विद्वानांच्या मिशीला कारखानदारांच थोडं खरकटं लागलं की, त्यांची भाषा बदलते.! नगर जिल्ह्यातील सर्व कारखानदार चोर आहेत.! मला एक दिवस नायक करा.!

 


- शंकर संगारे

सार्वभौम (अकोले):-

       नगर जिल्ह्यातील सर्वच कारखानदार हे चोर आहेत. येथे एफआरपी कमी का मिळतो? एक दिवस कारखाने माझ्या ताब्यात द्या. मग पहा मी 12 टक्क्यांच्या पुढे रिकव्हरी काढतो की नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे एकमेकांवर कारवाया करण्यात माहिर असले तरी शेतकर्‍यांच्या एफआरपीचा मुद्दा येतो तेव्हा हे सर्व एकत्र येतात. तर, यावर निर्णय घेणारे तथा शेतकर्‍यांची बाजु मांडणार्‍या विद्वानांच्या मिशीला कारखानदारांच थोडं खरकटं लागलं की, त्यांची भाषा बदलते. केंद्र सरकार तीन तुकड्यांमध्ये एफआरपी देण्याचा निर्णय घेऊ पाहत आहे. त्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टिका केली. ते बुधवारी (दि.13) अकोले तालुक्यातील गणोरे येथे उस परिषदेत बोलत होते.

 ते महाविकास आघाडीचे नाव न घेता म्हणाले की, केंद्राच्या मंत्र्याला (नारायण राणे) महाराष्ट्र शासन अटक करते आहे तर महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर (अजित दादा) केंद्र सरकार छापे टाकत आहे. मात्र, उसाची एफआरपी तोडाला ही दोघे एकत्र येतात. म्हणचे चोर-चोर मावस भाऊ सारे भेटून वाटून खाऊ.! अशीच अवस्था आज पहायला मिळत आहे. म्हणजे 2 ते अडिच कोटी उस उत्पादक संभाळण्यापेक्षा एक कारखानदार संभाळल्याने सर्वकाही फावते आहे. त्यामुळे, खाजगी काय आणि सरकारी काय.! हे सर्वच शेतकर्‍याला लुटायला बसले आहेत. यातून येणार्‍या काळात आता कोण लोकप्रतिनिधी आपला आणि कोण परका हे मात्र या विधेय्यक मंजुरीत लक्षात येणार आहे.

खरंतर पियुष गोयल हे खोटं बोलत आहेत. त्यांनी एफआरपी ही एक रकमी मिळेल अशा पद्धतीचा कोणताही सरकारी आदेश काढलेला नाही. जे सोशल मीडियावर फिरत आहे. ते दोन खाजगी व्यक्तींमधील संभाषण आहे. उद्याच्या काही दिवसात ते त्यांचा ठराव संसदेसमोर मांडतील. लोकसभा आणि राज्यसभा यात कोणकोण या विधेयकाला विरोध करतय. हे सगळ्या शेतकर्‍यांना लक्षात येईल. तेव्हा खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या बाजुने कोणता खासदार आहे आणि कोणता नाही. हे लक्षात येईल. (येथेच नगर जिल्ह्याचे खा. सदाशिव लोखंडे आणि डॉ. सुजय विखे यांची देखील परिक्षा घेता येणार आहे.) त्यानंतर तुम्हीच ठरवायचे आहे की. या उमेदवाराला 2024 मध्ये मतदान करायचे की नाही. खरंतर जो खासदार एफआरपीचे तीन तुकडे विधेयकाला विरोध करेल. तो कोणत्याही पक्षाचा असला तरी मी त्याचा जाहिर सत्कार करेल. मात्र, इतकी हिंम्मत कोणी करेल असे वाटत नाही. कारण, हे सर्वच मुंडी हलविणारे आहेत असे शेट्टी म्हणाले.

मा. खा. शेट्टी म्हणाले की, नगर जिल्ह्यात सर्वच कारखानदार चोर आहेत. एक दिवस माझ्या ताब्यात कारखाने द्या. तेथे मी फक्त तीन व्यक्तींची नेमणुक करेल. त्यात एक पोती मोजायला, दुसरा काट्यावर आणि तिसरा रस कोठे वाया जातोय तेथे आणि मग पाहतो येथील रिकवरी 12 टक्क्याच्या पुढे कशी जात नाही. मात्र, हे कारखानदार साखरेची चोरी करतात आणि काळ्या बाजारात नेऊन विकतात. हेच धंदे यांनी आजवर केले. तर रिकवरीला यांनी पळवाटा काढल्याची खंत शेट्टी यांनी व्यक्त केली. येणार्‍या काळात उस चळवळ बळकट करुन चांगल्या एफआरपीची अपेक्षा असेल तर तरुण शेतकरी माझ्या ताब्यात द्या मग पहा मी तुम्हाला रिझल्ट देतो की नाही. असे म्हणून त्यांनी शेतकर्‍यांवर दाखल होणार्‍या गुन्ह्यांवर आपलेच शेतकरी साधे जामीन देखील होत नाही. अशी खंत देखील बोलुन दाखविली. या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे, कार्याध्यक्ष सुरेश नवले, युवक अध्यक्ष शुभम आंबरे यांच्यासह अन्य शेतकरी पुत्रांना अथक परिश्रम घेतले.

येणार्‍या काळात आम्ही खासदार साहेबांना बळ देण्यासाठी गावागावातून तरुणांची फौज उभी करणार आहोत. राज्यात कोठेही शेतकर्‍यांबाबत अनुचित प्रकार घडला तर त्यावर प्रहार करण्यासाठी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही रस्त्यावर उतरू. अकोले तालुक्यातील तरुणांनी शेट्टी साहेबांकडे तथा संघटनेकडे राजकीय दृष्टीने न पहाता शेतकरी राजा म्हणून पहावे आणि आमच्या संघटनेत सहभागी होऊन साहेबांची ताकद अधिक बळकट करावी.

- सुशांत आरोटे (तालुकाध्यक्ष)