सरपंच झाला म्हणून अनुसुचित जातीच्या व्यक्तीस चपलांचा हार घालुन सत्कार केला.! जा, काय केस कराची ती कर.!
सार्वभौम (अकोले) :-
अनुसुचित जातीच्या सरपंचाचा आम्ही असाच सत्कार करतो असे म्हणून काही उच्चभ्रु समाजातील व्यक्तींनी संगमनेर तालुक्यातील कसारे येथील सरपंचाचा चपलांचा हार घालून सत्कार करीत अपमान केला. ही धक्कादायक घटना मंगळवार दि. २६ आँक्टोबर २०२१ रोजी नांदुर शिंगोटे ते लोणी जाणार्या रोडवर वडझरी परिसरात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कसारे गावचे सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे (रा. कसारे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णाजी सुर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामन कार्ले (दोघे रा. कसारे, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास पोलीस उपाधिक्षक राहुल मदने करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कसारे येथे गेल्या काही दिवसांपर्वी महेश आप्पासाहेब बोराडे यांनी ग्रामपंचायत निवडणुक लागली होती. त्यांना लोकांनी चांगल्या मतांनी विजयी केले. सुदैव म्हणा किंवा दुर्दैव.! पण, निवडणुकीनंतर आरक्षण जाहिर झाले आणि तेथे एससी समाजासाठी सरपंच पद जाहिर झाले. त्या दिवसापासून गावातील काही लोकांच्या राजकीय भावनांचा तिळपापड झाला होता. मात्र, लोकशाही आणि संविधानापुढे यांचे काहीच चालु शकत नाही. म्हणून गप गुमान दलितांचे नेतृत्व स्विकारणे हे त्या काही निवडक विघ्नसंतोषी व्यक्तींना बंधनकारक ठरले. म्हणून ही खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. आता महेश बोराडे हे निवडून आल्यानंतर त्यांनी आपला पदभार स्विकारला. मात्र, काही समाजकंठकांच्या डोळ्यात ते सलत होते. याला फुलांचा नाही तर चपलाचा हार घातला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात शिजत होते.
त्यामुळे, काल मंगळवार दि. 26 आरोपींना नामी संधी भेटली होती. सरपंच महेशराव हे त्यांच्या मुलीस तळेगाव येथील दवाखान्यात घेऊन जात होते. तेव्हा आरोपी कृष्णाजी सुर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामन कार्ले (दोघे रा. कसारे, ता. संगमनेर) यांनी सरपंचांच्या गाडीला त्यांची गाडी आडवी लावली. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. तर, तत्काळ, एक जुन्या चपलांचा हार काढून तो सरपंच यांच्या गळ्यात टाकला. आम्ही अनुसुचित सरपंचाचा असाच सत्कार करतो. असे बोलुन त्यांनी पानउतारा केला. तर, महिलांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे. एकीकडे अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे दलित कुटुंबावर जीवघेणा हल्ला हे प्रकरण अगदी ताजे असताना आज संगमनेर तालुक्यात चपलांच्या हारांचे प्रकरण घडले आहे. त्यामुळे, नगर जिल्ह्यातील दलित अत्याचार हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेच्या प्रचंड वेदना सहन केल्यानंतर त्यांनी दलितांना या हिन वागणुकीतून बाहेर काढण्यासाठी संविधानात विविध कलमांच्या माध्यमातून पीडित समाज्याला संरक्षण दिले. त्यात मुलभूत अधिकार आणि सार्वभौमत्व यांच्यासह अॅट्रॉसिटी सारखे हत्यार निर्माण केले. मात्र, जी डोक्यातून जाता-जात नाही तिला जात म्हणतात. त्यामुळे, काही समाजकंठकांच्या मनात टिच्चून भरलेली जातीयता अशा पद्धतीने बाहेर पडते आहे. एकीकडे खैरलांजी असेल तर दुसरीकडे नितीन आगे सारखे प्रकरण, एकीकडे सोनई हत्याकांड असेल तर दुरीकडे आता असे प्रकार. यात काही लोकांना मागासवर्गीय समाजाची उन्नती डोळ्यात खुपू पाहते आहे. म्हणून तर कोठे धिंड काढली जाते तर कोठे चपलांचे हार घातले जातात. यावर आळा बसण्यासाठी आजकाल पोलीस उपाधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास दिला जातो. मात्र होते काय? उपाधिक्षक नाममात्र तपास करतात आणि थातूर-मातूर दोषारोपपत्र दाखल करुन मोकळे होतात. त्याचा परिणाम काय होतो? तर, महाराष्ट्रात या गुन्ह्याखाली शिक्षा लागण्याचे प्रमाण अवघे 1.10 टक्के आहे. त्यामुळे, नावाला या कायद्याचा अवडंबर आहे. वास्तवत: अशा गुन्ह्यांत आता सहज जामीन होतो. कारण, तपासी अधिकारी फार काही तसदी घेताना दिसत नाही. अर्थात काम प्रामाणिक असेल तर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कर्तुत्ववान अधिकारी समीर वानखेडे साधा जामीन मिळू देत नाही. त्यामुळे, यात कोण कमी पडते आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
आता, जशा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. तेव्हापासून राजकीय संधीसाधु यांचे बुड बसले आहे. कारण, नामी ठिकाणी आरक्षण लागल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे, नाक मुरडून का होईना नको त्याला इच्छा नसताना बाबुराव म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, उच्चभ्रु समाजातील अनेक प्रस्तापितांच्या नाकातील केस जळाले असून गावोगावी दलित सरपंचांना तथा सदस्यांना मारेकरी घालणे, त्यांना घालुन पाडून बोलणे, शिविगाळ दमदाटी करणे असे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. अकोले तालुक्यातील राजकारणाने तर भलताच कळस गाठला आहे. जेथे दलित सरपंच झाल्याने भल्याभल्यांनी आपल्या गुढग्याचे बाशिंग सोडून ठेवले. गावात जणु पाच वर्षे हरताळ पाळल्याचे चित्र उभे केले जाते. प्रस्तापित पुढाऱ्याच्या बिनामिसरुड फुटलेल्या मुलाचा वाढदिवस असेल तर गावभर बॅनर लागतात आणि एखाद्या जातीयवादी मानसिकतेच्या गावात दलित सरपंच झाला की, अनेकांच्या बोकांडी भूत बसते. तेव्हा खऱ्या अर्थाने तेथील पुढाऱ्यांचा खरा चेहरा समोर येतो. म्हणेज, वान गांधींचा आणि गुण कसायाच. अशी परिस्थिती सिद्ध होते. यात निर्लज्ज पणाचा "कळस" असा की, काही अतिशहाणे ग्रामपंचायत सदस्य असून ते स्वत:ला सरपंच समजतात, उपसरपंच स्वत:ला बीडिओ समजतो, आम्ही आहोत म्हणून गाव आणि ग्रामपंचायत चालते या अविर्भावात छात्या फुगून चालतात. पण, वास्तवत: त्यांची परिस्थिती बैलगाडीखाली चाललेल्या कुत्र्यासारखी असते. त्यामुळे, अशा प्रकारे अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तींवर देखील तत्काळ कारवाई होणे अपेक्षात आहे. मात्र, पोलिसांनी देखील एक प्रकारे कळसच गाठला आहे. तक्रार अर्ज करुनही पाहू, करु, बोलवू, ठेऊ, जाऊ असे म्हणत रिकामे घोडे नाचविले जाते. पण, कोणत्याही प्रकारची कारवाई केल जात नाही.
दरम्यान, याच घटनेत मंगळवार दि. २६ आँक्टेबर २०२१ रोजी १ वाजण्याच्या सुमारास वनिता कृष्णाजी कार्ले (रा. कसारे, ता. संगमनेर) ह्या त्यांच्या पतीसोबत घरी चालल्या होत्या. त्यावेळी सोनवणे वस्तीजवळ असताना आरोपी महेश आण्णासाहेब बोराडे, चंद्रकात आण्णासाहेब बोराडे व कोमल चंद्रकांत पाखरे यांनी वनिता यांना अडवून त्यांच्या पतीस म्हणाले की, तुझी पत्नी सदस्य असताना तु मिटींगसाठी ग्रामंपचायत कार्यालयात कसा कय येतो.? असे म्हणून लाथाबुक्यांनी मारहाम केली. फिर्यादी वनिता ह्या भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडल्या असता त्यांना देखील दमदाटी करुन मारहाण केली. तर त्यांचे गळ्यातील दोन तोळ्याची सोण्यची पोत ही बळजबरीने हिसकवुन घेतली. तेव्हा आरोपी म्हणाले की, आमचे नादी लागला तर तुमच्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करु असे म्हणून धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.