अमेरीकेतील 15 लाख डॉलर्ससाठी त्याने एकाला साप चावून मारुन टाकले.! स्वत: मयत असल्याचे सांगून 10 कोटी उकळण्याचा प्रयत्न, पाच जणांना ठोकल्या बेड्या.!

सार्वभौम (राजूर) :-

                        आमेरीकेतील 15 लाख रुपयांचा ईन्शुरन्स मिळविण्यासाठी कळस बु येथील एका तरुणाने अक्षरश: निर्लज्ज पणाचा कळस गाठला. त्याने स्वत:ला मयत दाखविण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीला सार्पदंश करुन ठार केले आणि त्याचे नाव लापवून स्वत: मयत असल्याचा बोभाटा केला. मात्र, तो जिवंत असल्याची माहिती मिळताच हा सर्व प्रकार उघड झाला आहे. ही घटना धामनगाव आणि राजूर येथे दि.19 एप्रिल 2021 रोजी घडली. यात नवनाथ यशवंत आनप (रा. धामनगाव आवारी, ता. अकोले, जि. अ.नगर) हा तरुण मयत झाला असून त्याचा खून करणार्‍या पाच जणांची नावे समोर आली आहे. त्यात मुख्य आरोपी प्रभाकर भिकाजी वाकचौरे (रा. कळस, ता. अकोले), हर्षद रघुनाथ लहामगे (रा. राजूर, ता. अकोले), हरिष रामनाथ कुलाळ (रा. कोंदणी, ता. अकोले), प्रशांत रामहरी चौधरी (रा. धामनगाव पाठ, ता. अकोले) व संदिप सुदाम तळेकर (रा. पैठण, ता. अकोले) अशा पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी देविदास भडकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, प्रभाकर भिकाजी वाकचौरे हा मुख्य आरोपी कळस येथील रहिवासी आहे. तो गेल्या काही वर्षापासून मुंबई येथील एरोली येथे राहत होता. तेथून तो कालांतराने अमोरीकेत राहण्यासाठी गेला. तेथे त्याने 20 वर्षे वास्तव्य केले आणि तेथेच त्याने 15 लाख अमेरीकन डॉलरचा इन्शुरन्स काढला होता. (ही भारताची रक्कम जवळपास 10 कोटी रु) त्यानंतर तो जानेवारी 2021 मध्ये भारतात आला होता. आता त्याला आमेरीकेत जाण्याची इच्छा नसल्याने त्याने भलतीच अटकल लढविली. हा प्लॅन यशस्वि करण्यासाठी त्याने त्याचा नातेवाईक संदिप सुदाम तळेकर (रा. पैठण) याची मदत घेतली. जर हा प्लॅन यशस्वी झाला तर यांना देखील काही रकमेची लालच दाखविण्यात आली होती. मात्र, तळेकर याला त्यात फारसे काही माहिती नव्हते.

दरम्यान, 15 लाख अमेरीकन डॉलर मिळविण्यासाठी तळेकर याने त्याचा मित्र हर्षल लहामगे (रा. राजूर) याच्यासोबत प्रभाकरची ओळख करुन दिली. मार्च 2021 मध्ये यांच्यात नियोजनाची बैठक बसली. तेव्हा असे ठरले की, एका व्यक्तीचा शोध घ्यायचा आणि त्याला सर्पदंश करून मारुन टाकायचे. त्याची डेथ बॅडी घेऊन दवाखान्यात न्यायची, त्याचा पंचनामा करताना मयत व्यक्तीचे खरे नाव दडवून पोलिस व डॉक्टरांना सांगताना प्रभाकर वाघचौरे असे सांगायचे. ती कागदपत्रे हाती लागली की, क्लेम पास होण्यासाठी मदत होईल. त्यात सहज जिवन जगून मौजमजा करता येईल अशा पद्धतीने या तिघांनी त्यांचा नियोजित प्लॅन तयार केला होता. या नियोजनासाठी त्यांनी राजूर येथे पिंपारकणे रोडवर दि. 1 एप्रिल 2021 रोजी एक खोली भाडे तत्वावर घेतली होती. तोच पत्ता तयार करुन राजूर येथे पैसे बोलविण्याचा प्लॅन त्यांनी आखला.

आता, व्यक्ती मारायचा म्हणजे तो कोठून आणायचा? साप देखील कोठे उपलब्ध करायचा? असा प्रश्न समोर असताना हर्षल याने त्याच्या सर्पमित्राची भेट घेतली. गारुड्याला खेळ करण्यासाठी नागाची गरज आहे असे म्हणून त्यांनी 19 एप्रिल 2021 रोजी सर्पमित्राकडून एका बर्नीत साप उपलब्ध केला. तर, दि. 21 एप्रिल 2021 रोजी प्रभाकर चौधरी व प्रशांत चौधरी यांनी त्यांच्या इरटिका गाडीत धामनगाव पाट येथील एक मनोरुग्ण व्यक्ती धरुन आणला. त्याला एक दिवस रुमवर ठेऊन दुसर्‍या दिवशी (दि.22) सकाळी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हिलेदेव शिवारात नेवून रोडच्या कडेला गाडी थांबवून त्यांनी त्यास खाली घेतले आणि बरनीतून विषारी साप काढून त्याच्या पायला दंश केला. ते विष शरिरात भिनावे म्हणून हे सर्वजण जवळजवळ एक तास तेथेच थांबले. तो मयत होईल ही शाश्वती होताच त्याला उचलले आणि गाडीत टाकून रूमवर नेले. कोणी विचारले तर वॉकींग करताना सर्पदंश झाला असे त्यांनी प्लॅनिंग केले.

दरम्यान, संबंधित मनोरुग्ण निद्रीस्त झाल्यानंतर हर्षदने 108 नंबरहून अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला. गाडी सकाळी 7 वाजता त्यांच्या दारात आली. मात्र, तोवर हा व्यक्ती मयत झालेला होता. त्यामुळे, रुग्णवाहीका चालकाने त्यांना मृतदेह गाडीत घेण्यास नकार दिला. आता यांच्या नियोजनानुसार सर्व बरोबर झाले होते. त्यामुळे, यांनी ती बॉडी उचलली आणि एका खाजगी गाडीतून राजूर रुग्णालयात दाखल केला. तेथे यांनी मयत व्यक्तीचे नाव प्रभाकर भिकाजी वाकचौरे (रा. कळस, ता. अकोले) असे सांगितले. डॉक्टरांनी तशा प्रकारची नोंद करुन घेतली. तर पंचनामा करण्यासाठी जेव्हा पोलीस आले. तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारची कागपदत्रे जवळ नाही असे म्हणून शेंड्या लावण्याचे काम केले. पोलीस आणि डॉक्टर यांनी लेखी दिलेल्यानंतर आरोपींनी मयत व्यक्ती यास राजुरच्या स्मशानभुमीत आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर चौकशी झाल्यानंतर तो मयत मनोरुग्ण व्यक्ती हा नवनाथ यशवंत आनप (रा. धामनगाव आवारी, ता. अकोले) असल्याचे नंतर लक्षात आले.

दरम्यान, जेव्हा या घटनेचा बोलबोला सुरू झाला, पोलिसांची चौकशी लागली तेव्हा प्रभाकर भिकाजी वाकचौरे (रा. कळस, ता. अकोले) हा जिवंत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी स्वत: या घटनेबाबत माहिती काढणे सुरू केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, प्रभाकर वाकचौरे हा मयत नसून तो खरोखर जिवंत आहे. तो धमनगाव पाठ येथे त्याच्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यास साबळे यांनी ताब्यात घेतले असता त्याला पोलिसांचा खाक्या दाखविण्यात आला. तेव्हा त्याने घडलेला काही प्रकार सांगितला. त्यात त्याच्या साथिदारांची नावे पुढे आली असता त्यातील एकाने सर्व भांडाफोड केली आणि मग मात्र साबळे यांनी सर्वांना बेड्या ठोकल्या. खरंतर हा प्रकार म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीचा आहे. सात महिन्यानंतर देखील सहायक पोलीस निरीक्षक साबळे यांनी एका खुनाचा उलगडा केल्याने पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्यांचे व त्यांच्या टिमचे कौतूक केले आहे. आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या तपासात स.पो.नी.नरेंद्र साबळे, पो.ना.देविदास भडकवाड,पो.ना.दिलीप डगळे, पो.काँ.प्रविण थोरात, पो.कॉ.अशोक गाढे, पो.कॉ.विजय फटांगरे,पो.कॉ.अशोक काळे, चालक पो.कॉ.राकेश मुळाने, चालक पो.कॉ.पांडुरंग पटेकर यांनी अथक परिश्रम घेतले.