बी.जे. देशमुख व राष्ट्रवादीचा काहीच संबंध नाही.! आमदार व अजित दादांच्या फोटोंचा यांनी गैरवापर केला, तो मेळावा पक्षासाठी बेकायदेशीर.!
सार्वभौम (अकोले) :-
निवृत्त प्रशासक बी.जे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्था परिवर्तनात मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याबाबत सोशल मीडियावर जी काही निमंत्रण पत्रिका फिरविण्यात आली. त्यात कारखान्याचे व्हा. चेअरमन सिताराम पाटील गायकर यांचा फोटो नाही. तर, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.लहामटे व भांगरे यांचे फोटो टाकून कारखान्यात राष्ट्रवादी पक्षात फुट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे, संबंधित कृतीसमिती ही राष्ट्रवादी काँग्रेसची नाही आणि बी.जे.देशमुख यांचा व राष्ट्रवादी पक्षाचा काही एक संबंध नाही. त्यांनी आरदणीय शरदचंद्र पवार साहेब, अजित दादा पवार आणि डॉ. किरण लहामटे साहेब यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटोचा गैरवापर केला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी बी.जे. देशमुख आणि त्यांच्या कृतीसमितीचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर राष्ट्रवादी पक्षात काही नेते फुटीरवादी वृत्तीचे असून ते आपली भुमिका स्पष्ट मांडत नाहीत. त्यामुळे, मी असा कार्यकर्ता आहे. की, ताकाला जाऊन गाडगे लापवत नाही अशा प्रकारे टोला लावून राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी घरचा आहेर दिला आहे. यावेळी, जिल्हाउपाध्यक्ष सुरेश खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महिला तालुकाध्यक्षा स्वातीताई शेणकर, कार्याधक्ष राजेंद्र कुमकर, युवक अध्यक्ष रविंद्र मालुंजकर, चंद्रकांत नवले, संजय वाकचौरे, शहर युवकाध्यक्ष अमित नाईकवाडी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बी.जे. देशमुख यांनी कारखान्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन व्यवस्थापरिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना वगळुन हा प्रयोग केल्यामुळे, पक्षातील काही निष्ठावंत नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुमकर यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना सांगितले की, अजित दादांनी पक्ष वाढीसाठी सिताराम पाटील गायकर यांना पक्षात घेतले. त्यांच्यामुळे आज कारखाना ताब्यात घेण्यास आपल्याला सोपे जाणार आहे. जरी या निवडणुकीत पक्ष म्हणून मतदान होत नसले तरी व्यक्तीश: गायकर साहेबांना तेथील अनुभव आहे. गेल्या विधानसभेत तालुक्याने पक्षाची ताकद दाखविली तर आता स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात घेऊनच गायकर साहेबांना पक्षात घेतले आहे. त्यामुळे, येथे दादांपेक्षा कोणी मोठे नाही. त्यांनी पक्षात दोन फळ्या पाडून संभ्रम निर्माण करु नये. बी. जे. देशमुख म्हणतात की, मला दादांनी असे सांगितले, तसे सांगितले. परंतु, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काय अर्थ आहे? ते खरे बोलतात की खोटे हे देवाला माहित. आम्हाला फक्त एकच माहित आहे की, गायकर साहेब हे राष्ट्रवादीचे अधिकृत नेते आहेत. त्यामुळे, येथील सत्ता हस्तगत करताना त्यांना टाळून कोणी आपले बस्तान बांधण्याचा प्रयत्न करु नये.
ते पुढे म्हणाले की, बी.जे. देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्या मेळाव्यात भाग घेतला? विधानसभेत त्यांचे योगदान काय? त्यांनी पक्षाला कधी आणि केव्हा बळ दिले? कोणत्या कार्यकर्त्याला पठबळ दिले? उलट त्यांच्या कुटुंबाने विधानसभेत भाजपला मदत केली आहे. त्यानंतर पिचड कुटुंबाचा पराभव झाला आणि यांनी राष्ट्रवादीत येण्याचे आगत्य केला. मात्र, जसा गायकर साहेब यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला तसे देशमुख यांनी केला का? त्यामुळे, त्यांनी मेळाव्या संदर्भात जो काही बॅनर प्रसिद्ध केला आहे. तो पक्षाचा अधिकृत नसून दादांच्या व आमदार साहेबांच्या फोटाचा त्यांनी गैरवापर केला आहे. येणार्या काळात राज्यस्थरीय नेते आणि आमदार साहेब जे काही आदेश देतील ते आम्ही मानायला तयार आहोत. मात्र, पडत्या काळात उभ्या केलेल्या पक्षात कोणी फुट पाडत असेल ते ही राजकीय स्थैर्यासाठी. तर ते आम्ही खपवून घेणार नाही.
दरम्यान, 2019 च्या परिवर्तनानंतर तालुक्यातील राष्ट्रवादीत दोन तीन नव्हे अनेक गट निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहे. कोणाला येणार्या विधानसभेच्या तिकीटाची चिंता आहे तर कोणाला कारखान्यात आपली वर्णी कशी लागेल याची भ्रांत आहे. कोणाला स्वत:चे पद टिकवायचे आहे, तर कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा निर्माण करायची आहे. त्यामुळे, पक्षावर ह्रदयातून प्रेम करणारे येथे फार कमी आहेत. मात्र, स्वार्थासाठी आर्त देणार्यांची संख्या काही कमी नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुकांचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळे, या झाडाहून त्या झाडावर उड्या मारणार्यांची संख्या वाढत जाईल. हे राजकारणात काही नवे नाही. मात्र, या सगळ्यात कारखान्याचे वाटोळे होऊन राष्ट्रवादी पक्षाची चाळण होऊ नये व कार्यकर्ते भरकटणार नाही, याची काळजी सर्वस्वी डॉ. किरण लहामटे साहेबांची असणार आहे. त्यांनी कोणाच्या बाजुने उभे रहावे कोणाला बळ द्यावे, कोणाची बाजु राज्यात मांडावी यावर खूप काही अवलंबून आहे. त्यामुळे, त्यांनी स्वत: स्वत:ची भुमिका ठाम करून त्या दिशेने वाटचाल करणे अपेक्षित आहे.
( बी.जे.देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उलला नाही. त्यामुळे, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.)
यात पक्षाचा काही संबंध नाही.!
स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्ष याचा काही एक संबंध नाही. पवार साहेबांनी झारीतील शुक्राचार्य बाजुला काढण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ती मी यशस्वीपणे पार पाडणार आहे. जर आमदार साहेब माझ्यासोबत आले तर आम्ही ते काम एकत्र करू. कारखान्यात आम्ही आगस्ति बचाव समिती स्थापन करून लढणार आहोत. बी.जे. देशमुख आमदार व आमची तीन तास बैठक झाली. त्यात काही निर्णय ठरले होते. त्यामुळे, येणार्या निवडणुकीत आम्ही मोर्चे, आंदोलने करुन अगस्ति वाचविण्याची भूमिका घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष नसून मंडळे असतात. गायकर साहेबांनी त्यांचे मंडळ जाहिर केले आहे. त्यामुळे. आम्ही देखील पॅनल उभा करून पिचडांना बाहेर काढणार आहोत.
- अशोक भांगरे (ज्येष्ठ नेते)
मेळावा पक्षाचा अधिकृत नाही.!
येणार्या काळात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था येऊ घातल्या आहेत. तेथे शक्यतो महाविकास आघाडीला प्राधान्य दिले जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारे गटतट होणार नाही. याची काळजी घ्यायची आहे. बी.जे. देशमुख यांनी जो काही मेळावा घेतला आहे. त्याबाबत मला काही कल्पना काही. मात्र, त्यांची एक बैठक बसली होती. त्यात जे काही झाले ते मला माहित नाही. त्यामुळे, बी.जे. देशमुख यांचा मेळावा हा राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत मेळावा मुळीच नाही. त्यांनी कोणाचे फोटो बॅनरवर छापावे आणि कोणाचे नाही. ही त्यांची लोकशही आहे. मात्र, आमदार साहेबांना आम्ही विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, मला फोटोबाबत विचारणा केली नाही.
- भानुदास तिकांडे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी)
राजकीय स्थैर्यासाठी होलपट.!
गेल्या कित्तेक दिवसांपासून काही नेत्यांनी कारखान्याची बदनामी सुरू केली आहे. सभासद, उत्पादक आणि तालुक्यातील जनतेला दिशाभुल करण्यासाठी भलतीच माहिती द्यायची आणि आपण कसे प्रांजळ आहोत हे सांगायचे. मात्र, सन 1989 पासून ते आजवर हे कोठे गेले होते. आता काही कामधंदा नाही म्हणून राजकारणात स्थैर्य मिळविण्यासाठी गाठीभेटी आणि मेळावे सुरू केले आहेत. अजित दादांनी जे सांगितले त्यापेक्षा तालुक्यात भलतीच चर्चा सुरू करुन मी देखील राष्ट्रवादीचे आहे असे म्हणणार्यांना आज कट्टर पक्षप्रेमी कुमकर यांनी चांगलीच चपराख दिली आहे. राजकारण ही काही फावल्या वेळेत करण्याची गोष्ट नाही. आज एकीकडे आमदार साहेब पायाला भिंगरी बांधून फिरत आहे, गायकर साहेब कारखान्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत आणि दुसरीकडे दादांचा आधार घेऊन तालुक्यात कोणी राजकारण करुन स्वत:च्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करीत असेल तर ते आम्ही खापवून घेणार नाही.
- विकास शेटे (राष्ट्रवादी कार्यकर्ता)