होय.! मी अधिकार्‍यांवर कारवाई करणार.! एसपींच्या शब्दाने 36 तासानंतर भगवा ऐल्गार थंडावला.! एसपी आंदोलकांच्या भेटीला.!

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर):-

         कत्तलखान्यांच्या विरोधात संगमनेरात पेटलेला ऐल्गार  अखेर 36 तासानंतर थंडावला आहे. कत्तलखाने उध्वस्त झाले खरे.! मात्र, त्यांना अकार्यक्षमतेचा आरोप करीत अधिकार्‍यांना देखील निलंबित करुन बडतर्फ करा. अशी मागणी संघटनेनी केली होती. पोलीस उपाधिक्षक दिपाली काळे, यांच्या लेखी पत्राला अक्षरश: त्यांनीच केराची टोपली दाखविली. त्यामुळे, आंदोलकांचा या अधिकार्‍यांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे, पुन्हा पेटलेल्या आंदोलनाला 36 तास उलटल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी थेट मुंबईत डिजी साहेबांना भेटले आणि त्यांना कारवाईची मागणी केली. तर, दुसरीकडे भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट पोलीस अधिक्षकांना फोन करुन आंदोलन आणि कारवाई याबाबत विचारणा केली. तेव्हा पोलीस अधिक्षकांनी शब्द दिला आहे की, सोमवार किंवा मंगळवारी मी आंदोलकांशी चर्चा करुन कारवाई करेल. एकंदर संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी कुलकर्णी, गायकर आणि विखे पाटील यांच्या शिष्टाईनंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे. जर, 149 च्या नोटीसा काढून किंवा पोलीस अधिक्षकांनी संगमनेरात येऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि कारवाईस टाळाटाळ केली. तर आता संगमनेर नव्हे.! संपुर्ण राज्यात हे आंदोलन उभे करु. असे वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना सांगितले. 

दरम्यान, संगमनेर शहरात कत्तलखान्यावर राज्यातील सर्वात मोठा छापा पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके (श्रीरामपुर) यांनी टाकला आणि स्थानिक पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेवर संगमनेरकरांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्यानंतर नगरपालिकेने त्यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार कत्तलखाने उध्वस्त केले. मात्र, पोलिसांनी लेखी देऊन देखील पोलीस उपाधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे, पोलिसांकडून हिदुत्ववादी संघटनेच्या विश्वासाची कत्तल झाली. अशा प्रकारची टिका प्रशासनावर होत आहे. अर्थात शुल्लक कारण असते तर ठिक होते. मात्र, त्यांच्या हाद्दीत कोटी रुपयांच्या कारवाया होतात आणि तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. तर दुसरीकडे शुल्लक कारणाहून पीएसआय माळी यांचे निलंबन व सपोनी कोकाटे यांच्या बदली होते. कामात कुचराई किंवा अकार्यक्षमता दिसून येत असताना देखील अधिकार्‍यांना पाठीशी घातले जात असेल तर या गोष्टीला शब्दच उरत नाही. असे म्हणत हिंदुत्ववादी संघटनांनी आपले आंदोलन अधिक तिव्र केले आहे.

दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी संदिप मिटके यांच्या पथकाने संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे कत्तलखान्यांवर छापेमारी केली होती. त्यात 1 कोटी 50 लाख 50 हजार 50 रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केला होता. तर त्याच ठिकाणी 31 हजार किलो मांसासह अक्षरश: रक्ताचा सडा पडल्याचे पहायला मिळाले होते. या प्रकरणात दोषी म्हणून पोलीस उपाधिक्षक राहुल मदने आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तर नगरपालिकेने हे कत्तलखाने सील करुन उध्वस्त करावे असे निवेदनात म्हटले होते. अर्थात बोले तैसा चाले, त्याची वंदवी पाऊले अशा पद्धतीने प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी त्यांच्या अखत्यारित जे काही होते. ते लेखी दिलेल्या पत्रानुसार त्याचे शब्द प्रमाण असल्याचे सिद्ध करुन दिले. मात्र, पोलीस उपाधिक्षक दिपाली काळे यांनी दिलेल्या लेखी अश्वासनावर अद्याप टांगती तलवार आहे. यात खर्‍या अर्थाने प्रांत व नगरपालिका यांचा पुर्णत: रोल संपला आहे. कारण, पुढील कारवाई करण्याचा अधिकार हा सर्वेसर्वा पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब यांना आहे.

खरंतर, एखाद्या पोलीस ठाण्याच्या हाद्दीत जर फार मोठी कारवाई होत असेल. तर, तेथील प्रभारी अधिकारी किंवा विभागीय अधिकारी बदलता येतच नाही, असे काही नाही. कारण, कोपर्डी, जवखेडा, कोपरगाव कत्तलखाना छापे अशी अनेक प्रकरणे घडली तेव्हा तेथील दोन्ही अधिकारी बदलले होते. ऐव्हाना निलंबित केले होते. मग हा प्रकार काही कमी नाही. त्यामुळे, किमान तत्पुरत्या स्वरुपात यांना नियंत्रण कक्षेत घेऊन जनप्रक्षोभ कमी केला असता तर काय बिघडले असते? म्हणजे, तत्कालिन पोलीस अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी साहेब या ठिकाणी असते तर त्यांनी त्या दिवसाची सायंकाळ देखील उलटू दिली नसती. कारण, जेथे जनता विरोधात जाते, तेथे अधिकार्‍यांनी काम करण्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात अर्थ तरी काय आहे. त्यामुळे, या प्रकरणात अधिक काही अनुचित प्रकार होण्यापेक्षा तुर्तात नियंत्रण कक्ष आणि नंतर चौकशी अशा पद्धतीने कायदेशीर प्रक्रियाला काय हरकत आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राज्यातील मोठमोठ्या अधिकार्‍यांकडून येत आहे. मात्र, घोडे कोठे पाणी पितेय हे देखील उलटपालट चर्चेतून समोर येऊ लागले आहे.

यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचा कणा तथा महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांची राज्यातील आणि देशातील प्रतिमा अगदी स्वच्छ आहे. त्यामुळे, किमान त्यांनी या प्रकरणात लक्ष घालुन हा सर्व राज्यभर जाणारा संदेश व कत्तलखान्यांचा प्रश्न यातून संगमनेरचे नाव अधिक चर्चेत येणार नाही. यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भलेही तालुक्यात यात भाजप किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील. मात्र, साहेब सत्तेत असून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे. अर्थात स्थानिक पातळीवर नगरपालिकेने दिलेला शब्द पाळल्याने प्रश्न सरकार तथा गृहविभाग व पोलीस अधिक्षकांच्या दालनातील आहे. कारण, पीआयवर एसपी तर DYSP वर गृहमंत्री हेच कारवाई करु शकतात. त्यामुळे, तेथे मजल त्यांचीच जाऊ शकते आणि काम देखील तेथून तत्काळ होऊ शकते.

आता असे असताना देखील आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यांनी आज थेट पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. अशा पद्धतीने आंदोलन सुरु असताना अधिकार्‍यांवर कारवाई का होत नाही? अशा प्रश्न त्यांनी उभा केला. त्यानंतर पाटील यांनी शब्द दिला आहे की, सोमवार किंवा मंगळवार या दोन दिवसात मी स्वत: संगमनेर येथे जाऊन संबंधित कार्यकर्त्यांसोबत चर्चा करेल आणि संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करेल. तर यापुर्वी बजरंगदलाचे वरिष्ठ पदाधिकारी विवेक कुलकर्णी व शंकर गायकर यांनी मुंबईत डीजी साहेब यांची भेट घेऊन घडलेला प्रकार कथन केला आहे. त्यानंतर स्थानिक अधिकारी कशा पद्धतीने पाठीशी घालतात याचा पाढा त्याां वाचला. त्यानंतर थेट नगरशी संपर्क होऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे, आज दोन दिवसानंतर स्थगित करण्यात आले आहे.