व्यक्तीगत आयुष्याला छेडले नाही. त्यांनी तत्वाने आणि विचारांनी प्रत्येक प्रश्न मार्गी लावले आहेत. याला म्हणतात "चळवळ आणि लोकशाही" मार्गाने आंदोलन. मात्र, काल बैठका सुरू होतात काय आणि थडक्लास शब्दांची उधळण होते काय? त्यामुळे खरंतर हेच समजायला तयार नाही की, हे "परिवर्तन" आहे की "अधोगती"कडे वाटचाल.! ही सभा आहे की, मनोरंजनाचा कार्यक्रम.! कारण, यांच्या आरोप प्रत्यारोपाला कोणाचा विरोध मुळीच नाही. पण, शब्दांना देखील काही मर्यादा असतात त्यांचे उल्लंघन झाले तर त्याला राजकीय परिवर्तनाची नांदी म्हणता येईल का?
या तालुक्यात कॉ. बुवासाहेब नवले, भाऊसाहेब हांडे, बी.के.देशमुख, चंदर परते, मुरली मास्तर नवले यांनी देखील समाजकारण व राजकारण केले. मात्र, त्यांच्या वक्तृत्वाचा इतिहास पाहिला तर अगदी सुवर्णाक्षरांनी लिहिला जावे इतका तेजस्वी आणि ओजस्वी आहे. त्यांचे तालुक्यासाठी इतके मोठे योगदान असताना त्यांनी विरोधक सोडा.! त्यांच्या दुष्मनावर देखील गलिच्छ शब्दांचा प्रहार केला नाही. त्यामुळे, ज्यांना माईक हाती आल्यानंतर मोह आवरत नाही. त्यांनी आपल्या योगदानाबाबत थोडेशे आत्मचिंतन करुन तारतम्य बाळगणे अपेक्षित आहे. ज्यांना समाज जागर करायचा आहे, राजकारण करायचे आहे, सत्ता मिळवायची आहे, त्यांनी टिका करु नये असे कोणी म्हणत असेल तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. परंतु, बोलण्याला तारतम्य असावे, त्याला राजकीय कांगोरे नक्की असावे. पण, व्यक्तीदोष नसावा. म्हणजे, काल परवा राजकारणात येऊ पाहणार्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणे म्हणजे तालुक्याने यांना संधी देताना हजारदा विचार केला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
खरंतर, विजय वाकचौरे हे राज्याचे नेते आहेत. मात्र, त्यांनी कधी जात पात आणि कोणाची वैयक्तीक उणीधुनी काढली नाही. अजित नवले, मधुभाऊ नवले यांच्याकडून खरंतर तालुक्याने अभ्यासपुर्ण मांडणी आणि वक्तृत्वाची लकब शिकली पाहिजे. आ. डॉ. किरण लहामटे यांनी देखील कधी हातचा राखून भाषण केले नाही. जे मनात असेल ते ओठात आणायचे आणि मन मोकळे करायचे. मात्र, पिचडांवर बोलताना देखील आता त्यांची भूमिका कठोर असली तरी त्याला तारतम्य असते. तर, कोणी काहीही म्हणो.! पण, पिचड कुटुंब भलेही आज पराभूत असोत, आज त्यांचा पडता काळ असोत. पण, त्यांनी कधी कोणावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली नाही. नेहमी संयमाचे राजकारण केले. म्हणून तर 40 वर्षे ते सत्ता टिकवू शकले. त्यामुळे, सत्ता मिळविण्यासाठी कोणाची आयमाय काढायची गरज नसते, पण स्वत:ला सिद्ध करुन आपण सक्षम कसे आहोत हे अभ्यासपुर्ण मांडणीतून दाखवून द्यायचे असते. हेच आदरणीय शरद पवार साहेबांनी २०१९ च्या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे, या लेखाचा मतीतार्थ कोणाच्या शब्दांना विरोध करणे मुळीच नाही. फक्त, तालुक्याची राजकीय परंपरा जोपासणे आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला या तालुक्याने भरगोस मतांनी निवडून दिले. त्या जनतेला तुमच्याकडून सभ्यता आणि विकासाचे राजकारण हवे आहे. व्यक्तीद्वेष आणि सत्तेने पछाडलेल्या नेत्यांचे कंगना सारखे बालबोध शब्द नको.!
आज मी जो वरिल लेख लिहीला त्यावर एका नेत्याने जाहिरात संदर्भात भाष्य केले. मात्र, दुर्दैवाने ज्या नेत्याने भाष्य केले. त्यांनी मागिल दिवाळी अंकाचे पैसे दिले नाही. कोणीचे १ कोटी उत्पन्न असेल मला त्याचे सुख-दुख नाही.! पण जाहिरात नाही दिली तरी चालेल. स्पष्ट सांगा, पण दिली त्याचे पैसे बुडवू नका. आणि हो.! माझ्यावर चिखलफेक कराल तर त्याचे उत्तर त्याच भाषेत मिळेल लक्षात ठेवा. चव्हाट्यावर मलाही उभे राहता येते आणि करताही येते. सार्वभौम सोडा.! सागर शिंदे कोणाचा बांधिल नाही.!
पुढील लेख (दादा यांना आवरा.!) क्रमश: