जिल्हा बँकेची गरज नाही असे पिचड साहेबांनी स्पष्ट करावे, आम्ही बिनविरोध कारखाना त्यांच्या ताब्यात देऊ-गायकर पाटील
सार्वभौम (अकोले) :-
सन 1989 पासून ते अगदी कालपर्यंत गेल्या 28 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत शरद पवार साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अगस्तीवर संकट येऊ दिले नाही. तेव्हा राज्यबँक तर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून हवी ती रक्कम त्यांनी उपलब्ध करुन देत अकोले तालुक्याची कामधेनू टिकवली आहे. अगदी काल परवा त्यांनी अनेकांच्या कानपिचक्यांकडे दुर्लक्ष करुन कारखान्याला कोट्यावधी रुपये देऊ केले आहेत. असे असताना अचानक भाजपची टिमकी वाजवत चेअरमन मधुकर पिचड यांनी जो काही बागुलबुवा उभा केला आहे. तो अक्षरश: चुकीचा आणि खोटारडा आहे. जर केंद्रशासन कारखाने दत्तक घेऊ लागले तर आजवर भाजपच्या ताब्यात असणारे कारखाने बुडीत का निघाले आहेत? ते जिल्हा बँकेंचे उंबरे का झिजवत आहेत? अगस्ति टिकविण्यासाठी आम्ही स्वत: पाच-पाच कोटी रुपये पर्सनल लोन काढून का उपद्याप करीत आहोत? आजवर अगस्ति अडचणीत असताना साहेबांनी केंद्राकडून का कर्ज घेतले नाही? म्हणजे, एकीकडे कारखाना टिकवून येथील शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही धडपड करीत असताना पिचड साहेब मधेच केंद्राचे टुमके घेऊन राजकारण करु पाहत आहे. सभासदांना फोन करुन त्यांची दिशाभूल करीत आहेत. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असून त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावे संपुर्ण तालुक्याला. की, कारखान्याला जिल्हा बँकेची गरज नाही, राज्य सरकारची गरज नाही. जे काही कर्ज आहे ते केंद्र सरकार भरुन कारखाना कर्जमुक्त करेल. त्याक्षणी आम्ही त्यांच्या ताब्यात कारखाना देऊ आणि तेथून चालते होऊ.! मात्र, मोदी आणि शहांच्या आडून दिशाभूल करणारे राजकारण करु नये.! त्यांनी केंद्राला खुशाल दत्तक म्हणून जावे. हा कारखाना टिकविण्यासाठी पवार साहेब भक्कम आहे. अशा प्रकारचे मत अगस्ति कारखान्याचे व्हा. चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी व्यक्त केले आहे.
ते रोखठोक सार्वभौमशी बोलताना म्हणाले की, गेली 40 वर्षे आम्ही पवार साहेबांशी एकनिष्ठ म्हणून कार्यरत होतो. मात्र, स्थानिक नेतृत्व म्हणून भाजपमध्ये जावे लागले, तेथे प्रचंड वेदना होत होत्या. पण, पर्याय नव्हता. आजही आमच्या मनात ते शल्य कायम आहे. अजित दादांनी हा संपुर्ण तालुका पाणीयम करुन दिला आहे. त्यामुळे येथील शेतकरी तर उभा राहिलाच. मात्र, त्या पाठोपाठ नकळत उस उत्पादन होऊन कारखान्याचा देखील कणा बळकट झाला आहे. हे काम करण्यासाठी कोणी भाजपचे नेते किंवा कधी केंद्र सरकार आल्याचे इतिहासात नोंद नाही. ना कधी त्यांनी राज्यातील एकाही कारखाना दत्तक घेतला आहे. असे असताना अशा प्रकारच्या अफवा कशासाठी? आम्ही पिचड साहेबांचा आदर करतो. मात्र, ते जुने जाणते आहे. त्यांना देखील माहित आहे. पुर्वी राज्य बँकेच्या सहकार्याने अगस्ति चालत होता. तर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून तो सुरू आहे. जर जिल्हा बँकेने कारखान्यावरचा हात काढून घेतला तर उद्या चालु होण्याची पंचायत होईल. कारण, शेतकर्यांना पैसे देण्यासाठी दोनशे कोटी (प्लेज) नुकतेच जिल्हा बँकेने दिले आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि डॉ. किरण लहामटे यांची फार मोठी मदत झाली आहे.
आता जर जिल्हा बँक आणि राज्य सरकारची गरज नसेल तर पिचड साहेबांनी शेतकर्यांना पैसे देण्यासाठी दोनशे कोटींची गरज आहे. तर तत्काळ आणुन दाखवावी. मशिनरी, मोलॅसेस स्टील, आसवणी प्रकल्प, बेसल डोस, इथेनॉल प्रोजेक्ट यांच्यासाठी जिल्हा बँकेने तत्काळ कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. हे सर्व उपद्रव करण्यासाठी मी स्वत: सिताराम पाटील गायकर दिवसरात्र एक करतो आहे. अर्थात मला तालुक्याच्या शेतकर्यांची चिंता आहे, कारखान्याची चिंता आहे. त्यामुळे, कोणत्याही गोष्टीकडे काना डोळा करीत नाही. परंतु, अचानक अशा पद्धतीने शेतकर्यांना फसवायचे आणि त्यांना अश्वासीत करुन कारखाना जगला म्हणायचे. ते ही निवडणुका डोळ्यावर ठेऊन.! याचे मात्र फार वाईट वाटते. कारण, उस तोड्यापासून ते सारख विक्रीपर्यंत सर्व कारभार संभाळत असताना किती गोष्टींना तोंड द्यावे लागते, किती बिन बुडाचे आरोप सहन करावे लागते, किती यातना होतात याचे दु:ख मलाच माहित आहे. त्यामुळे, कारखाना चालविण्यासाठी जिल्हा बँकेचे गरज नाही असे म्हणण्यापुर्वी साहेबांनी खरोखर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
आता भाजप नेत्यांची जी काही बैठक झाली. त्यात काही मुद्दे अधोरेखीत करणारे होते. त्यात 13 कारखान्यांचा सामावेश होता. त्यातील कारखाने हे भाजपच्या ताब्यातील आहे. त्यात निरा-भिमा शंकरराव पाटील कारखाना, विखे पाटलांचा कारखाना, कोल्हेंचा कारखाना, मोहिते पाटील कारखाना, शकंर कारखाना, केन अॅग्रो सांगली कारखाना, दानवे यांचा रामेश्वर कारखाना अशा 13 पैकी एक अगस्ति कारखान्याचे देखील यात नाव आहे. या पत्रकातील काही मागण्यांमध्ये पिचड साहेबांनी अगस्ति कारखान्याचे नाव घेण्यास सांगितले होते. त्यानुसार आपल्या कारखान्याचा सामावेश करण्यात आला. मात्र, अशा प्रकारे कोणत्याही मागण्या त्यात मंजुर झालेल्या नाहीत. कारण, ज्या पद्धतीने वावडी उडविली गेली. त्याबाबत सरकारी दप्तरी त्याची चौकशी केली असता असे कोणतेही आदेश नाहीत. अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. आजवर ना टॅक्स माफ झाला आहे. ना कर्जाला मुदतवाढ मिळाली आहे. 25 कोटी जर केंद्राकडून मिळाले असते तर जिल्हाबँकेकडे प्लेज साठी हात पसरण्याची वेळ आली नसती. त्यामुळे, भाजपचे अश्वासने म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी असेच असून साहेब त्याचे बळी पडले आहे. राष्ट्रवादीत ते देणारे होते. मात्र, आता त्यांना निवेदने देऊन मागण्याची वेळ आली आहे. अर्थात कारखाना कोणाकडे दत्तक देऊन त्याचे वाटोळे करण्याची मानसिकता तालुक्यातील शेतकर्यांची नाही. त्यामुळे, त्यांनी स्वत: दत्तक जावे. मात्र, कारखान्याला दत्तक देण्याचा प्रयत्न करुन त्यावर राजकारण करू नये.
खरंतर, कारखाना टिकला पाहिजे, येथील शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण धडपड करीत आहोत. आमच्या संचालकांवर वैयक्तीक पाच कोटी रुपयांचे कर्ज आम्ही घेऊन घर घालुन समाजसेवे व्रत अंगिकारले आहे. त्यामुळे, जर केंद्र सरकार अगस्तिला दत्तक घेत असेल तर तत्काळ त्यांनी कारखान्यावरील कर्ज भरले पाहिजे. संचालकांनी जे काही कर्ज काढले आहे. त्यांचे उतारे निल केले पाहिजे, उभे राहणारे प्रकल्प आणि शेतकर्यांच्या बिलांसाठी कारखान्याच्या खात्यावर तत्काळ रक्कम टाकली पाहिजे. कारण, कारखाना कर्जमुक्त होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असे जर झाले तर आम्ही आज या मितीला कारखान्याहून बाजुला होऊ. बिन बोल सर्व कारखाना पिचड साहेबांच्या ताब्यात देऊ. मात्र, जर कोणी निव्वळ अश्वासने देऊन शेतकर्यांची दिशाभूल करीत असेल आणि कारखाना बुडीताकडे नेण्याचा प्रयत्न करीत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही.
गायकर साहेब म्हणाले की, गेली कित्तेक वर्षे मी सहकारात काम केले आहे. मात्र, मला झोपेतून उठविले तरी मी असे म्हणणार नाही की, जिल्हा बँक, राज्यबँक किंवा राज्य सरकार शिवाय कोणी कारखाना चालवू शकतो. कारण, पवार साहेबांनी मला सहा वर्षे जिल्हा बँकेचे चेअरमन केले. त्यातून कारखाने कसे टिकले पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले. म्हणून तर आजवर वेगवेगळ्या कर्जापोटी अब्जावधी रुपये जिल्हा बँकेकडून घेऊन ते आपण परत केले आहे. इतकेच काय.! गेल्या वर्षे दोन वर्षेत 169 कोटी 37 लाख रुपये कर्ज जिल्हा बँकेने दिले आहेत. त्याची 10 ते 15 कोटी रुपये परतफेड झाली आहे. तुम्हा सर्वांच्या माहितीस्तव सांगावेसे वाटते की, पिचड साहेब म्हणतात आता जिल्हा बँक, राज्य सरकरची गरज नाही. पण, जसा कारखाना उभा राहिला आहे. तेव्हापासून राज्य सरकार, पवार साहेब, जिल्हा बँक, राज्यबँक यांनीच कारखाना उभा केला आहे. त्यामुळे, शेतकरी, उस उत्पादक, तालुक्यातील नागरिक आणि सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करुन देऊ नये. एव्हाणा त्यांच्या भावनिक राजकारणाला तालुक्यातील जनता बळी पडणार नाही अशी मला खात्री आहे. असे मत व्हा. चेअरमन सिताराम पाटील गायकर साहेब यांनी व्यक्त केले आहे.