..तर डॉ. लहामटे त्यांच्या बायकोपुढे हात जोडत असतील, तर डॉक्टर आज मंत्री झाले असते.!

- शंकर संगारे

सार्वभौम (अकोले) :- 

             अकोले तालुक्यातील रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात साम टिव्हीचे संपादक प्रसन्न जोशी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. तेव्हा, कार्यक्रम सुरू असताना आमदार डॉ. किरण लहामटे हे त्यांच्या शेजारी बसले होते. सहज बोलता बोलता जोशी यांनी डॉ. लहामटे यांच्या चेहर्‍याकडे पाहिले आणि दमलेली छबी पाहून त्यांचा दिनक्रम विचारला. पहाटे 7 वाजता घराबाहेर पडणारा व्यक्ती दिवसभर किती दौरे करतो, किती कार्यक्रम करतो आणि किती जणाांना हात जोडतो.! त्यामुळे, जेव्हा रात्री घरी जात असतील तेव्हा बायकोने दरवाजा उघडल्यानंतर त्यांना देखील ते अपसूक हात जोडत असतील अशा प्रकारची खिल्ली त्यांनी उडविली. मात्र, यातून डॉ. लहामटे हे दररोज किती प्रवास करतात, किती लोकांना प्रेमाने हात जोडतात हेच त्यांनी सांगण्याचे काम केले. तर, राज्यात रोटरी क्लब प्रमाणे राज्यकारभार असता तर डॉ. किरण लहामटे आज मंत्री झाले असते असे म्हणत त्यांनी अमोल वैद्य यांच्या उपक्रमांसह रोटरी क्लबच्या कार्यपद्धतीचे कौतूक केले.

खरंतर डॉ. किरण लहामटे यांची एकला चलो रे.! ही कार्यपद्धती अनेकांना पटत नसली तरी, त्याचे भल्याभल्यांनी आजवर कौतूक केले आहे. तीच प्रचिती पुन्हा जोशी यांच्या वक्तव्यातून दिसून आली. जेव्हा डॉ. लहामटे यांनी रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला भेट दिली तेव्हा त्यांनी गेट पासून ते स्टेजपर्यंत अनेकांना हात जोडून नमस्कार केला. हे चित्र पाहिल्यानंतर भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणार्‍या जोशी यांनी डॉक्टरांच्या गोडव्यासह त्यांच्या महाविकास आघाडीला टोमणे मारले. ते म्हणले की, राज्यात पहाटेचा शपतविधी होतो, आमदारांची पळवापळवी होते आणि मग सत्ता स्थापनेचा घाट घातला जातो. जर कदाचित रोटरी क्लबप्रमाणे मंत्रीमंडळ स्थापन केले असते तर आज डॉ. किरण लहामटे देखील मंत्री असते. असे म्हणत त्यांनी डॉक्टरांच्या गत आठवणी जाग्या केल्या. कारण, त्यांना आदिवासी मंत्रीपद मिळणार हे माध्यमांवर देखील आले होते. मात्र, अचानक भाचेबुवा तनपुरे यांना लॉटरी लागली आणि डॉक्टरांचे नाव अलगद बाजुला गेले. त्यामुळे, जोशी यांनी नकळत अनेक गोष्टींना उजाळा दिला.

अकोले तालुक्याच्या पर्यटनाबाबत देखील त्यांनी फार मोठी नाराजी व्यक्त केली. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून ते आम्ही फक्त पुस्तकात वाचले आहे. मात्र, ते अकोले तालुक्यात आहे, हे अनेकांना माहित नाही. अगस्ति महाराजांचा इतिहास अनेकांना माहित आहे. मात्र, त्यांचा आश्रम अकोल्यात आहे. याची देखील अनेकांना कल्पना नाही. त्यामुळे, यांची ओळख महाराष्ट्रात करुन देण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. (आता जोशी यांनी जो काही पर्यटनाचा मुद्दा उपस्थित केला. त्याहून आमदार आणि खासदार तसेच येथील माध्यमे व लेखक हे तालुक्याची महती राज्यभर आणि देशभर पोहचविण्यात किती अपयशी आहेत. याची प्रचिती आपल्याला आली आहे. तर, येणार्‍या काळात येथील पर्यटनाचा विकास आणि मीनी जम्मु कश्मीर म्हणून तालुका अधिक प्रचलित कसा होईल. याकडे तालुक्यातील सुज्ञ व्यक्तींनी लक्ष दिले पाहिजे.)

आज कोविडच्या काळात रोटरी क्लबने तालुक्यातील डोंगर दर्‍यांपर्यंत जाऊन आपले काम केले आहे. अनेकांना पडत्या काळात मदतीचा हात दिला आहे. तर, याच पदग्रहण सोहळ्यात सहा गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप केले आहे. सुगाव कोविड सेंटर येथे देखील रोटरी क्लबने भरीव मदत केली आहे. त्यामुळे, पत्रकार जोशी यांनी रोटरी क्लबचे तोंडभरून कौतूक केले. तर या कार्यक्रमात महिलांचा अधिक सहभाग कसा वाढविता येईल यासाठी येणार्‍या काळात प्रयत्न करावे अशी विनंतीवजा सुचना त्यांनी केली. त्यामुळे, त्यांच्या वक्तव्याने त्यांची निर्भिडता देखील अकोले तालुक्याला पहायला मिळाली आहे. त्यामुळे, रोटरी क्लबने त्यांना वचन देत महिलांचा सहभाग वाढविण्याचा शब्द दिला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे, प्रत्येक वेळी आपल्यापर्यंत सरकारची मदत पोहचेल असे नाही. म्हणून लोक सहभागातून आपण अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी काही उपक्रम केले पाहिजे. अर्थात रोटरी क्लब हे कोणाकडून निधी मागत नाही. मात्र, तरी देखील त्यांची मदत सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहचते. त्यामुळे, फंड उभा करण्यासाठी काहीतरी नियोजन केले पाहिजे. महाराष्ट्रात 12 कोटी लोक राहतात. त्यांनी जर प्रत्येक महिन्याला 1 रुपये जमा केला तर महिन्याला 12 कोटी रुपये फंड उभा राहतो. हे करणे कितपत शक्य आहे माहित नाही. मात्र, अकोले तालुक्यासारख्या ग्रामीण भागात असे केले तर कोविडशी लढण्यासाठी मोठा निधी उभा राहू शकतो. फक्त त्यासाठी विश्वासू व्यक्ती आणि तसे संगठण उभे करणे गरजेचे आहे.

रोटरी क्लबच्या नुतन पदग्रहण सोहळ्यात सचिन आवारी (लालतारा मेडिकल) यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली तर संदिप दातखिळे (संदिप आर्ट) यांची उपाध्यक्ष, सचिव प्रा. सुरींदर वावळे, खजिनदार गंगाराम करवर यांना नियुक्त करण्यात आले. रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला साम टिव्हीचे संपादक प्रसन्न जोशी, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, रोटरी ब्लबचे जिल्हा उपप्रांतपाल दिलीप मालपाणी, विशेष सल्लागार अमोल वैद्य, दिपक महाराज देशमुख, घनश्याम माने, विक्रम नवले, सुरेश गडाख, सुरेश खांडगे, अ‍ॅड. बी.जे. वैद्य, रवि मालुंजकर, नगरसेवक सचिन शेटे, नगरसेवक नामदेव पिचड विनोद हांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तर हेरंब कुलकर्णी, कॉ. कारभारी उगले यांना विशेष सन्मानित करण्यात आले.