खा.आठवले पडले तेव्हा माझे पती दांडा घेऊन फिरत होते.! आज त्यांना कार्यकर्त्यांचा विसर पडला.! ना. थोरात आणि विखे कुटुंबांनी आम्हाला परके केले.!

 

- सागर शिंदे 

सार्वभौम विशेष :- 

              अप्रिय आमदार, खासदार आणि मंत्र्यांनो.!

           होय.! मी तुमच्याच एका मयत कार्यकर्त्यांची अभागी आणि प्रचंड मानसिक यातना सोसत खचून गेलेली पत्नी बोलते आहे. गेल्या चार महिन्यात माझा नवरा कोरोनाने गेला आणि माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. तो जिवंत होता तेव्हा उर बडून सांगायचा.! सखे तू काळजी करु नको, मी जरी मेलो तरी माझा नेता तुझ्या पाठीशी अगदी भावासारखा ऊभा राहिल. हा माझा सगळा समाज तुला कुटूंबातील बहिन समजून तुझ्या पाठीशी पहाडासारखी उभा राहिल. पण, काय झालं? धनी तुम्ही गेलात आणि आम्ही पोरकं झालो.! माझ्या लेकरांच्या डोक्यावर कसं का होईना फाटकं आभाळ होतं, ते देखील विरुन गेलं, तुमच्या जाण्यानं माझं आयुष्य मातीमोल झालंय. पण, दोन मुली आणि या मुलाला तुम्ही माझ्या पदरात टाकून चालता झालात. धनी.! तुम्ही म्हणत होतात ना, की, माझ्या पश्चात माझा नेता तुला आधार देईल, तुझ्या दारावर येऊन तुझ्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणल.! मग कुठय तुमचा नेता आणि कुठय तुमचा समाज.......! त्या माय माऊलीच्या या अर्त किंकाळ्या अजुनही आमच्या कानाभोवती गुंजत आहे. कारण, संगमनेर तालुक्यातील शिपलापूर येथील ढाण्या वाघ दिलीप मन्तोडे मयत झाला आणि उभं आयुष्य दलित चळवळीसाठी खर्ची घातलेल्या मन्तोडेंचं घर आज उघड्यावर आले. आ. विखे पाटील कुटूंब, ना. थोरात साहेब यांच्यासाठी जीवाचं रान करणारा दिलीप मातीआड झाला. परंतु, या नेत्यांनी आजवर त्यांच्या दारावर भेट देखील दिली नाही. ही खंत राणी मन्तोडे यांनी मोठ्या भरल्या डोळ्यांनी व्यक्त केली. हे तर सोडा हो.! दिलीपराव ज्यांचे जन्मजात कार्यकर्ते होते. ज्यांच्यासाठी ते रक्ताचे पाट वहायला बेहत्तर मानत होते. त्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मन्तोडे यांच्या घरी भेट दिली नाही. त्यामुळे,  राणी (पत्नी) मन्तोडे यांनी खा. आठवले आणि दलित चळवळ यावर नाराजी व्यक्त करीत आपल्या पतीला आठवत त्या धाय मोकलून रडल्या. त्यांच्या भावनांची ही रोखठोक मुलाखत.! हा सर्व उहापोह मांडल्यानंतर रिपाईचे नेते विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, भिमा बागूल, यांना दखल घ्यावी हीच अपेक्षा. 

            माझे पती गेल्या ३० वर्षापासून दलित चळवळीत स्वत:ला झोकून देत काम करत होते. त्यांना समजतेय तेव्हापासून तर अगदी मरेपर्यंत चळवळ आणि समाजसेवा ही त्यांच्या आयुष्याला पुजलेली होती. गावची गल्ली ते दिल्ली असा त्यांच्या कामाचा सामाजिक वारसा होता. नगर जिल्ह्यात कोठेही कोणावरही अन्याय अत्याचार होऊ, ते पहिले त्यांच्या पाठीशी उभे रहायचे. त्यामुळे, त्यांच्यावर अनेक केसेस आजही कोर्टात चालु आहेत. तेव्हा मी त्यांना सांगत होते.  ही समाजसेवा बंद करा, पोटपाणी आणि मुलांच्या शिक्षणासह कुटुंब उभे करण्यासाठी प्रयत्न करा. तेव्हा ते उर भरुन म्हणायचे की. तू चिंता करु नको, माझ्या जीवाचे काही बरे वाईट होईल तेव्हा आपला सगळा समाज तुझ्या पाठीशी उभा राहिल. मात्र, ते गेले आणि त्यांच्या पश्चात कोणताही समाज आपली लेक पोरकी झाली म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेलायला आला नाही. समाज सोडा हो.! माझे पती निवडणुकीचे बुथ ते काही सभा यासाठी कधी विखे तर कधी थोरात गटाकडून अगदी स्वत:ला झोकून देत काम करायचे. ही नेते मंडळी गावात आली की पतीचा मोठा पुढाकार असायचा. यांच्यासाठी त्यांनी कधी मारामाऱ्या कराला देखील मागेपुढे पाहिले नाही.  परंतु, ते गेले आणि या नेत्यांनी साधी विचारणा देखील केली नाही. या कुटुंबाचे काय चालले आहे, हे देखील पाहता आले नाही.

          माझ्या पतीला सामाजिक व राजकीय जीवणाची एक नशा होती. त्याचे फलित मात्र त्यांच्या पश्चात मिळाले नाही. त्यांच्या जाण्याने माझ्यावर दु:खाचा डोंगर तर कोसळला आहेच.! परंतु, हाती कवडीचाही आधार नसताना दोन वयात आलेल्या मुली आणि एक मुलगा याचे लालन पालन हे माझ्या फार जिव्हारी लागणारे प्रश्न आहेत. कारण, पतीच्या निधनानंतर दोन वेळेचे अन्न मिळविण्यासाठी माझ्या मुली आणि मी रोज लोकांच्या बांधावर उभे राहत आहोत. आज देशात अनेक निर्भया आणि खैरलांजी घडत असताना माझ्या मनात नाना प्रश्न काहूर करुन जातात. दिवसभर उन डोक्यावर घेऊन घामानं ओलंचिब व्हावं लागतं. तेव्हा चोरदोन रुपये मिळतात. तरी देखील चिंतेने झोप लागत नाही. त्यामुळे, चळवळीच्या नावाखाली आयुष्य वेचलेला नवरा अर्ध्यावरती डाव मोडून जातो तेव्हा एका निराधार महिलेची काय आवस्था होते. हे त्या राजकारण्यांना काय कळणार आहे.? यात दुर्दैव असे की, माझे पती गेल्यानंतर हा समाज देखील माझ्या पाठीशी उभा राहिला नाही. त्यामुळे, ज्या समाजासाठी माझे पती झिजले त्यांनी तरी माझ्या वेदनांचा अंत पहायला नको होेता. त्यामुळे, माझा पती माझ्या भावनांचा दोषी आहे. तर, ही चळवळ आणि हा समाज माझा दोषी आहे. त्यामुळे, कार्यकर्ता होताना तरुणांनी हजारदा विचार करावा. हेच मला मनोमन सांगू वाटते आहे. कारण, जी वेळ  आज माझ्यावर आली आहे. ती अन्य कोण्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येऊ नये. हीच माझी ईच्छा.!

         दलित चळवळ तुम्ही अगदी डोक्यावर घेऊन नाचविता. त्याची कार्यकर्त्यांना एक नशीच लावून देता. मात्र, त्या पलिकडे तुम्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटूंबाचा देखील विचार केला पाहिजे. किमान त्याच्या हयातीनंतर त्याचे कुटुंब दोन वेळच्या अन्नाला तडफडणार नाही याची तजबिज तुम्ही केली पाहिजे. कारण, राजकारण आणि समाजकारण ह्या चळवळीच्या दोन बाजू असल्या तरी त्यात खा.आठवले यांच्यासह अनेकांचे  फावते. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि कुटुंबाची फार वाताहात होते. कारण, त्याचे चटके मी सोसत आहे. म्हणून इतक्या तळतळीने मांडावेसे वाटते आहे. आज दिलीपराव गेले म्हणून माझे कुटुंब उघड्यावर आले. त्याची मला प्रचिती आली आणि माझा तळतळाट सुरु झाला. आज या महाराष्ट्रात आणि देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे कित्तेक चळवळी असतील. त्यांचे पुढारपण करुन लोकं आमदार, खासदार आणि मंत्री झाले. पण, ज्यांनी या चळवळी चालविण्यासाठी रस्त्यावर रक्त सांडविले, ज्यांनी कुटुंब दुय्यम स्थानी ठेवले, ज्यांनी कधी अंगावर येणाऱ्या गुन्ह्यांचा विचार केला नाही. ते कार्यकर्ते मातीत गेले आणि त्यांचे नेते लाल दिव्याच्या गाडीत मुंबई-दिल्ली सफर करत आहेत. मात्र, आपला निष्ठावंत कार्यकर्ता गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला भेट द्यावी, त्यांना बळ द्यावं, प्रेमाने विचारपूस करावी असे त्यांना का वाटत नाही. त्यामुळे, खऱ्या अर्थाने माझा बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकर्षाने आठवण होत आहे. कारण, मी सहज एकदा वाचले होते की, जेव्हा एक व्यक्ती डॉ. बाबासाहेबांकडे आला आणि तो म्हणाला साहेब.! मला आपल्या दलितांची सेवा करायची आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले तु काय करतोस? तुझ्या कुटुंबाची गुजरान कशी चालते, तू घरी नसेल तर घरच्यांना दोन वेळची रोजीरोटी मिळेल का? त्यावर तो निरुत्तर झाला. तेव्हा डॉ. बाबासाहेबांनी जे काही उत्तर दिले. ते आजच्या सर्व कार्यकर्त्यांना लागू होते. ते म्हणाले, प्रत्येकाने पहिले आपले कुटुंब सक्षम केले पाहिजे, आपली मुले स्वत:च्या पायावर उभी केली पाहिजे, आपण असो वा नको तरी आपले कुटुंब उपासपोटी राहणार नाही. इतके ते सक्षम करण्याची जबाबदारी अंगावर घेतली पाहिजे. त्यानंतर चळवळ आणि राजकारण याकडे लक्ष दिले पाहिजे. आज, चळवळीची प्रचंड वाईट दशा आहे. नेते झालेत मोठे आणि कार्यकर्ते राहिलेत गहाण. त्यामुळे, डॉ. बाबासाहेबांना स्मरुन मी प्रत्येकाला हेच सांगेल. चळवळ नक्की करा, पण मुलं मुली आणि कुटुंब यांची वाताहात होऊ देऊ नका. कारण घराचा वासा मोडला तर संपुर्ण घर कोलमडून जाते. आज माझी अगदी तशीच अवस्था झाली आहे.

           खरंतर आज फार खेदाने व्यक्त व्हावे वाटते की, माझे पती हे खा. रामदास आठवले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. यदा कदाचित त्यांचे रक्त तपासले असते तरी त्यातून आठवलेंचे नामस्मरण झाले असते, इतकी कट्टर निष्ठा होती. मला चांगले आठवतेय की, जेव्हा २००९ साली आठवले हे  शिर्डी लोकसभा मतदार संघतून उभे राहिले होते. तेव्हा माझ्या पतीला प्रचंड आनंद झाला होता. आपला नेता आपल्या जवळ आला आहे. तो निवडून आला पाहिजे. आपल्या समाज्याची कामे झाली पाहिजे, जिल्ह्यातील चळवळ मजबूत झाली पाहिजे अशा अनेक अपेक्षांनी ते आनंदून गेले होते. त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी ते अगदी वेडेपिसे होऊन काम करीत होते. उत्तर नगर जिल्ह्यात त्यांना जे-जे काही शक्य होेते. ते-ते करण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी गाव - गाव पिंजून कप आणि बशी उराशी घेऊन प्रचारासाठी ते पछाडले होते. दुर्दैवाने येथील बड्या नेत्यांनी दगा दिला आणि आठवले साहेबांचा पराभव झाला. जेव्हा पराभवाची माहिती माझ्या पतीस मिळाली, तेव्हा मात्र ते भान हरपून गेले होते. काय करावे आणि काय नाही, याची त्यांना शुद्ध राहिली नव्हती. त्या रात्री एक भलामोठा दांडोका काढून त्यांनी गावात भर चौकात उभे राहून मतदारांना शब्द - अपशब्दाने अपमानीत केले. हा रोष येथेच थांबला नाही.! तर, गावोगावी आणि अन्य तालुक्यात जाऊन त्यांना तेव्हा ना. थोरात आणि आ. विखे यांचे प्रतिकात्मक पुतळे करुन ते जाळले होते. ते अगदी भान हरपून गेले होते. महिनाभर त्यांना अन्न गोड लागत नव्हते. त्यांची अस्वस्थता पाहून माझ्या मुली आणि मुलगा त्यांना समजू सांगत होता. मात्र, पराभवाचा सदमा खुद्द आठवले यांना बसला नसेल तितका दिलीपराव मन्तोडे यांना बसला होता.

              आता खेद याचा की, माझे पती गेल्यानंतर झाले काय.? तर, ज्या आठवलेंसाठी त्यांचा कार्यकर्ता वेडा झाला होता. त्या व्यक्तीच्या मयताचा निरोप कळून देखील त्यांचा साधा फोनही कुंटुंबाला आला नाही. आहो.! इतकेच काय.! जिल्ह्यात भलेभले पुढारी आणि समाज तो देखील दारावर आला नाही. त्यामुळे, कार्यकर्त्याने कमविले तरी काय? हाच प्रश्न माझ्यासारख्या व्यक्तीला पडतो. आज लोक सहज बोलून जातात, दिलीपने चळवळीत काम केले, तो एक पँथर होता, समाज्याच्या पाठीशी खंबिर उभा रहायचा. पण, तो गेल्यानंतर कोणी नेता दारावर आला नाही. हेच बोचणारे शब्द चळवळीने आमच्या पदरात टाकलेय का? आज, दोन मुली घेऊन मी लोकांच्या बांधावर ऊभी राहते आहे. दोन वेळच्या अन्नासाठी झुंजते आहे परिस्थितीशी, वयात आलेल्या मुली आणि थांबलेले शिक्षण, पाझरणारं पडकं घर आणि समाज्याची बोचणी, नेत्यांचं दुर्लक्ष आणि बेवारस आयुष्य बहाल केलं आहे तुम्ही लोकांना मला. नाही रडणार मी लढणार यापुढे.! पण, जगाच्या लाजंकाजं का होईन.! भेट देऊन जा साहेब, तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला. ठेऊन जा एकदा तरी हात त्यांच्या निराधार लेकराच्या डोक्यावर, होऊद्या स्वप्न साकार त्यांचे की, होय मी गेल्यानंतर माझा नेता तुझ्या घरी येऊन भावासारखा तुझ्या पाठीशी उभा राहिल. तुम्ही आले म्हणजे राजकीय नेते येतातच तुमच्या मागेमागे. त्यामुळे, होईल त्यांचा आत्मा तृप्त तुमच्या येण्याने. साहेब.! माझ्यासाठी नव्हे.! तुमच्या कार्यकर्त्याचा आत्मा घोटाळतो आहे घराभोवती तुमची वाट पाहत. त्यामुळे, आम्हीही तुमची वाट पाहतोय  चातका सारखी आमच्या धन्याला शांती मिळण्यासाठी.....!

                  आज दिलीप मन्तोडे यांच्या पत्नीचे चळवळीबाबत आणि नेत्यांबाबत मत ऐकल्यानंतर मन सुन्न होऊन जाते. पहिले कुटुंब आणि मग चळवळ हे लक्षात येते. नेते समाजाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करुन घेतात, त्यांची उद्दीष्ठे पार पडल्यानंतर पाच वर्षे त्यांना कार्यकर्यांची आठवण होत नाही. आज कोरोनाचा काळ सुरु आहे. घरातील कर्ते पुरुष निघून जात आहे. कोरोनात हजारो आणि लाखो रुपये खर्च होत आहे. त्यामुळे, कोणी जमीन विकतो आहे तर कोणी सोने-नाणे विकून बील भरत आहे. जेव्हा घरातील कर्ता पुरुष  निघून जातो तेव्हा सर्व कुटुंब उघड्यावर पडते आणि कुटुंबाची वाताहात होते. ही परिस्थिती एकट्या मन्तोडे यांचीच नाही. तर, चळवळीतील अनेकांची आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील संजय गायकवाड आणि आंबड येथील बाळासाहेब सरोदे यांची देखील सेम आहे. तर उंचखडक खुर्द येथील अपघातात गेलेल्या रमेश पवार यांची परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काही संदेश दिला आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. हाच आपण अंगिकारुन स्वयंप्रकाशित  झाले पाहिजे. कोणी नेता आणि समाज आपल्यामागे उभे रहायला शिल्लक नाही.  बाबासाहेबांच्या नावे राजकारण सोडून येथे कोणाला समाज बांधिलकी राहिलेली नाही. हेच खरे आहे. त्यामुळे, प्रत्येकाने आपापली मुले शिकवा, नोकरी, उद्याेद धंदा यात निष्णात करुन सक्षम करा. कारण, कोणतीही चळवळ ही तुमच्या असण्याने किंवा नसण्याने थांबत नाही. पण, तुमच्या नसण्याने तुमचे कुटुंब पुर्णत: थांबून उघड्यावर येते. हे कधीच विसरु नका..!