युनियन बँक 56 लाख रुपयांचा घोटाळा.!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेर शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या शाखेत 56 लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक, यांच्यासह अन्य तीन व्यक्तींनी बनावट कागदपत्रे तयार करुन वर्ग प्रकरणे मंजूर करून स्वत:च्या फायद्यासाठी बँकेचा विश्वासघात केला. ही घटना 31 डिसेंबर 2013 ते 1 जानेवारी 2021 या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नितीन कुमार (शाखा व्यवस्थापक), रुपेश आर धारवाड व विलास एल कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, युनियन बँक ऑफ इंडिया ही एक अग्रगण्य बँक आहे. तिच्या संगमनेर शाखेत आरोपी नितीन कुमार हा शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. तर रुपेश धारवाड हा सिंगल वीडो ऑपरेटर व विलास कुटे हा एक मध्यस्त म्हणून होता. आरोपी यांनी सन 2011 ते 2013 या दरम्यान शेतीकरीता व लागवडीसाठी तथा शेतीच्या अन्य कामांसाठी कर्ज उपलब्धतेसाठी बँकेत आले होते. तेव्हा तत्कालिन अधिकारी यांनी त्यांना काही कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी केली देखील होती. त्यानंतर त्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले. मात्र, त्यातील काही कागदपत्रे बनावट होती तर काही सह्या देखील खोट्या मारलेल्या होत्या. तेव्हा बँकेचे काही वरिष्ठ अधिकारी हे चौकशीसाठी गेले असता त्यांना आरोपी यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर याची सखोल चौकशी झाली असता लक्षात आले की, यात काही बनावट कागदपत्रे तयार करुन ते खरे असल्याचे भासवुन बँकेकडून कर्ज मंजुर करुन घेतले. त्यामुळे, यात अपहार झाला असून बँकेची फसवणुक करण्यात आली आहे.
एकंदर यात असे लक्षात येते की, आरोपी यांनी 15 कर्ज प्रकरणे मंजुर करताना बँकेच्या नियम व अटींचे उल्लंघन केले आहे. संपुर्ण कर्ज प्रकरणे संशयास्पद वाटप केले आहेत. जे कर्ज पास केले आहे. त्या चेकवर चेक पास करणार्या सक्षम अधिकार्यांच्या शेरा किंवा सह्या नाहीत. जे कर्ज वाटप केले आहे. त्यातील काही रक्कम त्यांना मिळाली, तर काही रक्कम आरोपींच्या नातेवाईकांना अनाधिकृतपणे वाटप करण्यात आली आहे. संबंधित रकमा वाटप करताना आरोपींनी नियम व अटींचा भंग केला आहे. जे काही कर्ज काढण्यासाठी चेक वटविला आहे. त्यावरील सह्या ह्या मिळत्या जुळत्या नाहीत. हा सर्व प्रकार गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यात कुटे हाच याचा मास्टरमाईंड असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे, समाधान सिताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नितीन कुमार (शाखा व्यवस्थापक), रुपेश आर धारवाड व विलास एल कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत.