तू माझ्या गाडीवर का येत नाही असे म्हणत शिक्षकाने परिचारीकेस मिठी मारली, तिने स्वत:ला कोंडून घेत पोलिस बोलविले आणि दोघांनाही बेड्या ठोकल्या.!
सार्वभौम (राजूर) :-
तु दुसऱ्याच्या गाडीवर दवाखाण्यात का येते? मी तुला घरी नेवून सोडतो ना.! असे म्हणत एका शिक्षकाने परिचारीकेस कडकडून मिठी मारत तिचा विनयभंग केला. त्याच्यापासून सुटका करण्यासाठी या तरुणीने स्वत:ला हॉस्पिटलच्या एका खोलीत कोंडून घेतले आणि पोलिसांना बोलावून घेत दोघांनाही बेड्या ठोकण्यास सांगितल्या. मोठ्या धैर्याने पुढे येत अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घेत तिने शिक्षक व त्याच्या मित्रावर गुन्हा ठोकला आहे. ही घटना शनिवार दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादिनुसार राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक संतोष भाऊराव धिंदळे (रा. केळुंगण, ता. अकोले) व अनिल भरत पोपेरे (रा. कोंभाळणे, ता. अकोले, जि. अ.नगर) या दोघांना आरोपी करण्यात आले आहे. तर धिंदळे हे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून खाकी वर्दी चढवून आर.एस.पी म्हणून काम पाहतात.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित परिचारीका ह्या केळुंगण परिसरातून राजूर येथील एका डॉक्टरांकडे कामासाठी येत असतात. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नसल्यामुळे, मिळेल त्या वाहनाने प्रवास करुन त्या रोज राजुरला येत असतात. मात्र, या दरम्यान आरोपी संतोष धिंदळे यांची अपेक्षा असते की, काही झाले तरी हिने कोणाच्या गाडीवर येऊ नये, माझ्याच गाडीत बसून सोबत यावे. आता हा प्रकार कशासाठी ? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, पीडित तरुणीला त्यांच्यासोबत येणे योग्य वाटत नसेल, म्हणून तर तिने त्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आता, दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे, शिक्षक महाशयांनी आपल्या मित्राला सोबत घेतले आणि शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास थेट हॉस्पिटल गाठले. त्या दिवशी हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांनी पीडित परिचारीकेस सांगितले की, पेशन्टवर लक्ष ठेव, काही अर्जन्ट आल्यास फोन कर. त्यामुळे ती आपले काम चोख बजावत होती.
दरम्यानच्या काळात धिंदळे व त्याचा मित्र पोपेरे हे एक ओमनी कार घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले. पोपेर हा पुढे गेला असता परिचारीकेस म्हणाला की, बाहेर गाडी आली आहे. तुम्ही पटकन चला. तेव्हा या तरुणीस वाटले की, कोणी पेशन्ट आले आहे. त्यामुळे, त्या घाईघाई बाहेर येऊन गाडीकडे निघाल्या. गाडीत पेशन्ट असावे, त्यांना उतरता येत नसेल, सिरियस रुग्ण असावा म्हणून त्या शिताफीने पुढे झाल्या तर त्यास भलताच रुग्ण बसलेला होता. तेव्हा तिने गाडीत बसलेल्या धिंदळे शिक्षकास विचारले की काय झाले आहे. तेव्हा त्याने काही एक न एकता तिचा हात धरुन जवळ ओढले आणि मिठी मारली असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर, परिचारीका फार घाबरल्याने तिने त्यास जोराचा धक्का दिला आणि त्यास बाजुला लोटू देत तेथून पाळ काढला. हॉस्पिटलकडे येत असताना धिंदळे तिला आवाज देत होता. परंतु, तिने काही एक न एकता स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धिंदळे हा तिच्यामागे पळत येऊन त्याने तिचे केस घट्ट पकडून ओढत शिविगाळ करत म्हणाला की, तु दुसऱ्याच्या गाडीवर का ये जा करते, मी तुला घरी नेवून सोडतो असे म्हणत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला.
तेव्हा मोठा प्रसंगावधान राखत तिने हॉस्पिटलच्या एका खोलीत जाऊन स्वत:ल कोंडून घेतले. तेव्हा दरवाजावर थापा मारुन धिंदळे हा जोरजोरात दार उघड असे म्हणत होता. त्यामुळे, त्याच्यापासून वाचण्यासाठी पीडित तरुणीने तिच्या एका नातेवाईकास फोन करुन घडला प्रकार सांगितला आणि पोलिसांना घेऊन हॉस्पिटलला येण्यास सांगितले. त्यानुसार राजूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांची टिम तेथे काही क्षणात हजर झाली आणि या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काल याप्रकरणी पाडित तरुणीने फिर्याद दिली असून यात दोघांना अटक करण्यात आली आहे.
आता एका शिक्षकाने किंवा RSP ने अशा प्रकारचे कृत्य करणे समाज व्यवस्थेत कितपत संयुक्तीक वाटते आहे. जी लोक पिढी घडवितात, त्यांच्याकडून आशा प्रकारच्या वागण्याची अपेक्षा आहे का? जर शिक्षक एखाद्या महिलेच्या मागे-मागे फिरत असेल, तिला त्रास देत असेल तर त्यांच्यापासून काय विद्यार्थ्यांनी काय धडे घ्यावेत? विशेष म्हणजे, यातील शिक्षक हे आर.एस.पी म्हणून राजूर पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. कोरोनाच्या परिस्थितीत व जेथे पोलीस बळ कमी असेल अशा स्थितित त्यांचे योगदान मोलाचे ठरते. त्यामुळे, शिक्षकी पेशातील काही व्यक्तींनी पोलीस अधिकारी म्हणून काही अधिकार दिले जातात. विशेषत: शिक्षक हे शिस्तप्रिय व नियमबद्ध असल्यामुळे त्यांना हे पद शासनमान्य निर्माण केले आहे. त्यांच्या खांद्यावर दोन स्टार दिलेली खाकी वर्दी असते. त्यामुळे, आपण या समाजातील एक जबाबदार व प्रतिष्ठीत व्यक्ती आहोत. याची जाणिव ठेऊव वागणे अपेक्षित आहे. मात्र, तरुण तागड्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीने वागणे हे समाजव्यवस्थेला न पटल्याने राजूरमधुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.